आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

‘शिवाजी’च्या नव्या शिलेदारांसाठी वातावरण तापले:10 तारखेला आमसभेत होणार उमेदवारी दाखल; 11 तारखेला निवडणूक

अमरावतीएका महिन्यापूर्वी
  • कॉपी लिंक

विस्ताराच्यादृष्टीने सातारा जिल्ह्यातील ‘रयत’नंतर राज्यातील दुसऱ्या क्रमांकाची शिक्षण संस्था असलेल्या शिवाजी शिक्षण संस्थेच्या कार्यकारी परिषदेची निवडणूक आगामी 11 सप्टेंबर रोजी होणार आहे. अध्यक्ष, कोषाध्यक्ष, तीन उपाध्यक्ष आणि चार कार्यकारिणी सदस्य अशा नऊ पदांसाठी ही निवडणूक होत असून त्यादृष्टीने शिव परिवारातील वातावरण चांगलेच तापले आहे.

दरवेळी आमसभेद्वारे ‘शिवाजी’च्या कार्यकारी परिषदेची निवड केली जाते. त्या पार्श्वभूमीवर संस्थेची पंचवार्षिक आमसभा आगामी 10 सप्टेंबर रोजी होत आहे. पंचवटी चौक स्थित शिवाजी शारीरिक शिक्षण महाविद्यालयात आयोजित या आमसभेची कारवाई दुपारी 1 वाजता सुरु होईल. 3 वाजेपर्यंत कामकाज चालल्यानंतर दुपारी साडे तीन ते साडे चार या वेळात कार्यकारी परिषदेसाठी उमेदवारी अर्ज दाखल केले जातील. त्यानंतर अर्ध्या तासाने छाननी करुन वैध नामांकनाची यादी घोषित केली जाईल. सायंकाळी 5 ते 6 या वेळात इच्छूकांना उमेदवारी अर्ज मागे घेण्याची मुभा असेल. त्यानंतर सायंकाळी 6.30 वाजता उमेदवारांची अंतीम यादी घोषित केली जाईल.

निवडणुकीच्या निमित्ताने संस्थेचे कार्यक्षेत्र असलेल्या सर्वच जिल्ह्यातील प्रामुख्याने अमरावती-अकोला जिल्ह्यातील शिव परिवार ढवळून निघाला आहे. शिवाजीच्या विद्यमान कार्यकारिणीचा कालावधी 21 सप्टेंबरला पूर्ण होत असल्याने ही निवडणूक होत आहे. हर्षवर्धन देशमुख व नरेशचंद्र ठाकरे यांच्यात अध्यक्षपदाच्या उमेदवारीवरून एकमत झाले नसल्याने हर्षवर्धन देशमुख यांच्या नेतृत्वातील प्रगती आणि नरेशचंद्र ठाकरे यांच्या नेतृत्वातील विकास असे दोन पॅनल समोरा-समोर उभे ठाकले आहेत.

दरम्यान दोन्ही पॅनलने आपापले उमेदवार घोषित केले असून प्रचारकार्यही सुरु केले आहे. देशाचे प्रथम कृषीमंत्री डॉ. पंजाबराव उपाख्य भाऊसाहेब देशमुख यांनी डिसेंबर 1932 मध्ये श्री. शिवाजी शिक्षण संस्थेची स्थापना केली आहे. सध्यस्थितीत अभियांत्रिकी व वैद्यकीय शाखेसह 24 वरिष्ठ महाविद्यालये, 154 कनिष्ठ महाविद्यालये, 75 माध्यमिक शाळा आणि 35 वसतिगृहे असा या संस्थेचा व्याप आहे. त्यामुळेच या निवडणुकीकडे संपूर्ण राज्याचे लक्ष लागले आहे.

अशी आहे संस्थेची ख्याती

सन 1993-94 मध्ये या संस्थेला शासनाकडून डॉ. बाबासाहेब आंबेडकर दलित मित्र पुरस्काराने सन्मानित करण्यात आले असून सन 1999-2000 मध्ये संत गाडगे महाराज स्मृती पुरस्कार प्रदान करण्यात आला आहे. सर्वोत्कृष्ट प्रशासकीय संस्था म्हणूनसुद्धा राज्य शासनाने या संस्थेचा गौरव केला आहे.

हे आहेत मावळते पदाधिकारी

अध्यक्ष हर्षवर्धन देशमुख, उपाध्यक्ष नरेशचंद्र ठाकरे, अ‍ॅड. गजानन पुंडकर व डॉ. रामचंद्र शेळके, कोषाध्यक्ष दिलीप इंगोले, कार्यकारिणी सदस्य हेमंत काळमेघ, केशवराव गावंडे, केशवराव मेटकर व अ‍ॅड. अशोक ठुसे.

बातम्या आणखी आहेत...