आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

भूमिका:साबरमती आश्रमाचे सौंदर्यीकरण म्हणजे गांधींच्या प्रतिकांचा अंत, जलपुरुष डॉ. राजेंद्रसिंह केंद्रावर कडाडले

अमरावती3 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक

विचार आणि शरीर संपवूनही गांधी मरत नाहीत म्हणून आता त्यांच्या प्रतिकांवर हल्ला करणे सुरू आहे. साबरमती आश्रमाचे सौंदर्यीकरण हा त्याचाच एक भाग असून ते थांबवण्यासाठी नागरिकांनी केंद्र सरकारविरुद्ध बोलायला पाहिजे. कोणतीही भीती न बाळगता अत्यंत निर्भयपणे या संकटाचा सामना करायला पाहिजे, असे प्रतिपादन जलपुरुष डॉ. राजेंद्रसिंह राणा यांनी रविवारी केले.

साबरमती आश्रम वाचवण्यासाठी सेवाग्राम येथूून निघालेल्या जनजागरण यात्रेची पहिली सभा रविवारी येथील गुरुदेव सेवाश्रमात (गाडगेनगर) पार पडली. यावेळी ते बोलत होते. मंचावर यात्रेच्या संयोजन मंडळाचे सदस्य तथा नई तालीमचे सुगन बरंठ, प्रसिद्ध गांधीवादी कुमार प्रशांत, राष्ट्रीय गांधी संग्रहालयाचे संचालक अण्णा मलाई, डॉ. शिवचरणसिंह ठाकूर, डॉ. विश्वजीत राय, गांधी स्मारक निधीचे संजय सिंग, राजस्थानच्या आशा बोथरा, अशोक भारत, साबांविचे निवृत्त प्रधान सचिव धनंजय धवड उपस्थित होते.

साबरमती आश्रमाच्या बचावासाठी निघालेली ही यात्रा २४ ऑक्टोबरला तेथे पोहचणार आहे. या दिवशी तेथे गांधीवाद्यांचे संमेलन भरणार असून भविष्यातील आंदोलनात्मक भूमिकेची मांडणी केली जाणार आहे. डॉ. राजेंद्रसिंह म्हणाले, गांधींना विचार आणि शरीराने मारण्याचा प्रयत्न झाला. परंतु तरीही ते शिल्लक राहिलेत. त्यामुळे आता त्यांच्या प्रतिकांवर हल्ला करणे सुरू असून येणाऱ्या पिढ्यांना गांधी समजणारच नाहीत, अशी व्यवस्था केली जात आहे. या व्यवस्थेची गती २०१४ पासून केंद्रात आलेल्या विशिष्ट सरकारच्या काळात फार वेगाने वाढली आहे. त्यामुळे नागरिकांनी सरकारच्या खोटेपणाच्या आमिषांना बळी न पडता भयमुक्त होऊन सरकारविरुद्ध बोलण्याचा तसेच या संघर्षात सहभागी होण्याचा प्रयत्न केला पाहिजे. यात्रेतील दुसरे संयोजक कुमार प्रशांत यांनीही यावेळी मांडणी केली.

विजय दुर्गे यांचा सत्कार
जलपुरुष डॉ. राजेंद्रसिंह यांनी पेढी आंदोलनाचे कट्टर पुरस्कर्ते विजय दुर्गे यांचा सत्कार केला. ते म्हणाले, यांच्यामुळे मला अनेकदा याठिकाणी यावे लागले. या क्रमात त्यांनी निवृत्त प्रधान सचिव धनंजय धवड यांचाही स्नेहपूर्वक उल्लेख करून त्यांच्यामुळे ‘नदी बचाव’च्या माझ्या कामाला खऱ्या अर्थाने गती मिळाली, असे स्पष्ट केले. यावेळी गांधी विचारांवर प्रेम करणाऱ्या विविध संस्था-संघटनांचे प्रतिनिधी उपस्थित होते.

बातम्या आणखी आहेत...