आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
डाउनलोड करामुख्य जलवाहिनी फुटल्याने दोन दिवस पाण्यावाचून राहिलेल्या अमरावतीकरांना उद्या, रविवारी पाणी मिळेल, असे महाराष्ट्र जीवन प्राधिकरणाच्या अधिकाऱ्यांचे म्हणणे आहे. मोर्शी तालुक्यातील सिंभोऱ्याहून अमरावतीशी जोडलेली मजीप्राची मुख्य जलवाहिनी गुरुवारी उशीरा सायंकाळी अचानक रहाटगावजवळ फुटली. परिणामी अमरावती व बडनेरचा पाणीपुरवठा गेले दोन दिवस होऊ शकला नाही.
महाराष्ट्र जीवन प्राधिकरणचे कार्यकारी अभियंता विवेक सोळंके आणि उप कार्यकारी अभियंता अजय लोखंडे यांनी याबाबत खेद प्रकट करीत नागरिकांना सूचित केले होते. दरम्यान जलवाहिनीच्या दुरुस्तीचे कार्य अहोरात्र सुरु ठेवल्याने ते शनिवारी उशीरा रात्री पूर्णत्वास जाईल, असा मजीप्राचा अंदाज आहे. त्यानंतर सुमारे ७० किलोमीटर अंतरावरील सिंभोऱ्याच्या धरणातून पाणी जलशुद्धीकरण केंद्रापर्यंत आणण्याची प्रक्रिया सुरु होईल आणि प्रक्रिये अंती शुद्ध झालेले पाणी जलकुंभांमध्ये साठवून उद्या सकाळी व सायंकाळी नागरिकांच्या घरांपर्यंत पोहोचवण्यात येईल, असे या विभागाचे नियोजन आहे.
अमरावतीत सध्या एक दिवसाआड पाणी पुरवले जाते. काही भागात सकाळी तर काही भागात सायंकाळी पाणी पुरवठा केला जातो. या वेळापत्रकानुसार उद्या, रविवार हा दिवस ज्या भागांसाठी लागू पडतो, त्याच भागाचा पाणी पुरवठा केला जाईल, असे मजीप्राचे म्हणणे आहे. सिंभोरा ते तपोवन (अमरावती) ही ७० किलोमीटरची जलवाहिनी तब्बल दीड मीटर व्यासाची आहे. रहाटगावजवळ अचानक ती फुटली. त्यामुळे हे अभूतपूर्व संकट निर्माण झाले आहे.
मध्यरात्रीपर्यंत चालेल दुरुस्ती
ऐनवेळी ओढवलेल्या या संकटामुळे अमरावती व बडनेरा शहराचा पाणी पुरवठा ३ व ४ जूनला केला जाणार नाही, अशी सूचना यापूर्वीच देण्यात आली होती. दरम्यान आज, शनिवारी मध्यरात्रीपर्यंत दुरुस्तीकार्य पूर्ण होईल, असा अंदाज आहे. त्यानंतर जलवाहिनी पूर्ववत झाल्याची खात्री करुन पंपींग केले जाईल. एकदा ही प्रक्रिया पूर्ण झाली की उद्या, रविवारी नागरिकांना पाणी मिळू शकेल. तोवर नागरिकांनी कृपया सहकार्य करावे.
अजय लोखंडे, उप कार्यकारी अभियंता, मजीप्रा. अमरावती.
Copyright © 2022-23 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.