आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

अमरावती:ट्रकखाली झोपलेला क्लिनर अंगावरुन ट्रक गेल्याने चिरडला, चालकाविरुद्ध गुन्हा नोंद

अमरावती10 दिवसांपूर्वी
  • कॉपी लिंक

हजारो किलोमीटर लांबीवरुन माल घेऊन नांदगाव पेठ एमआयडीसीमध्ये पोहोचलेले ट्रकचालक व क्लिनर दोघेही सकाळी आठ वाजेच्या सुमारास ट्रकमध्येच झोपले. याच दरम्यान क्लिनर ट्रकमधून खाली उतरला आणि ट्रकच्या खाली जाऊन झोपला. दुपारी दोन वाजेच्या सुमारास चालकाने ट्रक थोडा समोर घेण्यासाठी काढला तोच त्याला कवटी फुटल्याचा आवाज आला. त्यानंतर त्याने ट्रक थांबवून खाली उतरुन पाहिले तर धक्काच बसला कारण ट्रकखाली क्लिनरचा चेंदामेंदा झाला होता अन् तो घटनास्थळीच मृत झाला होता. ही धक्कादायक घटना बुधवारी (दि. २४) नांदगाव पेठ एमआयडीसीमध्ये घडली असून, या प्रकरणी ट्रकचालकाविरुद्ध गुरूवारी (दि. २५) गुन्हा दाखल झाला आहे.

अजेश नेनचंद आझडे (२२, रा. झेंडीगुंड्डा, किनवट, नांदेड) असे मृत क्लिनरचे नाव आहे. या प्रकरणी पोलिसांनी ट्रकचालक इंदलसिंग रामसिंग मट्टा (३८, रा. सोनाळा, अदिलाबाद तेलंगणा) याच्याविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे. घटनेची माहीती मिळताच नांदगाव पेठचे एपीआय दत्ता देसाई यांनी पथकासह घटनास्थळी धाव घेतली होती. गुरुवारी सकाळी मृतदेहाचे शवविच्छेदन झाले व पार्थीव त्याच्या कुटुंबीयांच्या ताब्यात देण्यात आले. या प्रकरणी पोलिसांनी ट्रकचालकाविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे.

चाकाखाली काहीतरी फुटल्याचा मोठा आवाज आला..
इंदलसिंग व अजेश हे दोघेही नातेवाइक असून, एकाच ट्रकवर काम करतात. मंगळवारी रात्री तेलंगणामधील अदिलाबादवरुन निघून त्या दोघांनी रात्रभर प्रवास केला. बुधवारी सकाळी आठ वाजेच्या सुमारास ते नांदगाव पेठ एमआयडीसीमध्ये पोहोचले, ट्रकमधील माल उतरवून त्याच ठिकाणी ट्रक उभा करुन दोघेही एमआयडीसी परिसरातच ट्रकमध्ये झोपले. दरम्यान चालक झोपेत असतानाच क्लिनर अजेश ट्रकखाली उतरला व ट्रकखाली येऊन झोपला. दरम्यान, दुपारी दोन वाजता चालकाला जाग आली व त्याला ट्रकसमोर घ्यायचा होता. यावेळी त्याला वाटले की, अजेश बाजूबाजूला कुठे गेला असावा, म्हणून त्याने ट्रक समोर घेतला, दोन ते तीन फुट ट्रक समोर घेताच चाकाखाली काही तरी फुटल्याचा मोठा आवाज आला. खाली उतरुन पाहिल्यावर त्याला लक्षात आले की, तो आवाज डोक्याची कवटी फुटल्याचा होता आणि त्या चाकाखाली क्लिनर अजेश आला आणि त्याचा मृत्यू झाला. हे पाहून इंदलसिंगलाही जबर धक्का बसला होता. मात्र तो काहीही करु शकत नव्हता कारण चाकाने अजेशचा तत्पूर्वीच जीव घेतला हाेता.

बातम्या आणखी आहेत...