आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
डाउनलोड करातालुक्यातील कळाशीहून ईचोरा गावात जाणारा ३ किलोमीटरचा रस्ता ठिकठिकाणी उखडला असून त्यावर अनेक खड्डे पडले आहेत. त्यामुळे रहदारीसाठी अनेक समस्या निर्माण झाल्या असून कित्येकदा किरकोळ अपघातही झाले आहेत. या रस्त्याच्या दुरुस्तीसाठी ग्रामस्थांनी लोकप्रतिनिधी व प्रशासनाला वेळोवेळी निवेदने दिली. परंतु या गंभीर समस्येकडे दुर्लक्षच केले जाते. असे ग्रामस्थांचे निरीक्षण आहे. दरम्यान रस्त्याच्या दुरवस्थेमुळे ग्रामस्थ त्रस्त झाले असून प्रशासन कुणाचा बळी जाण्याची वाट पाहत आहे काय, अशा प्रश्न उपस्थित झाला आहे.
गेल्या १२ वर्षापासून कळाशीहून ईचोरा गावात जाणारा मुख्यं व एकमेव असा हा ३ किलोमीटरचा रस्ता आहे. सध्या देखभाल व दुरुस्तीअभावी ठिकठिकाणी उखडला असून तो खड्डेमय झाला आहे. या खडतर रस्त्यावरुन दुचाकी-चारचाकी वाहनचालकांना खड्डे चुकवत वाहन चालवावे लागते. जीव
वाचविण्यासाठी त्यांना मोठी कसरत करावी लागते. रात्रीच्या वेळी खड्ड्यांचा अंदाज न आल्यास अपघात होण्याची शक्यता नाकारता येत नाही. त्यामुळे रस्त्यावरून ये-जा करणाऱ्या ग्रामस्थ, शेतकरी वर्गाला मोठ्या प्रमाणात अडचण निर्माण होत आहे.
ईचोरा गावातून दर्यापूर येथे शाळेत ऑटो रिक्षाने जाणाऱ्या विद्यार्थ्यांना या त्रासाचा दररोज सामना करावा लागतो. अशा परिस्थितीत जिल्हा परिषदेचा बांधकाम विभाग तसेच लोकप्रतिनिधींनी गांभीर्याने हा मुद्दा सोडवावा, अशी नागरिकांची मागणी आहे. दरम्यान सरपंच अश्विनी पखाले म्हणाल्या की, ईचोरा गावातील मुख्य रस्त्याच्या कामाला तातडीने सुरुवात करण्यासाठी ग्रामपंचायतमार्फत सतत पाठपुरावा सुरु आहे. नुकताच आमदार बळवंतराव वानखडे व तालुका काँग्रेसचे अध्यक्ष यांची भेट घेऊन चर्चाही केली. त्याचवेळी एका शिष्टमंडळाच्या वतीने निवेदनही देण्यात आले.
Copyright © 2022-23 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.