आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

चूल पेटवून, थाळीनाद करत आंदोलन:महागाई लादणाऱ्या सरकारविरोधात एल्गार करत काँग्रेस उतरली रस्त्यावर

अमरावती3 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक
  • काँग्रेसद्वारे ‘महागाईमुक्त भारत अभियान’ सुरू; महागाईने स्वयंपाकगृह, प्रसाधनगृह, वाहनांसह वाहनधारकांचे बजेट बिघडवल्याचा आरोप

सर्वसामान्यांवर महागाई लादणाऱ्या भाजप शासीत केंद्र सरकारविरोधात एल्गार करीत काँग्रेस सोमवार २८ रोजी रस्त्यावर उतरली. पेट्रोल-डिझेल, गॅस सिलिंडर सोबतच जीवनावश्यक वस्तूंच्या सतत वाढत असलेल्या किंमतीमुळे सर्वसामान्यांचे कंबरडे मोडले आहे. त्यामुळेच काँग्रेसने केंद्र शासना विरोधात आंदोलनाचा बिगुल वाजविला. चूल पेटवून तसेच थाळीनाद आंदाेलनासह महागाईचा तीव्र निषेध करण्यात आला.

महागाईचा विरोध म्हणून शहर काँग्रेसने राजकमल चौकात थाळीनाद आंदोलन केले. काँग्रेसद्वारे ‘महागाईमुक्त भारत अभियान’ सुरू करण्यात आले असून त्याअंतर्गत हे आंदोलन करण्यात आले. यावेळी शासनाविरोधात जोरदार नारेबाजी करण्यात आली. तर महिला काँग्रेसने चूल पेटवून गॅस दरवाढीसह जीवनावश्यक वस्तुंच्या आकाशाला भिडलेल्या किंमतीचा निषेध केला.

भाजपच्या काळात भाववाढीमुळे सामान्य जनतेचे जगणे कठीण झाले आहे. काँग्रेसने भाववाढ आणि इतर ज्वलंत प्रश्नांकडे सरकारचे लक्ष वेधण्याचा प्रयत्न केला. मात्र, सरकार त्याकडे कानाडोळा करीतत आहे. नाईलाजाने सर्वसामान्यांच्या हितासाठी काँग्रेस रस्त्यावर उतरली आहे. त्यासाठी महागाई मुक्त भारत अभियान राबविण्यात येत आहे. पेट्रोल, डिझेल, गॅस सोबतच इतरही जीवनावश्यक वस्तूंच्या किंमती वाढल्या आहेत. त्यामुळे सर्व सर्वसामान्य नागरिकांचे आर्थिक बजेट बिघडले असल्याच्या प्रतिक्रिया शहर काँग्रेसच्या नेत्यांनी आंदोलनादरम्यान दिल्या. निवडणूका आल्या की, दरवाढ कमी, निवडणूक संपल्या की दरवाढ असे केंद्र शासनाचे धोरण बनले असल्याचा आरोपही यावेळी काँग्रेस नेत्यांनी केला.

महागाईच्या भस्मासुराने प्रत्येक घरातील स्वयंपाकगृह, प्रसाधनगृह, वाहनांसह वाहन धारकांचे आर्थिक बजेटच बिघडविले आहे. जीवनावश्यक वस्तुंच्या किंमतीत झालेल्या प्रचंड दरवाढीमुळे हातावर पोट असणारे तर जेरिस आले आहेत. मध्यमवर्गीयांना तर जगणेच कठिण झाले आहे. त्यांचा आवाज म्हणून आम्हाला रस्त्यावर उतरावे लागले, अशी प्रतिक्रिया शहर काँग्रेस अध्यक्ष व मनपातील माजी विरोधीपक्ष नेते बबलू शेखावत यांनी व्यक्त केली.

आंदोलनात शेकडोच्या संख्येत काँग्रेस पदाधिकारी व कार्यकर्ते सहभागी झाले. त्यात माजी पालकमंत्री डॉ.सुनील देशमुख, शहर अध्यक्ष बबलू शेखावत, प्रदेश प्रवक्ते अॅड. दिलीप एडतकर, सरचिटणीस किशोर बोरकर, उपाध्यक्ष भैय्या पवार, माजी महापौर विलास इंगोले, मिलिंद चिमोटे, आसिफ तवक्कल, मुन्ना राठोड, किशोर रायबोले, राजेश ठाकूर, पुरुषोत्तम मुंधडा, रमेश राजोटे, मोहम्मद निजाम, सविता धांडे, शोभा शिंदे, डॉ. अंजली ठाकरे, कांचनमाला गावंडे, डॉ. मतीन अहमद, अभिजीत मेश्राम, जयश्री वानखडे, भाग्यश्री महल्ले, शिल्पा राऊत, फिरोज खान, सादिल शहा, सलीम मीरावाले, आनंद भांबोरे, कल्पना गायकवाड, जयश्री ठाकरे, भैय्या निचळ, कीर्तीमाला चौधरी, सुजाता झाडे, कांचन खोडके, शीतल देशमुख, नविद साबीर, अश्फाख खान, ऍड. सुनील पडोळे, सतीश काळे, विनय चौधरी, रमेश राजोटे, शरद ठोसरे, अनुराग चव्हाण, प्रभाकर वाळसे, तृप्ती मामर्डे, मुकेश छागाणी, अर्चना बोबडे, भारती पाटील, दिनेश खोडके, गजानन जाधव, प्रमिला जाधव, अमर देशमुख, निलेश गुहे, समीर जवंजाळ, संकेत कुलट, योगेश बुंदेले यांच्यासह आदी उपस्थित होते.

जीवनावश्यक वस्तुंची झाली दुपटीने दरवाढ
काँग्रेसद्वारे महागाई विरोधात थाळीनाद आंदोलन करण्यात आले. या आंदोलनात आंदोलनकर्त्यांची खाली सिलिंडर ठेऊन त्यावर वाढलेल्या किंमती दर्शविणारे फलक लावले होते. त्यात प्रामुख्याने २०१४ गॅस सिलिंडर ४१० रुपयांचे हाेते तर ८ वर्षांत त्यात दुप्पटीपेक्षा जास्त दरवाढ झाली. आता सिलिंडरच्या किंमतीत वाढ झाली असली तरी १४ रु. सबसिडी जमा होते, ही हास्यास्पद बाब होय. एलपीजीचे सध्याचे दर ९७४ रुपये असल्याबाबत रोष व्यक्त करण्यात आला.

महिला काँग्रेसने चूल पेटवून थापल्या भाकरी
वाढत्या महागाईची सर्वसामान्यांना चांगलीच झळ बसली आहे. यात सर्वाधिक फटका हा महिला, गृहिणींना बसला आहे. प्रत्येक घरातील बजेट कोलमडले आहे. या कृत्रिम महागाई विरोधात महिला काँग्रेसने आक्रमक भुमिका घेत राजकमल चौकात चूल पेटवून त्यावर भाकरी थापल्या. गॅस सिंलिंडरचे भाव वाढल्याने नाईलाजाने महिलांना चुलीवर स्वयंपाक करण्याची वेळ केंद्र शासनामुळे आली आहे, अशा संतप्त प्रतिक्रिया महिला काँग्रेसने दिल्या.

बातम्या आणखी आहेत...