आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

विद्यापीठाच्या इतिहासात पहिल्यांदाच:सिनेट निवडणुकीची मतमोजणी गुरुवारच्या सकाळपर्यंत थांबविली

अमरावती10 दिवसांपूर्वी
  • कॉपी लिंक

गेल्या 36 तासांपासून अखंडपणे सुरु असलेली संत गाडगेबाब अमरावती विद्यापीठाची मतमोजणी सर्वानुमते उद्या, गुरुवार, सकाळी 8 वाजेपर्यंत थांबविण्यात आली आहे. सिनेटमधील नोंदणीकृत पदवीधर या मतदारसंघातील खुल्या संवर्गातील पाच उमेदवारांसाठीची मतमोजणी अद्याप व्हायची आहे. नव्या निर्णयानुसार आता ती उद्या, गुरुवारी सकाळी 8 वाजेपासून पुन्हा सुरु केली जाईल.

सिनेटच्या 36 आणि विद्वत परिषदेच्या 6 जागांसह 16 अभ्यास मंडळांच्या प्रतिनिधींसाठी रविवारी मतदान घेण्यात आले होते. त्यानंतर मंगळवार, 22 नोव्हेंबरच्या सकाळपासून मतमोजणीला प्रारंभ झाला.

दहा प्राचार्य, दहा प्राध्यापक, शिक्षण संस्थ्यांच्या व्यवस्थापन मंडळांचे सहा प्रतिनिधी, तीन विद्यापीठ शिक्षक आणि दहा नोंदणीकृत पदवीधर अशा 39 जणांसाठी सिनेटची निवडणूक घोषित झाली होती. त्यापैकी पात्र उमेदवारच नसल्याने प्राचार्यांची एक जागा (एसटी संवर्ग) रिक्त आहे. याशिवाय संस्थाचालकांचा एक प्रतिनिधी व एक विद्यापीठ शिक्षक अविरोध विजयी झाल्याने उरलेल्या 36 जागांसाठी ही निवडणूक घेण्यात आली.

दरम्यान या निवडणुकीतील सर्वाधिक मतदारसंख्या असलेल्या पदवीधर मतदारसंघाची मतमोजणी सर्वात शेवटी हाती घेण्यात आली. मतपत्रिकांचे विलगीकरण संपुष्टात आल्यानंतर मंगळवारी मध्यरात्रीनंतर या मतदारसंघाची मतमोजणी सुरु करण्यात आली. एकूण दहा जागांपैकी पाच जागा राखीव तर पाच जागा खुल्या संवर्गासाठी आहेत. त्यापैकी राखीव जागांची मतमोजणी आटोपली असून खुल्या संवर्गाची मतमोजणी व्हायची आहे. परंतु विश्रांती घेतल्याखेरीज पुढे जाणे शक्य नसल्याने सर्व कर्मचाऱ्यांनी ती थांबविण्याची विनंती केली. त्यामुळे उद्या सकाळपासून केली जाईल.

या मतदारसंघातून पसंतीक्रमानुसार पाच जण विजयी होतील. त्यासाठी 21 उमेदवार मैदानात आहेत. सिनेटच्या निवडणुकीतील हा सर्वाधिक मतदार असलेला मतदारसंघ होता. त्यामध्ये 35 हजारांवर मतदार आहेत. त्यापैकी 11 हजार मतदारांनी मतदानाच्या प्रक्रियेत सहभाग नोंदविला आहे.

बातम्या आणखी आहेत...