आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

हल्लेखोराला 10 वर्षांची शिक्षा:दाम्पत्यावर केला होता चाकूने प्राणघातक हल्ला; जिल्हा न्यायालयाचा निर्णय

अमरावती13 दिवसांपूर्वी
  • कॉपी लिंक

लोणी पोलिस ठाण्याच्या हद्दीतील खिरसाना गावात दाम्पत्यावर चाकूने प्राणघातक हल्ला करणाऱ्या आरोपीला जिल्हा न्यायाधीश (क्रमांक १) एस.एस.अडकर यांच्या न्यायालयाने दहा वर्ष सश्रम कारावासाची शिक्षा ठोठावली. हा निर्णय न्यायालयाने गुरूवारी (ता. 16) दिला आहे.

विधी सूत्रांनी दिलेल्या माहीतीनूसार, गजानन पुंडलिक वाघमारे (53, रा. खिरसाना, ता. नांदगाव खंडेश्वर, जि. अमरावती) असे शिक्षा झालेल्या आरोपीचे तर विलास मेश्राम व छाया विलास मेश्राम असे हल्ल्यात जखमी झालेल्या दाम्पत्याचे नाव आहे. ही घटना 6 ऑक्टोंबर 2016 रोजी रात्री साडेआठ ते नऊ वाजताच्या दरम्यान खिरसाना गावात घडली होती.

छाया विलास मेश्राम (26, रा. खिरसाना, नांदगाव खंडेश्वर) ही महिला घटनेच्या वेळी घरात स्वयंपाक करीत होती. दरम्यान त्यांना पती विलास यांचा आवाज आला. त्यामुळे त्यांनी घराबाहेर जाऊन बघितले. त्यावेळी पती विलास आणि गावातील सुनिल वाघमारे नामक व्यक्ती एकमेकांना शिविगाळ करीत असल्याचे दिसले.

छाया मेश्राम यांनी पतीला शिविगाळ करण्याचे कारण विचारले असता, सुनिलने आईला शिविगाळ केल्याचे त्यांनी सांगितले. त्यामुळे छाया यांनी सुनिलला समजाविण्याचा प्रयत्न केला. परंतु तरीही तो विलास यांना शिविगाळ करीतच होता. त्यामुळे पती विलास यांना घेऊन छाया घरी जात होत्या. त्याचवेळी सुनिल वाघमारेचा मोठा भाऊ गजानन पुंडलिक वाघमारे हा तेथे पोहोचले आणि त्याने घरातून चाकू आणून माझ्या भावाला शिविगाळ करतोस का? असे म्हणून विलासवर चाकूने हल्ला केला. त्यामुळे छाया यांनी पतीला वाचविण्यासाठी प्रयत्न केले. मात्र गजाननने छाया यांनाही चाकू मारुन जखमी केले. त्यानंतर गजाननने विलास यांच्या छातीत चाकू मारला. तसेच उपस्थित नागरिकांना छाया व विलास यांना वाचविण्यासाठी मज्जाव केला.

या हल्ल्यात विलास मेश्राम गंभीर जखमी झाले होते. त्यामुळे त्यांना तत्काळ उपचारासाठी रुग्णालयात नेण्यात आले. या घटनेची तक्रार छाया मेश्राम यांनी लोणी पोलिस ठाण्यात नोंदविली. त्यानुसार पोलिसांनी गुन्हा नोंदविला.

याप्रकरणात सरकारी पक्षातर्फे अतिरिक्त सरकारी वकिल पंकज रामेश्वर इंगळे यांनी न्यायालयात एकुण दहा साक्षीदार तपासले. दोन्ही पक्षाच्या युक्तीवादानंतर आरोपीचा दोष सिध्द झाला. त्यानुसार न्यायालयाने आरोपी गजानन वाघमारेला दहा वर्ष सश्रम कारावास 10 हजार रुपये दंड व दंड न भरल्यास 1 महिना अतिरिक्त कारावासाची शिक्षा सुनावली.

बातम्या आणखी आहेत...