आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

शासनाकडून जिल्हा शालेय क्रीडा स्पर्धेची घोषणा उशिरा:6 महिन्यात होणाऱ्या जिल्हा क्रीडा स्पर्धा, केवळ दीड महिन्यांतच घ्याव्या लागणार

अमरावती4 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक

शासनाच्या क्रीडा विभागाने जिल्हा शालेय क्रीडा स्पर्धेची घोषणा उशिरा केल्यामुळे जिल्हा क्रीडा अधिकारी कार्यालयासह (डीएसओ) शारीरिक शिक्षक व क्रीडा संघटनांपुढे या स्पर्धा केवळ दीड महिन्यात पूर्ण करण्याचे आव्हान आहे. आधी या स्पर्धा घेण्यास किमान ६ महिने लागायचे. त्या जुलै महिन्याच्या शेवटपासून सुरू व्हायच्या. मात्र यंदा सर्व वेळापत्रकच बारगळले आहे. त्यामुळे जिल्हा शालेय क्रीडा स्पर्धा ५ डिसेंबरपर्यंत आणि विभागीय शालेय क्रीडा स्पर्धा या २१ डिसेंबरपर्यंत पूर्ण करायच्या आहेत. कारण त्यानंतर लगेच राज्यस्तरीय स्पर्धा सुरू होणार आहेत.

राज्याच्या क्रीडा विभागाने दिवाळीच्या कालावधीत स्पर्धा घ्यायच्या की दिवाळीच्या सुट्यांनंतर घ्यायच्या याचा निर्णय जिल्हा क्रीडा अधिकारी, क्रीडा संघटना व शारीरिक शिक्षक संघटनेवर सोपविला होता. डीएसओंवर ही स्पर्धा वेळेत घेण्याचे दडपण असल्याने त्यांनी तयारी दर्शविली होती. परंतु, क्रीडा संघटनांसह शारीरिक शिक्षक संघटनांनी दिवाळीच्या सुट्यांनंतर स्पर्धा सुरू करण्यात याव्यात असे निवेदन शासनाकडे पाठविले होते. कारण सुट्यांमध्ये विद्यार्थी गावी जातात. शारीरिक शिक्षकांचेही कार्यक्रम ठरलेले असतात. अशात या स्पर्धेला व्यवस्थित न्याय मिळाला नसता. त्यामुळे डीएसओ कार्यालयाचा नाईलाज झाला. डिसेंबर महिन्याच्या शेवटपासून राज्यस्तरीय शालेय क्रीडा स्पर्धा सुरू होणार असल्याने दीड महिन्याच्या फारच अल्प कालावधीत या स्पर्धा घ्याव्या लागत आहेत.

१० व ११ नोव्हेंबरपासून एखाद दुसऱ्या क्रीडा प्रकाराला सुरुवात होईल. त्यानंतर मोठ्या खेळांच्या स्पर्धांचे जसे कबड्डी, खो-खो, अ‌ॅथलेटिक्स, व्हाॅलीबाॅल, बुद्धीबळ, हॅण्डबाॅल, बेसबाॅल, टेबल टेनिस, बॅडमिंटन, जिम्नॅस्टीक्स, जलतरण यासह इतर खेळांच्या स्पर्धा घेतल्या जातील. जिल्हा शालेय क्रीडा स्पर्धेचा कार्यक्रम ५ डिसेंबरपर्यंत त्यानंतर जे संघ विभागीय स्पर्धेसाठी पात्र ठरतील त्यांच्या विभागीय शालेय स्पर्धा २१ डिसेंबरपर्यंत पूर्ण करायच्या आहेत.

अत्यंत व्यस्त कार्यक्रम राहणार

यंदा जिल्हा शालेय क्रीडा स्पर्धेचा अत्यंत व्यस्त कार्यक्रम राहणार आहे. १० नोव्हेंबरपासून जिल्ह्यातील सर्वच शाळा दिवाळीच्या सुट्यांनंतर सुरू होत असल्याने ११ रोजी एखाद दुसऱ्या क्रीडा स्पर्धेचे आयोजन केले जाणार आहे. त्यानंतर नियमितपणे स्पर्धा होतील. वर्षा साळवी, जिल्हा क्रीडा अधिकारी.

बातम्या आणखी आहेत...