आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

मेळघाटच्या दुर्गम भागात अशीही सेवा:रुग्णाचे प्राण वाचवण्यासाठी डॉक्टरांनीच केले रक्तदान

रवींद्र लाखोडे | अमरावती8 दिवसांपूर्वी
  • कॉपी लिंक

रुग्णाचे प्राण वाचविण्यासाठी डॉक्टर्स शर्थीचे प्रयत्न करतात, अशी अनेक उदाहरणे आहेत. परंतु ज्यांना डॉक्टरांचे नावही योग्यपणे उच्चारता येत नाही, अशा आदिवासी रुग्ण महिलेचे प्राण वाचविण्यासाठी खुद्द एका डॉक्टरांनीच रक्तदान केले, असा प्रसंग अभावानेच दिसून येतो. परंतु मानवतेला अधिक उंचीवर नेणारा हा प्रसंग मेळघाटसारख्या दुर्गम भागात घडून आला आहे.

धारणी तालुक्यातील कळमखार प्राथमिक आरोग्य केंद्रांतर्गत चाकर्दा येथे उपकेंद्र आहे. या उपकेंद्रात एक सात महिन्याची गरोदर महिला आली. ललिता अनिल काळे हे त्या २७ वर्षीय महिलेचे नाव आहे. अतिसार झाल्याने अगदी अशक्त अवस्थेत तिला डॉक्टरांनी दाखल करुन घेतले. तपासणीअंती त्या महिलेचे हिमोग्लोबीन केवळ ६ टक्क्यांवर असल्याचे निष्पन्न झाले. साधारणत: ते १०-११ टक्के असावे लागते. त्यामुळे तिला बी पॉझीटिव्ह रक्ताची नितांत गरज होती. परंतु तिच्याकडे कोणीही रक्तदाता नाही, असे कुटुंबीयांतर्फे सांगण्यात आले. शेजारी किंवा हितसंबंधातील आणखी कुणी रक्त देऊ शकेल, असेही कुणीच नसल्याचे कुटुंबीयांचे म्हणणे होते.

त्यामुळे रक्ताची जुळवाजुळव कशी करायची, यासाठी पुरक प्रश्न विचारणाऱ्या तेथील आरोग्य कर्मचाऱ्यांना कंटाळून ती प्रथमोपचारानंतर स्वमर्जीने सुटी घेण्यास तयार झाली. हा सर्व प्रकार तिच्यावर उपचार करणारे तेथील समुदाय विकास अधिकारी (सीएचओ) डॉ. शुभम झाडोकार यांच्या लक्षात आला. त्यानंतर त्यांनी तेथे उपस्थित आरोग्य कर्मचाऱ्यांना प्रश्न विचारणे बंद करा, असे म्हणत मी स्वत: रक्त देणार आहो, असे सांगितले. प्रारंभी त्यांच्या या वाक्यावर कर्मचारी आणि त्या रुग्ण महिलेच्या कुटुंबीयांचा विश्वासच बसला नाही. परंतु दुसऱ्या दिवशी सकाळी डॉक्टर स्वत: ७० किलोमीटर दूर मध्यप्रदेशातील खंडव्याला गेले. तेथे रक्तदान केल्यानंतर त्या रक्ताच्या वेगवेगळ्या तपासण्या केल्या गेल्या आणि त्यानंतर दुपारी ४ वाजेपर्यंत परत येऊन त्या महिलेला रक्त चढवले गेले. रक्त शरीरात पोचल्यानंतर महिलेच्या हिमोग्लोबीनमध्ये पुरेशी वाढ झाली असून गर्भातील बाळालाही योग्य पोषण प्राप्त झाले आहे. दरम्यान ही महिला अतिसारापासूनही सावरली असून प्रकृती बरी झाल्यानंतर बुधवारी या महिलेला सुटी देण्यात आली.

स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवानिमित्त ७५ रक्तदाते मिळवण्याची मोहीम
दरम्यान स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सव या कार्यक्रमांतर्गत अशा रुग्णांसाठी किमान ७५ रक्तदाते गोळा करण्याची मोहीम जिल्हा परिषदेच्या आरोग्य विभागाने हाती घेतली आहे. डीएचओ डॉ. दिलीप रणमले यांच्या नेतृत्वात पीएम मातृवंदना योजनेचे जिल्हा समन्वयक धर्मेन्द्र मंगेकर व जिल्हा कार्यक्रम सहायक सारिका पाटील यांनी त्यासाठीची नोंदणी सुरु केली आहे, अशी माहिती देण्यात आली आहे.

बातम्या आणखी आहेत...