आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

राजकीय:ईडीच्या छाप्याला अडसूळ-नवनीत राणा यांच्यातील राजकीय संघर्षाची आहे किनार

अमरावती2 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

अमरावतीच्या खासदार नवनीत राणा आणि माजी खासदार आनंदराव अडसूळ यांच्यात मागील सात वर्षांपासून राजकीय द्वंद सुरू आहे. २०१४ च्या लोकसभा निवडणुकीपासून सुरू झालेला या दोन राजकीय नेत्यांमधील हा संघर्ष अजूनही कायम आहे. दरम्यान मुंबईतील सिटी बँक प्रकरणी माजी खासदार आनंदराव अडसूळ यांच्या मुंबईस्थित निवासस्थानी ईडीचे पथक सोमवारी (दि. २७) गेले व पथकाने अडसुळांची चौकशी केली. त्यानंतर अडसूळ यांना प्रकृती अस्वस्थामुळे रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. दरम्यान, या प्रकरणाला सुध्दा राणा आणि अडसूळ यांच्यातील राजकिय संघर्षाची किनार असल्याची जोरदार चर्चा सर्वसामान्यांमध्ये आज पुन्हा एकदा सुरू झाली आहे.

२०१४ साली निवडणूकीच्या काळात एका खासगी वाहिनीच्या कार्यक्रमादरम्यान अडसूळ आणि नवनीत राणा यांच्यात वाद झाला आणि ताे वाद पोलिस ठाण्यात गेला होता. त्यानंतर अधूनमधून राजकीय आरोप प्रत्यारोप या दोन्ही नेत्यांकडून एकमेकांवर सुरू आहेत. दरम्यान २०१७ मध्ये खासदार अडसुळांच्या दोन निकटच्या व्यक्तींनी नवनीत राणा यांचे जात प्रमाणपत्र अवैध असल्याचा आरोप करून मुंबईच्या जात पडताळणी समितीकडे तक्रार केली होती. या प्रकरणाचा जात पडताळणी समितीने निकाल नवनीत राणा यांच्या बाजूने देत त्यांचे प्रमाणपत्र वैध असल्याचे ठरवले होते. याचदरम्यान २०१८ मध्ये मुंबईतील सिटी बँक प्रकरणात आमदार रवी राणा यांनी खासदार अडसूळ यांच्याविरोधात ईडीमध्ये तक्रार दाखल केली होती. या तक्रारीची चौकशी तेव्हापासून सुरूच आहे.

दरम्यान २०१९ ला पुन्हा लोकसभा निवडणूक आली. या निवडणुकीत पुन्हा एकदा तत्कालीन खासदार आनंदराव अडसूळ आणि नवनीत राणा एकमेकांविरुध्द राजकिय मैदानात आले. या निवडणुकीत खासदार अडसूळ यांचा पराभव करुन नवनीत राणा अमरावतीच्या खासदार झाल्यात. त्यानंतर माजी खासदार अडसूळ यांनी विद्यमान खासदार नवनीत राणा यांच्या जात प्रमाणपत्रावर आक्षेप घेवून उच्च न्यायालयात याचिका दाखल केली. त्यामुळे आता हे राजकीय नाट्य आणखी काही दिवस रंगण्याची शक्यता असून यावरून आता शिवसेना पुन्हा रडावर आल्याचेही यानिमित्ताने सांगण्यात येत आहे.

राणांच्या खासदारकीची सुनावणी सर्वोच्च न्यायालयात
या प्रकरणात पाच ते सहा महिन्यांपूर्वी निर्णय देवून अडसूळ यांच्या बाजूने निकाल लागला. त्यावेळी उच्च न्यायालयाने राणा यांचे जात प्रमाणपत्र अवैध ठरवले. या निर्णयामुळे नवनीत राणा यांची खासदारकीच एकप्रकारे धोक्यात आली होती. त्यामुळे नवनीत राणा यांनी उच्च न्यायालयाच्या निर्णयाविरुध्द आता सर्वोच्च न्यायालयात आव्हान दिले आहे. सर्वोच्च न्यायालयात सध्या या प्रकरणात सुनावणी सुरू आहे. एकंदरीत अडसूळ आणि राणा यांच्यातील मागील सात वर्षांपासून सुरू असलेले राजकीय द्वंद पाहता अडसुळांची ईडीकडून सुरू झालेल्या चौकशीला सुध्दा याच राजकिय संघर्षाची किनार असू शकते, अशी चर्चा सर्वसामान्य नागरिकांमध्ये सोमवारी दिवसभर शहरात सुरू होती.

बातम्या आणखी आहेत...