आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

अमरावती:जखमेतील घातक ‘बायोफिल्म’वरील प्रभावी औषधाचे प्रमाण आता होणार 24 ते 48 तासांत ‘डिटेक्ट’, पारंपरिक पद्धतीने लागतात 5 ते 6 दिवस

अमरावती2 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक
  • डॉ. नीरज घनवटे व डॉ. प्रशांत ठाकरे या संशोधकांनी विकसित केली नवी पद्धत, अनेक रुग्णांना होणार फायदा

अनेकदा जखम झाल्यानंतर कितीही औषधोपचार केला तरीही जखम बरी होत नाही. अशातच अनेकदा ही जखम रुग्णांसाठी जीवघेणीसुद्धा ठरू शकते. यातच मधुमेह, वाताच्या रुग्णांना अशा जखमा अधिक प्रमाणात त्रासदायक ठरू शकतात. दरम्यान, जखमेमध्ये एक अशा पद्धतीची ‘बायोफिल्म’ (जिवाणूंचा तगर) तयार होते, की त्यामध्ये लवकर निदान होऊन रुग्णाला योग्य अँटिबायोटिक्स देणे गरजेचे असते. सध्या जखमेतील अशा प्रकारे ‘बायोफिल्म’ व त्या बायोफिल्मला नष्ट करण्यासाठी प्रभावी औषधांचे प्रमाण शोधण्यासाठी उपलब्ध असलेल्या पद्धतीने किमान ५ ते ६ दिवसांचा कालावधी लागतो. मात्र, येथील संत गाडगेबाबा अमरावती विद्यापीठातील प्रा. डाॅ. नीरज घनवटे व प्रा. डॉ. प्रशांत ठाकरे यांनी विकसित केलेल्या पद्धतीने अवघ्या २४ ते ४८ तासांत अल्प रकमेमध्ये ‘बायोफिल्म’ व ते नष्ट करण्यासाठी प्रभावी औषधांचे प्रमाण शोधता येणार आहे. या संशोधनाचे पेटंटसुद्धा या दोन संशोधकांना मिळाले आहे.

‘मेथड फॉर रॅपिड डिटेक्शन ऑफ मिनिमम बायोफिल्म अॅरेडिकेटिंग कॉन्सेन्ट्रेशन ऑफ अँटिबायोटिक्स अगेन्स्ट बॅक्टेरियल पॅथोजन्स’ असे विद्यापीठातील सूक्ष्मजीवशास्त्र विभागाच्या सहायक प्राध्यापक डाॅ. नीरज घनवटे आणि जैवतंत्रज्ञान विभागाचे सहयोगी प्राध्यापक डॉ. प्रशांत ठाकरे यांनी विकसित केलेल्या मेथडचे नाव आहे. तसे पेटंटसुद्धा या दोन संशोधकांच्या नावे भारत सरकारच्या पेटंट कार्यालयाकडून २७ ऑगस्ट २०२१ ला देण्यात आले आहे. कोणतीही जखम झाल्यानंतर ती लवकर बरी झाली नाही तर त्यामध्ये पस झाल्यानंतर विवीध प्रकारचे अँटिबायोटिक्स रुग्णांना डॉक्टरांकडून दिली जातात. मात्र अनेकदा विविध प्रकारची अँटिबायोटिक्स घेऊनही जखम बरी होण्याऐवजी आणखी वाढत जाते. यातही असे प्रकार बहुतांश वेळी रुग्ण रुग्णालयात उपचारासाठी दाखल असताना होतो. अशा वेळी रुग्णाच्या जखमेत कोणत्या प्रकारची ‘बायोफिल्म’ आहे, हे शोधणे गरजेचे असते. कारण त्यानंतरच रुग्णाला अँटिबायोटिक्स द्यायचे हे डॉक्टर ठरवतात.

मात्र ‘बायोफिल्म’ तसेच ते नष्ट करण्यासाठी आवश्यक औषधांचे प्रमाण माहीत नसताना अँटिबायोटिक्स दिले तर त्या औषधांचा दुष्परिणाम होऊन जखम बरी होण्याऐवजी अधिक मोठी होऊन गंभीर होऊ शकते. त्यामुळे ‘बायोफिल्म’ व ते नष्ट करण्यासाठी लागणारे औषधांचे प्रमाण शोधणे गरजेचे आहे. सद्यःस्थितीत ‘बायोफिल्म’ व ते नष्ट करण्यासाठी आवश्यक असलेले औषधांचे प्रमाण शोधण्यासाठी असलेल्या पारंपरिक पद्धतीमध्ये किमान ५ ते ६ दिवसांचा अवधी लागतो. हा कालावधी जास्त असल्यामुळे लवकर योग्य अँटिबायोटिक्स मिळू शकत नाही. त्यामुळेच अमरावती विद्यापीठातील या दोन संशोधकांनी विकसित केलेली मेथड महत्त्वपूर्ण ठरणारी आहे. कारण या मेथडद्वारे अवघ्या २४ ते ४८ तासांत ते शोधता येत असल्याचे संशोधक प्रा. डॉ. नीरज घनवटे यांनी दिव्य मराठीसोबत बोलताना सांगितले आहे. २०१७ पासून हे दोन्ही संशोधक या मेथडवर काम करत होते.

वेळेची बचत होणार
जखम झाल्यानंतर ती लवकर बरी झाली नाही तर त्यामधील ‘बायोफिल्म’ आणि ते नष्ट करण्यासाठी लागणारे औषधांचे प्रमाण शोधणे गरजेचे आहे. अशातही मधुमेह, वातासारख्या व्याधींनी ग्रस्त रुग्णांच्या जखम लवकर बऱ्या होत नाहीत. त्या वेळी पारंपरिक ‘मेथड’च्या तुलनेत ‘मेथड फॉर रॅपिड डिटेक्शन ऑफ मिनिमम बायोफिल्म अॅरेडिकेटिंग कॉन्सेन्ट्रेशन ऑफ अँटिबायोटिक्स अगेन्स्ट बॅक्टेरियल पॅथोजन्स’ ही अधिक महत्त्वाची ठरणारी आहे. कारण यामध्ये मोठ्या प्रमाणात वेळेची बचत होत आहे. सध्या अमरावतीत बायोफिल्म आणि ते नष्ट करण्यासाठी लागणारे औषधांचे प्रमाण शोधण्याच्या पद्धतींची सोय उपलब्ध नाही.

एका चाचणीसाठी केवळ १५० रुपये खर्च
अमरावतीत किंवा आजूबाजूच्या जिल्ह्यातील कोणत्याही रुग्णाला जखमेमधील बायोफिल्मचे ‘इनव्हेस्टिगेशन’ करायचे असल्यास आम्ही करून देऊ शकताे. यासाठी पारंपरिक उपचारांच्या तुलनेत खर्चसुद्धा अल्प असून एका चाचणीसाठी सुमारे १०० ते १५० रुपये खर्च असल्याचे डॉ. घनवटे यांनी सांगितले.

बातम्या आणखी आहेत...