आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
डाउनलोड कराशहर व जिल्ह्यातील ७९ गुंतवणूकदारांची शेअर मार्केटमध्ये तब्बल १८.५६ कोटी रुपयांची फसवणूक झाल्याप्रकरणी चार दिवसांपूर्वी शहर पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे. या प्रकरणातील मुख्य सूत्रधार परेश कारियाला मुंबई कारागृहातून ताब्यात घेण्याची प्रक्रिया करणे, गुन्ह्यातील अन्य आरोपींना समन्स बजावण्यासाठी अमरावती आर्थिक गुन्हे शाखेचे पथक ३ आॅगस्टला मुंबईला जाणार आहे.
शेअर मार्केटमध्ये योग्य गुंतवणूक करून देण्याचे आमिष देऊन ७९ गुंतवणूकदारांच्या मुच्युअल फंड व शेअर्सची परस्पर विक्री करण्यात आली आहे. यामध्ये तेजीमंदी डॉट कॉमचा संचालक अनिल गांधी व अनुग्रह स्टॉक अँड ब्रोकर प्रा.लि.चा संचालक परेश मुलजी कारिया या दोघांचा मुख्य सहभाग असल्याचे पोलिसांनी सांगितले आहे.
या दोघांसह अन्य चौघे असा एकूण सहा जणांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या प्रकरणात आर्थिक गुन्हे शाखेला तपासासाठी आरोपींची चौकशी करणे आवश्यक आहे. दरम्यान परेश कारिया याला काही महिन्यांपूर्वीच मुंबई पोलिसांनी अटक केली असून, तो सद्या मुंबईतील ऑर्थर रोड कारागृहात आहे. त्यामुळे त्याला प्रॉडक्शन वॉरंटवर ताब्यात घ्यावे लागणार आहे. ही प्रक्रिया करण्यासोबतच अन्य आरोपींचा शोध घेऊन त्यांना समन्स बजावणे आवश्यक आहे. त्यामुळे एक पथक बुधवारी मुंबईत जाण्याची शक्यता असल्याचे आर्थिक गुन्हे शाखेचे वरिष्ठ पोलिस निरीक्षक शिवाजी बचाटे यांनी सांगितले आहे.
फसगत झालेल्या गुंतवणूकदारांनी तेजीमंदी डॉटकॉमच्या मध्यस्थीने अनुग्रहच्या परेश कारियामार्फत शेअर बाजारात गुंतवणूक केली होती. दरम्यान परेश कारियाने काही महिने योग्य व्यवहार केल्यानंतर गुंतवणूकदारांना अंधारात ठेवून एडलवाईज या कंपनीकडून कर्ज घेतले व त्यावेळी गुंतवणूकदारांचे शेअर्स व म्युच्युअल फंड एडलवाईजकडे गहाण ठेवले होते. दरम्यान कारियाने हे कर्ज वेळेत न चुकवल्यामुळे एडलवाईजने गुंतवणूकदारांना कोणतीही माहिती न देता त्यांचे शेअर्स विकले आहे.
Copyright © 2022-23 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.