आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

दहा वर्षांची शिक्षा:जीवघेणा हल्ला करणाऱ्याला दहा वर्षांची शिक्षा ठोठावली ; तंटामुक्त समिती अध्यक्षावर केला होता हल्ला

अमरावती17 दिवसांपूर्वी
  • कॉपी लिंक

माहुली जहागिर पोलिस ठाण्याच्या हद्दीतील ब्राम्हणवाडा गोविंदपूर येथील तंटामुक्त समितीच्या तत्कालीन अध्यक्षावर गावातील एकाने जीवघेणा हल्ला चढवला होता. ही घटना चार वर्षांपूर्वी घडली होती. या प्रकरणात येथील विशेष जिल्हा न्यायालय (क्रमांक १), अतिरिक्त सत्र न्यायालय एस. एस. अडकर यांच्या न्यायालयाने हल्लेखोराला १० वर्षे सश्रम कारावासाची शिक्षा सुनावली आहे. हा निर्णय न्यायालयाने बुधवारी (दि. १५) दिला आहे. विधी सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, संजय अजाबराव तायडे (३२, रा. ब्राम्हणवाडा गोविंदपूर) असे शिक्षा झालेल्या आरोपीचे तर नितीन ज्ञानेश्वर भुयार (३२, रा. ब्राम्हणवाडा गोविंदपूर) असे तत्कालीन तंटामुक्त समितीच्या जखमी अध्यक्षाचे नाव आहे. २४ ऑगस्ट २०१८ ला नितीन भुयार हे शेतातून घरी परत येत असताना गावातच समाज मंदिराजवळ संजय तायडेने नितीन भुयार यांच्यावर कुऱ्हाडीने हल्ला केला होता. नितीन भुयार यांनी घटनेच्या काही दिवसांपूर्वी संजय तायडे याची अवैध दारु पकडून दिली होती. त्याचा राग असल्यामुळे तायडेने हा हल्ला भुयार यांच्यावर चढवला होता. हा हल्ला झाला त्यावेळी आरोपी संजय तायडेसोबत सुधाकर डोमाजी उईके (५०) आणि संजय नारायण खुळे (४०, दोघेही रा. ब्राम्हणवाडा गोविंदपूर) हे सोबत होते. दरम्यान, हल्ल्यात गंभीर जखमी झालेल्या नितीन भुयार यांना गंगाधर भुयार यांनी अमरावतीत रुग्णालयात दाखल केले होते मात्र भुयार यांची प्रकृती गंभीर असल्यामुळे त्यांना अमरावतीतून नागपूर दाखल केले होते. या प्रकरणात नितीन भुयार यांच्या वडीलांनी माहुली जहागिर पोलिसात तक्रार दाखल केली होती. तक्रारीवरून पोलिसांनी संजय तायडेसह सुधाकर उईके व संजय खुळे यांच्याविरुध्द प्राणघातक हल्ला केल्याप्रकरणी गुन्हा दाखल केला होता. या प्रकरणाचा तपास पुर्ण करुन माहुली पोलिसांनी २२ नोव्हेंबर २०१८ ला दोषारोपपत्र दाखल केले. प्रकरणाच्या सुनावणीदरम्यान सरकारी पक्षाकडून अॅड. दिलीप तिवारी यांनी एकूण दहा साक्षीदारांच्या साक्ष तपासल्या. यावेळी न्यायालयात संजय तायडे विरुद्ध गुन्हा सिद्ध झाल्यामुळे न्यायालयाने त्याला १० वर्ष सक्तमजुरी व दहा हजार रुपये दंड, दंड न भरल्यास सहा महिने अतिरिक्त कारावासाची शिक्षा सुनावली. याचवेळी सुधाकर उईके व संजय खुळे या दोघांची पुराव्याअभावी निर्दोष मुक्तता करण्यात आली आहे.

बातम्या आणखी आहेत...