आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
डाउनलोड करावाशीम जिल्ह्यात मालेगाव तालुक्यातील जऊळका आणि शिरपूर येथील प्राथमिक आरोग्य केंद्रामध्ये आरटी-पीसीआरच्या चाचणीसाठी घेण्यात आलेले घशातील स्रावाचे नमुने जास्त दिवस उघड्यावरच पडून असल्याने ११० नमुन्यांमध्ये बुरशी तयार झाल्याचा प्रकार १ मार्च रोजी उघड झाला आहे. वाशीम येथील प्रयोगशाळेने बुरशी आलेले हे ११० नमुने परत केले. नागरिकांना आता पुन्हा चाचणी करावी लागणार आहे.
एखाद्या व्यक्तीला कोरोनाचा संसर्ग झाला की नाही याचे निदान करण्यासाठी ‘आरटी-पीसीआर’ चाचणी केली जाते. ही चाचणी करण्यासाठी संदिग्ध रुग्णाच्या घशातील स्रावाचा नमुना घेतला जातो. स्रावाचे नमुने घेण्यासाठी आता प्रत्येक प्राथमिक आरोग्य केंद्रामध्ये सुविधा करण्यात आली आहे.
मालेगाव तालुक्यातील शिरपूर जैन आणि जऊळका प्राथमिक आरोग्य केंद्रामध्ये २४ फेब्रुवारीपासून घेतलेले नमुने आणि मालेगावमधील स्रावाचे असे एकूण ३१० नमुने घेऊन तालुका आरोग्य अधिकारी कार्यालयातील कर्मचारी संतोष घुले हे १ मार्च राजी वाशीम येथील कोविड प्रयोगशाळेमध्ये सायंकाळी ५ वाजता घेऊन आले. या ३१० नमुन्यांपैकी २०० नमुने प्रयोगशाळेच्या अधिकाऱ्यांनी स्वीकारले. तर उर्वरित ११० नमुन्यांमध्ये बुरशी तयार झाल्यामुळे हे नमुने लॅबच्या अधिकाऱ्यांनी स्वीकारण्यास नकार देऊन घुले यांना परत केले. ते नमुने घुले यांनी मालेगावच्या तालुका अधिकारी कार्यालयामध्ये रीतसर पाठवून दिले. ज्या ११० नमुन्यांमध्ये बुरशी तयार झाली ते नमुने चार दिवसांआधीचे होते, असे संबंधितांकडून सांगण्यात येत आहे. त्यामुळे आता त्या ११० नागरिकांचे नमुने पुन्हा घेण्याची वेळ आली आहे. कोरोना चाचणीमध्ये हलगर्जीपणा करणाऱ्या कर्मचाऱ्यांवर कारवाई होणार का, असा प्रश्न निर्माण झाला असून याबाबत तालुका आरोग्य अधिकारी डॉ. संतोष बोरसे यांच्याशी संपर्क साधला, पण संपर्क होऊ शकला नाही.
विशेष व्यवस्था करू
मालेगाव येथील घडलेला प्रकार गंभीर आहे. हा प्रकार नेमका कसा घडला, याची माहिती घेऊन संबंधित अधिकाऱ्यांना समज देण्यात येईल. यानंतर अशी चूक होणार नाही, याची काळजी घ्यायला सांगितले जाईल. यापुढे आरटी-पीसीआरचे नमुने संकलित करण्याची विशेष व्यवस्थाही करण्यात येईल. - डाॅ. अविनाश आहेर, जिल्हा आरोग्य अधिकारी, वाशीम
Copyright © 2022-23 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.