आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

मृतदेह:गॅस दाहिनी मध्येच बंद पडली, अर्धवट जळालेल्या मृतदेहाची लाकडे जाळून उत्तरक्रिया

अमरावती11 दिवसांपूर्वी
  • कॉपी लिंक

येथील हिंदू स्मशान भूमीतील गॅस दाहिनी मध्येच बंद पडल्याने अर्धवट जळालेल्या एका मृतदेहाची उत्तरक्रिया लाकडे जाळून पूर्ण करण्यात आली. गॅस दाहिनी सुरू केल्यापासून आजपर्यंतच्या इतिहासात पहिल्यांदाच असा प्रकार घडला. दरम्यान, उत्तरक्रिया अशाप्रकारे पूर्णत्वास नेण्यापूर्वी संबंधित कुटुंबीयांची सहमती घेण्यात आल्याचे हिंदू स्मशान संस्थेचे अध्यक्ष अॅड. आर. बी. अटल यांनी ‘दिव्य मराठी’ला सांगितले.

प्राप्त माहितीनुसार एका प्रौढ व्यक्तीचे दोन दिवसांपूर्वी नागपुरात निधन झाले. परंतु नातेवाईक यायचे असल्याने त्यांचे पार्थिव शीतपेटीत ठेवण्यात आले होते. त्यासाठीची शीतपेटी हिंदू स्मशान संस्थेकडूनच घेण्यात आली. दरम्यान आज, सोमवारी दुपारी त्या व्यक्तीचे पार्थिव उत्तरक्रियेसाठी हिंदू स्मशान संस्थेत आणण्यात आले. यावेळी लाकडे जाळून उत्तरक्रिया पूर्ण करायची की त्यासाठी गॅस दाहिनीचा वापर करावा, असे दोन्ही पर्याय नातेवाईकांपुढे मांडण्यात आले. विचारांती त्यांनी गॅस दाहिनीचा पर्याय निवडला. परंतु मृतदेह अर्धवट जळाल्यानंतर गॅस दाहिनी बंद पडली.

त्यानंतर लगेच ऑपरेटला पाचारण करुन गॅस दाहिनी दुरुस्त करण्याचा प्रयत्न केला गेला. मात्र ती पूर्ववत होऊ शकली नाही. दरम्यान, पार्थिव अर्धवट जळाले असल्याने ते बाहेर काढून त्यावर उत्तरक्रिया करणेही शक्य नव्हते, शिवाय मशीन ‘लॉक’ असल्याने ती उघडणेही अशक्यप्राय होते. शेवटी आणीबाणीचा पर्याय म्हणून मशीनच्या चेंबरमध्ये लाकडे, कापूर व राळ टाकून त्या मृतदेहाची उत्तरक्रिया पूर्ण करण्यात आली. तत्पूर्वी संस्थेचे अध्यक्ष व इतर पदाधिकारी घटनास्थळी पोहोचले होते. त्यांनी संबंधित व्यक्तीच्या नातेवाइकांशी सल्लामसलत करुन सामोपचाराने हा विषय निस्तारला.

बातम्या आणखी आहेत...