आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

अंबाडा गावातील खळबळजनक प्रकार:आंतरजातीय विवाहानंतर मुलीला नेले फरफटत; पत्नीच्या नातेवाइकांविरुद्ध पतीची पोलिसांत तक्रार; मुलीचा जबाब ठरणार महत्त्वाचा

अमरावती10 दिवसांपूर्वी
  • कॉपी लिंक

मोर्शी पोलिस ठाण्याच्या हद्दीतील अंबाडा गावातील एका २२ वर्षीय युवकाने तालुक्यातील एका गावातील १९ वर्षीय युवतीसोबत २८ एप्रिलला आंतरजातीय प्रेमविवाह केला. मात्र मुलींच्या घरच्यांना हा विवाह मान्य नव्हता. दरम्यान, ४ मे रोजी मुलीचे माहेरकडील नातेवाईक आलेत व त्यांनी मुलीला पतीच्या घरातून अक्षरश: फरफटत नेले, असा आरोप करुन पतीने माेर्शी पोलिसांत तक्रार दिली.

तक्रारीवरून पोलिसांनी चौकशी सुरू केली असून मुलीचा शोध सुरू केला आहे. या घटनेने संपूर्ण जिल्ह्यात चांगलीच खळबळ उडाली आहे. दरम्यान, एक व्हीडीओ आज सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल झाला असून, तो याच प्रकरणाचा असल्याची चर्चा परिसरात सध्या सुरू आहे.

२२ वर्षीय युवक व १९ वर्षीय युवतीचे प्रेमसंबंध असल्यामुळे त्यांनी लग्न करण्याचा निर्णय घेतला. दरम्यान २८ एप्रिलला या दोघांनी अमरावती शहरातील आर्य समाज मंदीरात विवाह केला. तसे विवाह प्रमाणपत्र सुद्धा युवकाकडे आहे.

दरम्यान, लग्नानंतर मुलगी तिच्या पतीकडे अंबाडा येथे राहत असतानाच ४ मे रोजी दुपारच्या सुमारास मुलीच्या माहेरील काही मंडळी अंबाड्यात त्या युवकाच्या घरी पोहचले. यावेळी त्यांनी मुलीला सोबत चलण्यासाठी म्हटले, मात्र मुलगी त्यांच्यासोबत जायला तयार नव्हती. त्यावेळी अक्षरश: तिच्या पतीच्या घरातून तिला उचलून अाणि फरफटत नेले. नेमके तिला कुठे नेले, याबाबतही माहिती दिली नाही. त्यामुळे मुलीच्या पतीने तत्काळ या प्रकरणाची माहिती मोर्शी पोलिसांना दिली.

मोर्शी पोलिसांनी मुलीचा शोध सुरू केला आहे. मात्र शनिवारी रात्री दहा वाजेपर्यंत मोर्शी पोलिस मुलीपर्यंत पोहोचले नव्हते. दरम्यान, नेमका प्रकार मुलीच्या जबाबानंतर समोर येईल, त्यादृष्टीने पोलिसांनी चौकशी सुरू केली आहे. मुलीला काही व्यक्ती जबरीने फरफटत नेत असल्याचा एक व्हीडीओ सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल झाल्यामुळे या प्रकरणामुळे जोरदार खळबळ उडाली आहे.

बातम्या आणखी आहेत...