आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

स्वतंत्र मोहीम:बालकांच्या लसीकरणासाठी आरोग्य विभाग राबवणार आता स्वतंत्र मोहीम

अमरावती2 दिवसांपूर्वी
  • कॉपी लिंक

मुंबई, नाशिक व नागपूरमध्ये गोवरचे रुग्ण आढळल्याच्या पार्श्वभूमीवर जिल्ह्याची आरोग्य यंत्रणा दक्ष झाली असून, खबरदारीचा उपाय म्हणून लसीकरणासाठी स्वतंत्र मोहीम आखण्यात आली आहे. ज्या बालकांचा दुसरा डोस अजूनही बाकी आहे, अशा बालकांना या मोहिमेंतर्गत गोवर-रुबेलाचा डोस देण्यात येईल. त्यासाठी सर्व शासकीय रुग्णालयातील तालुका वैद्यकीय अधिकाऱ्यांसह (टीएमओ) खासगी डॉक्टरांच्या संघटनेशी पत्रव्यवहार केला आहे.

गोवरची लागण मुंबई ते नागपुर अशी पसरली आहे. त्या ठिकाणी काही रुग्ण नोंदवले गेले असून त्यांचा उपचारही सुरु झाला आहे. परंतु तशी वेळ अमरावतीकरांवर ओढवू नये, यासाठी आरोग्य विभागाने अलर्ट जारी केला आहे. साधारणत: दोन वर्षांपर्यंतच्या लहान मुलांना गोवर होतो. त्वचा कोरडी पडून त्यावर ओरखडे दिसणे, तीव्र अंगदुखी व ताप येणे अशी या आजाराची लक्षणे आहेत. त्यामुळे मुलांना ताबडतोब वैद्यकीय तज्ज्ञांकडे नेऊन उपचार सुरु करावा लागतो. सध्या जिल्ह्यात अशा पद्धतीचे तीनच रुग्ण आढळून आले. अचलपूर उपजिल्हा रुग्णालयांतर्गत एक व अंजनगाव सुर्जी रुग्णालयांतर्गत दोन अशी त्या रुग्णांची विभागणी आहे. हे तिन्ही रुग्ण दोन वर्षे वयाच्या आतील असून, त्यांच्यावर योग्य उपचार केला जात आहे.

जन्मानंतर नवव्या महिन्यात पहिला तर अठराव्या महिन्यात दुसरा असे गोवर-रुबेलाचे दोन डोस प्रत्येकाला दिले जातात. आरोग्य विभागाकडे उपलब्ध माहितीनुसार जिल्ह्यात गेल्या दोन वर्षांत जन्माला आलेल्या बालकांपैकी ९८ टक्के बालकांचा पहिला डोस आटोपला असून दुसरा डोस घेणाऱ्यांची संख्या ८५ टक्क्यांवरच थांबली आहे. त्यामुळे दुसऱ्या डोससाठी पात्र असलेल्या बालकांचा शोध घेऊन त्यांचे लसीकरण पूर्ण करण्याचे निर्देश सर्व तालुका वैद्यकीय अधिकाऱ्यांना देण्यात आले आहे. त्याचवेळी ही सूचना जिल्ह्यातील खासगी डॉक्टरांच्या संघटनेला करण्यात आली आहे.

खासगी डॉक्टरांनाही सूचना
जिल्हा आरोग्य अधिकारी कार्यालयामार्फत जिल्ह्यातील सर्व तालुका वैद्यकीय अधिकारी व इतर पुरक यंत्रणांना दक्षतेचा इशारा देत लसीकरण वाढवण्याचे निर्देश दिले आहेत. दरम्यान, खासगी डॉक्टरांकडे येणाऱ्यांचीही मोजदाद व्हावी, यासाठी त्यांच्या संघटनांनाही सूचना देण्यात आल्या आहेत. इंडियन मेडिकल असोसिएशनसह (आयएमए) इतर संघटनेच्या पदाधिकाऱ्यांशी पत्रव्यवहार करुन त्यांनाही याबाबत विनंती करण्यात आल्याचे प्रभारी जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. सुभाष ढोले यांनी ‘दिव्य मराठी’ लगा सांगितले.

अमरावती, धारणी चिंताजनक
जिल्ह्यात दुसरा डोस घेणाऱ्या बालकांची सरासरी संख्या ८५ टक्के असली तरी तुलनेने अमरावती व धारणीची संख्या याहून कमी आहे. त्यामुळे या दोन तालुक्यात अधिक दक्षतेचा इशारा देण्यात आला आहे. धारणी तालुक्यातील काही बालके त्यांच्या पालकांच्या स्थलांतरामुळे सध्या घरी नाहीत. तरीही त्यांचा शोध घेऊन आहे त्याच ठिकाणी त्यांना गोवर-रुबेलाची लस पुरवण्याची व्यवस्था केली जाणार आहे. -डॉ. सुभाष ढोले, प्रभारी जिल्हा आरोग्य अधिकारी, अमरावती.

बातम्या आणखी आहेत...