आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
डाउनलोड करामनपा दवाखान्यांची सध्या दुर्दशा झाली आहे. कोरोना काळात तरी हे दवाखाने सुधारतील, अशी सर्वसामान्यांची अपेक्षा होती, मात्र त्यांच्या स्थितीत अजिबात बदल झाला नाही. सतत उणिवांच्या तक्रारी येत आहेत. कुठे औषध नाही तर कुठे इंजेक्शन नाही, कुठे डॉक्टर नाही, अशा एक ना अनेक बाबी उजेडात येत राहतात. यातही कहर म्हणजे मनपा दवाखान्यात खाटांची सोय नाही. त्यामुळे येथे दिवस-दोन दिवस कोणालाही उपचार घेण्याची साेय नाही. हे दवाखाने केवळ शासकीय योजना राबवण्यापुरते मर्यादित राहिले आहेत.
मनपा आयुक्त डॉ. प्रवीण आष्टीकर यांनी दवाखान्यांची स्थिती सुधारली जाईल, याकडे मी प्राधान्याने लक्ष देणार असे म्हटले आहे. मनपाकडे दवाखाने व डिस्पेन्सरीज आहेत. मात्र त्या ठिकाणी कधी औषध असते तर कधी नसते. हमखास औषध मिळेल, अशी कोणत्याही रुग्णाला खात्री नसते. एवढेच काय तर गरजेचे इंजेक्शन हमखास संपलेले असते अशी देण्याचीही सोय नाही. यासाठी रुग्णाला जिल्हा सामान्य रुग्णालयासह इतर शासकीय रुग्णालयांमध्ये पाठविले जाते.
मनपाच्या दवाखान्यांमध्ये उपचारासाठी आर्थिकदृष्ट्या कमकुवत गटातील रुग्णच मोठ्या संख्येत जात असतात. कारण तेथे एकतर नि:शुल्क किंवा अल्प खर्चात उपचार होतो. खासगीच काय पण शासकीय रुग्णालयात जाण्यापूर्वी त्यांना विचार करावा लागतो. कारण दोन्ही रुग्णालयांमध्ये औषध बाहेरून घ्यावे लागते. अशात गरीबांना मनपाच्याच हॉस्पिटलचा आधार वाटतो. परंतु, भरवशाच्या म्हशीला टोणगा म्हणतात त्यानुसार जेव्हा आवश्यकता असते तेव्हाच मनपाच्या दवाखान्यांमधील औषध संपलेले असते. काही भागात मनपाच्या डिस्पेंसरीही आहेत. तेथे सर्दी, ताप, खोकल्यावर औषध दिले जाते. परंतु, येथेही नियमितपणा नसल्याच्या नागरिकांच्या तक्रारी आहेत. काही डिस्पेंसरींची स्थिती तर मोडकळीस आल्याप्रमाणे झाली आहे.
मनपाच्या दवाखान्यात औषधांची चणचण असल्यामुळे गेल्या काही महिन्यांपासून औषधी खरेदीची प्रक्रिया सुरू आहे. परंतु, अजुनही त्यात नियमितपणा आला नसल्याने काही दवाखान्यांमध्ये पूर्ण तर काही दवाखान्यांमध्ये अपूर्ण औषध असते. बरेचदा औषधांचा तुटवडा भासतो. मनुष्यबळाबाबतही असेच आहे. काही डॉक्टर्स तर कंत्राटी तत्त्वावर घेण्यात आले आहेत. बरेचदा त्यांना नियमित वेतनही मिळत नाही. अशात त्यांना काम करण्याचे खरेच इच्छा होईल काय, असा प्रश्न पडतो. या अशा दुर्दशेतून मनपा रुग्णालयाला बाहेर काढावे लागणार आहे. तेव्हाच शहरातील सर्वसामान्य नागरिकांची पावले या दवाखान्यांकडे वळतील.
राज्यमंत्र्यांनीही दिले खाटांची सोय करण्याचे निर्देश
नुकतीच राज्यमंत्री बच्चू कडू यांनी मनपात बैठक घेतली. त्यावेळी त्यांनी प्रकर्षाने मनपाच्या दवाखान्याच्या स्थितीची माहिती घेतली. यात अनेक उणिवा पुढे आल्या. त्या तत्काळ भरून काढण्याचे निर्देश त्यांनी दिले. मनपाच्या बडनेरा येथील मोदी हॉस्पिटलमध्ये प्रशस्त जागा आहे. तेथे खाटांची सोय करता येऊ शकते. परंतु, आर्थिक तंगीत असलेल्या मनपाकडे ना स्थिती सुधारण्याइतपत पैसा आहे, न मनुष्यबळ. कारण मनपा दवाखान्यात रुग्णाला जर दाखल केले तर त्यासाठी आधी यंत्रणा उभारावी लागेल. यंत्रणा उभारण्यासाठी पैशाची आवश्यकता असते.
औषधी खरेदी प्रक्रिया सुरू
अमरावती शहरातील महानगरपालिकेच्या दवाखान्यांसाठी औषध खरेदी प्रक्रिया सुरू आहे. कुठे कमी तर कुठे जास्त अशी सध्या औषध साठयाची स्थिती आहे. तसेच डॉक्टर व मनुष्यबळही तंतोतंत आहे. तारखेड्यातील हॉस्पिटलमध्ये खाटांची सोय केली जात आहे. -डॉ. विशाल काळे, आरोग्य अधिकारी मनपा.
मनपाचे दवाखाने
१. आयसोलेशन हॉस्पिटल, नवाथे, २. दस्तूर नगर, ३. भाजी बाजार, ४. महेंद्र कॉलनी, ५. मसानगंज, ६. युएचपी संजीवनी, ७. हैदरपुरा, ८. यंग मुस्लीम, ९. सबनीस प्लॉट, १०. हरिभाऊ वाट, बडनेरा, ११. विलासनगर, १२. बिच्छू टेकडी, १३. मोदी हॉस्पीटल बडनेरा व डिस्पेंसरीज.
महापालिकेचे ५० खाटांचे हॉस्पिटल अजूनही अपूर्णच
अजूनही मनपाला ५० खाटा असलेले तारखेडा, नमक कारखान्याजवळील ५० खाटांचे हाॅस्पिटल सुरू करता आले नाही. अजूनही ते सुरू करण्याची प्रक्रिया सुरू आहे. या ठिकाणी लागणाऱ्या खाटा, उपचाराचे साहित्य, आॅक्सिजन सिलिंडर या साहित्याच्या जुळवा-जुळवीची प्रक्रिया अजुनही सुरू आहे. गेल्या एक वर्षापासून प्रक्रिया पूर्ण झालीच नाही.
Copyright © 2022-23 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.