आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

दिव्य मराठी विशेष:‘पाडवा पहाट’मधून मांडला भारतीय स्वातंत्र्याचा इतिहास; ‘संस्कार भारती’तर्फे दोन वर्षाच्या खंडानंतर व्यंकटेश लॉनमध्ये पुन्हा दुमदुमले मंगल स्वर

अमरावती4 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक

कोरोनामुळे गेली दोन वर्षे रखडलेली ‘संस्कार भारती’ची ‘पाडवा पहाट’ शनिवारी एका बहारदार कार्यक्रमाने सादर झाली. या गीत-संगीत-नाट्यपदांच्या मैफिलीने भारत देशाचा पारतंत्र्य ते स्वातंत्र्याचा इतिहास मांडला.

बडनेरा रोडस्थित व्यंकटेश लॉनमध्ये पार पडलेल्या या कार्यक्रमात शहरातील शंभराहून अधिक कलावंतांनी त्यांच्या कलेचा अविष्कार रसिक प्रेक्षकांपुढे मांडला. पेशवे आणि मोगलकालीन राजेशाहीपासून ते आत्ताच्या माहिती व तंत्रज्ञान क्षेत्रातील लक्षणीय क्रांतीचा सुवर्ण काळ या कार्यक्रमांमुळे उपस्थितांपुढे ठेवला गेला. दरवर्षी एक विशिष्ट ‘थीम’ ठरवून विविध सामाजिक व राष्ट्रीय आशयाचा संदेश देण्याची संस्कार भारतीची गेल्या वीस वर्षांपासूनची परिपाठी आहे.

त्याला अनुसरून यावर्षी भारतीय स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवी वर्षानिमित्त स्वातंत्र्यलढ्यात सर्वस्वाची आहुती देणाऱ्या स्वातंत्र्य सैनिकांचे पुण्यस्मरण व स्वातंत्र्यानंतर आपल्या देशाने प्राप्त केलेल्या उपलब्धीचे परिणामकारक सादरीकरण केले गेले.

छत्रपती शिवाजी महाराजांनी स्थापन केलेले हिंदवी स्वराज्य, पाहुणे म्हणून आले आणि पुढे राज्यकर्ते बनले या उक्तीत चपखल बसणारे इंग्रजांचे आक्रमण, मंगल पांडे यांच्या नेतृत्वातील १८५७ चा उठाव, टिळक-गांधी-नेहरु-सावरकर, श्यामाप्रसाद मुखर्जी, सरदार वल्लभभाई पटेल, यांनी सुरु केलेली स्वातंत्र्य चळवळ, स्वातंत्र्यानंतर भारताने अत्यंत धैर्याने पुढे जात उद्योग, तंत्रज्ञान, शिक्षण, कृषी, दुग्ध व्यवसायात मारलेली उसळी, पायाभूत सुविधांच्या संदर्भात भारताने घेतलेली उत्तुंग झेप, महात्मा फुले-सावित्रीबाई फुले-फातीमा शेख यांनी उघडलेली मुलींसाठीची पहिली शाळा, ऋग्वेद, यजुर्वेद, सामवेद यातून फुललेला संस्कारक्षम शिक्षणाचा पसारा, चाणक्य, कालीदास, संत ज्ञानेश्वर, संत तुकाराम, सावता माळी यांच्यापासून ते विदर्भातील प्रज्ञाचक्षू गुलाबराव महाराज असा समाजसुधारकांचा प्रवासच मंचावर सादर झाला. एकाहून एक सरस प्रसंग आणि इतिहासाची खडान् खडा माहिती असलेली सुवर्णपाने एकामागून एक उघडली जात होती. जणू हा कार्यक्रम संपूच नये, असे प्रेक्षकांचे म्हणणे होते. परंतु भारताचे हे वैभव असेच कायम राहो, किंबहुना दिवसेंदिवस ते अधिक तेजाने पुढे जावो, या आशयाच्या गीताने या कार्यक्रमाची सांगता झाली.

संस्कार भारतीच्या जिल्हाध्यक्ष प्रा. डॉ. जयश्री वैष्णव आणि त्यांच्या सहकाऱ्यांनी अवघ्या पंधरा दिवसात या कार्यक्रमाची तयारी पूर्ण केली. एवढ्या कमी वेळात इतका सुंदर कार्यक्रम सादर केल्याबद्दल उपस्थित रसिक प्रेक्षकांनी त्यांचे मनापासून कौतुक केले. कार्यक्रमाचे बहारदार संचालन नव्हे भारताच्या समग्र इतिहासाची उत्तम मांडणी प्रसाद खरे व रसिका वैष्णव यांनी केली. रसिक प्रेक्षकांची गर्दी नेहमीप्रमाणेच प्रचंड होती, त्यामुळे व्यंकटेश लॉनचा अख्खा परिसर माणसांनी तुडुंब भरला होता.संस्कार भारतीच्या “साधयती संस्कार भारती” या ध्येयगीताने कार्यक्रमाची सुरुवात झाली.

असा सरकत गेला कार्यक्रम : पहिल्याच प्रसंगात मदोन्मत्त धनानंदाचा अहंकार चूर करणाऱ्या आर्य चाणक्याच्या प्रत्ययकारी चित्रणाने प्रेक्षकांच्या टाळ्या घेतल्या. शक, हूण, अरब, तुर्क, मोगल या आक्रमकांशी दोन हात करणाऱ्या भारतीय नरवीरांच्या उल्लेखानंतर छत्रपती शिवाजी महाराजांचे ‘राजं आलं’ हे गौरवगीत सादर झाले. मराठा साम्राज्यानंतर ब्रिटिश आक्रमणाने विद्ध झालेल्या देशात क्रांतीचे स्फुल्लिंग चेतवणाऱ्या अठराशे सत्तावनच्या स्वातंत्र्यसमराचा प्रसंग आणि त्यानंतर स्वातंत्र्यासाठी विविध क्रांतिकारक व महापुरुषांनी केलेल्या आंदोलनाचे संदर्भ देऊन स्वतंत्र भारतातील सर्वंकष क्रांती सादर झाली.

शाळा प्रारंभ करणाऱ्या सावित्रीबाई व जोतिबा फुले यांच्या सामाजिक कानउघाडणी करणारा नाट्यप्रवेश, पुलं देशपांडे यांनी अजरामर केलेल्या रावसाहेब, अंतू बरवा, नारायण या पात्रांच्या माध्यमातून वर्तमान परिस्थितीवर भाष्य करीत विनोदाची फोडणी देण्यात आली. सर्वात शेवटी “मैं रहूं या ना रहूं,यह देश रहना चाहीये’ हे प्रत्येकाचे स्फुल्लिंग चेतवणारे गीत सादर झाले.

बातम्या आणखी आहेत...