आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

उपोषण मागे:नगरपालिका प्रशासकांच्या मध्यस्थीमुळे उपोषण मागे; बालगृहाचे संचालक गजानन देशमुख यांनी महाराष्ट्र दिनी बेमुदत उपोषण सुरू केले होते

दर्यापूर21 दिवसांपूर्वी
  • कॉपी लिंक

शहरातील गाेरक्षणस्थित राठीपुरा भागातील श्री संत गाडगे महाराज बालगृह परिसरात तेथीलच एका व्यक्तीने म्हशीचा गोठा बांधून व शेणखताचा ढिगारा करून आरोग्याचा प्रश्न निर्माण केला होता. त्यामुळे गोठ्याचे अतिक्रमण तत्काळ हटवा, यासाठी बालगृहाचे संचालक गजानन देशमुख यांनी महाराष्ट्र दिनी बेमुदत उपोषण सुरू केले होते.

तर दुसरीकडे आश्रम शाळेचे प्रसाधनगृह अतिक्रमणात आहे, असा दावा करत बालगृहाच्या बाजूला राहणारे शशीकुमार काळे यांनीही उपोषण सुरू केले होते. एकमेकांविरोधात पालिका कार्यालयासमोर उपोषणास बसल्याने नगरपालिका प्रशासन पेचात पडले होते.

दरम्यान नगर पालिकेसमोरील दोन्ही उपोषण मंडपास मुख्याधिकारी तथा प्रशासक पराग वानखडे यांनी भेट देऊन दोन्ही प्राप्त तक्रारी, समस्येबाबत उपोषणकर्त्यांशी सामंजस्याने चर्चा करत पुढील कारवाई नियमानुसारच केली जाईल, असे आश्वासन दिले. या आश्वासनानंतर दोन्ही उपोषणकर्त्यांनी उपोषण मागे घेतले आहे.

दरम्यानच्या काळात दोन्ही उपोषणकर्त्यांच्या मंडपाला शहरातील अनेक पक्ष, संघटना व राजकीय व्यक्तींनीही भेटी दिल्या होत्या. दोन्ही उपोषणकर्त्यांच्या समस्येवर पालिका प्रशासन आगामी काळात नियमानुसार कोणती कारवाई करते, याकडे शहरवासीयांचे लक्ष लागले आहे.

बातम्या आणखी आहेत...