आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
डाउनलोड कराखासदारांच्या अध्यक्षतेखालील जिल्हा विकास व संनियंत्रण समितीची (दिशा) बैठक सोमवारी जिल्हाधिकारी कार्यालयात पार पडली. या बैठकीत घरकुल, मेळघाटातील वीज जोडणी व कृषीच्या मुद्यावर विशेष चर्चा करण्यात आली. कामात उणिवा राहिल्याने काही विभागांबाबत खासदारांनी नाखुशी दर्शवली तर काही विभागांची प्रशंसाही केली. तसेच लोकांसाठी कामे करा, त्यांना मदत होईल, असे वागा अशा सूचनाही दिल्या. समितीच्या सदस्य सचिव या नात्याने जिल्हाधिकारी पवनीत कौर, महापालिका आयुक्त डॉ. प्रवीण आष्टीकर, जि. प. सीईओ अविश्यांत पंडा व विविध विभागप्रमुख यावेळी उपस्थित होते. जिल्ह्यात केंद्र व राज्य शासनाच्या निधीतून सुमारे २९ विभागांचे कामकाज चालते. हे सर्व २९ विभाग लोकाभिमुख आहेत. परंतु कामात उणिवा राहिल्याने खासदारांकडे अनेकांच्या तक्रारी येतात. विशेषतः पाणीपुरवठा, घरकुल आणि वीजपुरवठ्याच्या तक्रारी सुमार आहेत, असे खासदारांचे म्हणणे हाेते. त्यामुळे महाराष्ट्र जीवन प्राधिकरण, ग्रामीण पाणी पुरवठा, महावितरण आणि कृषी विभागाच्या अधिकाऱ्यांनी योग्यपणे कामे करावीत, अशा त्यांच्या सूचना आहेत. जिल्ह्यातील अनेक अंगणवाड्या भाडे-तत्त्वावरील इमारतीत असून, त्यांना जागा मिळवून द्यावी. तसे प्रस्ताव घेऊन महापालिका, जिल्हा परिषद व स्थानिक स्वराज्य संस्थांनी कार्यवाही करावी. समाज मंदिर व इतर ठिकाणी असलेल्या अंगणवाड्यांचाही समावेश करावा. अंगणवाड्यांना कायमस्वरूपी जागा मिळाल्यास बालकांसाठी महत्वाची शैक्षणिक सुविधा निर्माण होईल, असे निर्देशही खासदार नवनीत राणा यांनी दिले. पीएमएवाय अर्थात प्रधानमंत्री आवास योजनेत मनपा क्षेत्रातील ९ हजार घरकुलांच्या निर्मिती कार्याचा आढावा त्यांनी घेतला. पात्र लाभार्थी घरकुलापासून वंचित राहू नये, असे निर्देशसुद्धा खासदार राणा यांनी दिले. स्वच्छ भारत अभियानात वैयक्तिक व सार्वजनिक स्वच्छतागृहांची निर्मिती, सांडपाणी व घनकचरा व्यवस्थापन, राष्ट्रीय ग्रामीण पेयजल कार्यक्रम, प्रधानमंत्री कृषी सिंचन योजना, भूमी-अभिलेख आधुनिकीकरण, शालेय मध्यान्ह भोजन योजना, प्रधानमंत्री उज्ज्वला योजना, प्रधानमंत्री खनिज क्षेत्र कल्याण योजना आदी विविध योजनांचा आढावासुद्धा या बैठकीत घेण्यात आला. बैठकीचे सूत्रसंचालन जि.प.चे उपमुख्य कार्यकारी अधिकारी श्रीराम कुळकर्णी व डीआरडीएच्या प्रकल्प संचालक प्रीती देशमुख यांनी केले.
Copyright © 2022-23 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.