आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

दोघांना अटक:हल्लेखोरांनी मारलेला चाकू तरुणाच्या पाठीत अडकला ; शस्त्रक्रिया करुन काढला बाहेर

अमरावती3 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक

शहरातील वडाळी परिसरातील पुलाजवळ उभ्या असलेल्या एका तरुणावर चाकूने प्राणघातक हल्ला करण्यात आला. यावेळी हल्लेखोराने तरुणाच्या पाठीत मारलेला चाकू अडकला. जवळपास ३ ते ४ इंच लांबीचे चाकूचे धारदार पाते पाठीतच अडकून होते. सुमारे अडीच ते तीन तासानंतर शस्त्रक्रिया करुन हा चाकू तरुणाच्या पाठीतून डॉक्टरांनी बाहेर काढला. ही घटना सोमवारी (दि. १५) दुपारी घडली. या प्रकरणी दोघांना अटक करण्यात आली आहे.

सम्राट मनोज तायडे (१८, रा. गजानननगर) असे जखमीचे नाव आहे. या प्रकरणात सूरज अनिल धंदर (वय २२) व रोहित अनिल धंदर (वय२१, दोघेही रा. अशोकवाटीका, अमरावती) यांना अटक करण्यात आली आहे. सम्राट हा मित्र अनिकेत देवानंद वरघट (वय १९, रा. गजानननगर) याच्यासोबत वडाळी येथील पुलाजवळ गप्पा करत होते. यावेळी सूरज व रोहित हे दोघे तेथे आले. ‘माझा भाऊ रोहितला कोणी मारले’, अशी विचारणा करून सूरजने सम्राट व अनिकेतसोबत वाद घातला. यावेळी सम्राटने आम्हाला काही माहीत नसल्याचे म्हटल्यावर सूरजने चाकू काढून त्याच्यावर हल्ला केला. यावेळी रोहितने सम्राटला लाथाबुक्क्यांनी मारहाण केली. तसेच वीट फेकून मारली. सम्राट व अनिकेतने आरडाओरड केल्यावर सूरज व रोहित तेथून पळून गेले.

यावेळी अनिकेतने आपल्या काही मित्रांसह सम्राटला रुग्णालयात दाखल केले. त्यानंतर खासगी रुग्णालयात सम्राटवर शस्त्रक्रिया करुन पाठीत अडकलेला चाकू बाहेर काढण्यात आला. त्यानंतर अनिकेत वरघट याने फ्रेजरपुरा पोलिसांना माहिती देऊन घटनेची तक्रार दाखल केली. तक्रारीवरुन पोलिसांनी सूरज व रोहितविरुद्ध गुन्हा दाखल करून त्यांना अटक केली. मंगळवारी त्यांना न्यायालयात हजर करण्यात आले. न्यायालयाने त्यांना १८ ऑगस्टपर्यंत पोलिस कोठडी सुनावली आहे. दरम्यान, या प्रकाराने शहरातील गुंडागर्दीने डोके वर काढल्याचे स्पष्ट होत आहे.

बातम्या आणखी आहेत...