आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

पाणी पुरवठा:दीड मीटर व्यासाची मुख्य जलवाहिनी फुटली; अमरावतीचा पाणी पुरवठा दोन दिवस बंद

अमरावतीएका महिन्यापूर्वी
  • कॉपी लिंक

मोर्शी तालुक्यातील सिंभोऱ्याहून अमरावतीशी जोडलेली मजीप्राची मुख्य जलवाहिनी गुरुवारी सायंकाळी फुटल्याने रहाटगावजवळ पाणीच पाणी झाले होते. दरम्यान अचानक ओढवलेल्या या संकटामुळे अमरावती व बडनेराचा पाणी पुरवठा पुढील दोन दिवस बंद राहणार आहे. महाराष्ट्र जीवन प्राधिकरणचे कार्यकारी अभियंता विवेक सोळंके आणि उप कार्यकारी अभियंता अजय लोखंडे हे दोन्ही अधिकारी चमूसह घटनास्थळावर पोहोचले. जलवाहिनी ज्या ठिकाणी फुटली त्याच्या बाजूला एका बहुमजली इमारतीचे बांधकाम सुरू आहे. या बांधकामासाठी त्या ठिकाणी मोठ्या प्रमाणात खोदकाम करण्यात आल्याने पाणी त्या खड्ड्यात साचले आहे. जोपर्यंत पाणी बाहेर काढले जात नाही, तोपर्यंत पाइपलाइन नेमकी कुठे फुटली, हे शोधणे अवघड आहे. त्यामुळे रात्रीला सर्वप्रथम खड्ड्यातील पाण्याचा उपसा केला जाणार आहे. पाण्याचा उपसा करण्यासाठी मजीप्राने भाडे तत्त्वावरील यंत्रणा नियुक्त केली आहे. काही पोकलेन मशीन व पाणी उपसणारे पंप लवकरच घटनास्थळावर पोहोचून काम सुरू होईल, असे उपकार्यकारी अभियंता अजय लोखंडे यांनी ‘दिव्य मराठी’ला सांगितले. त्यांच्या मते मध्यरात्रीपर्यंत उपसा पूर्ण झाल्यास पुढील दुरुस्तीचे काम सुरू होईल. त्यामुळे हे काम किती काळ चालेल हे सांगणे शक्य नाही. परंतु अमरावती व बडनेरा शहराचा पाणी पुरवठा शक्य तेवढ्या लवकर कसा पूर्ववत करता येईल, याचा प्रयत्न करणार आहे. मंत्र्यांच्या बैठकीला जाता आले नाही : राज्याचे जलसंपदा राज्यमंत्री बच्चू कडू यांनी शुक्रवारी मुंबईत एक महत्वाची बैठक बोलावली होती. या बैठकीला कार्यकारी अभियंता व उपकार्यकारी अभियंता जाणार होते. बडनेराहून गुरुवारी रात्री विदर्भ एक्स्प्रेसने ते निघणार होते. परंतु ऐनवेळी ओढवलेल्या या संकटामुळे त्यांना मुंबईचा बेत रद्द करावा लागला. मुंबईच्या दिशेने निघण्याच्या वेळीच ही वार्ता त्यांच्यापर्यंत पोहोचल्याने त्यांना घटनास्थळाकडे वळावे लागले.

बातम्या आणखी आहेत...