आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
डाउनलोड कराजिल्ह्यात अचानक गारठा वाढल्याने पारा एका दिवसांत ४.२ अंश सेल्सिअसने खाली घसरला आहे. ७ डिसेंबर रोजी १६.७ किमान तापमानाची नोंद झाली होती. तर ८ डिसेंबर रोजी १२.५ अंश सेल्सिअस किमान तापमानाची नोंद झाली. गेल्या वर्षीच्या तुलनेत यंदा ८ डिसेंबर रोजी तापमानात ७ अंशाने घट झाली आहे. ८ डिसेंबर २०२१ रोजी १९.५ अंश सेल्सिअस तापमान होते.
अचानक तापमानात घट झाल्यामुळे शहरात रात्री शेकोट्या पेटल्याचे जागोजागी दिसून आले. गेल्या वर्षीच्या तुलनेत तापमानात घट झाल्यामुळे अचानक गारठा वाढला. त्यामुळे गरम पेयांनाही मागणी वाढली. गेले काही दिवस थंडी जवळ जवळ बेपत्ताच झाली होती. तसेच काहीसे ढगाळ वातावरणही होते. परंतु, ढगाळ वातावरण असतानाही अचानक थंडी वाढली. ही स्थिती पिकांसाठी धोकादायक असल्याचे कृषितज्ज्ञांनी सांगितले. ढगाळ वातावरण निघाल्यानंतर पडणारी थंडी ही हरभरा व गहू पिकासाठी लाभदायक असल्याचेही ते म्हणाले. परंतु, जर ढगाळ वातावरण व थंडी अशी स्थिती कायम राहिल्यास पिकांवर अळी व रोग पडू शकतो, असे मत कृषितज्ज्ञांनी व्यक्त केले.
उत्तरेकडून वाहत येणाऱ्या गार वाऱ्यांमुळे सध्या जिल्ह्यात थंडी वाढली आहे. त्यातच दक्षिण बंगालच्या उपसागरातील ठरक कमी दाबाचे क्षेत्र तीव्र वादळाच्या रूपात ईशान्य बंगालच्या उपसागरात आहे. गुरुवार ८ रोजी चक्रीवादळाच्या रूपात तामिळनाडू व दक्षिण आंध्र किनारपट्टीलगत ते पोहोचण्याची शक्यता आहे. त्यामुळे थंडीसह जिल्ह्यात आणखी काही दिवस ढगाळ वातावरण राहण्याची शक्यता आहे. त्याचप्रमाणे पुढील पाच दिवस तापमान हे १२ ते १५ अंश सेल्सिअसदरम्यान राहण्याची शक्यता असल्याचा अंदाज हवामान खात्याने वर्तवला आहे.
अचानक तापमान घटल्याने झाडांची वाढ खुंटते
तापमानात जर अचानक घट झाली तर झाडांची वाढ खुंटते. शहरात तापमान तर घटलेच आहे. सोबतच ढगाळ वातावरण असल्यामुळे पिकांसाठी वातावरणाची ही स्थिती धोकादायक आहे. यामुळे पिकांवर रोग पडतात. थंड वातावरण गहू व हरभऱ्यासाठी लाभदायक असून, कापसासाठी मात्र काहीसे हानीकारक आहे. -प्रा. अनिल बंड, श्री शिवाजी कृषी महाविद्यालय, अमरावती.
Copyright © 2022-23 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.