आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

येत्या 5 दिवसात जास्त थंडीची शक्यता:अमरावतीत शनिवारी पारा 10.8 अंशापर्यंत घसरला; यंदाच्या हंगामातील सर्वात कमी तापमानाची नोंद

अमरावती13 दिवसांपूर्वी
  • कॉपी लिंक

मागील दोन ते तीन दिवसांपासून तापमानात सातत्याने घट होत आहे. मात्र शुक्रवारपासून तर गारठा अधिकच वाढला आहे. प्रादेशिक हवामान केन्द्र, नागपूरच्या नोंदीनूसार शनिवारी (दि. 19) अमरावती शहरात किमान तापमान 10.8 अंश सेल्सीअस नोंदवल्या गेले आहे. अशी माहिती कृषी विज्ञान केन्द्र, दुर्गापूरच्या सूत्रांनी दिली आहे. आगामी चार ते पाच दिवस तापमानात यापेक्षाही घट होवून हुडहुडी भरवणारी थंडी राहणार असल्याचा अंदाज त्यांनी वर्तवला आहे.

सद्या मध्यप्रदेशकडून विदर्भात थंड वारे वाहत आहे, त्यामुळेच वातावरणात गारवा निर्माण झाला आहे. त्यामुळेच शुक्रवारी दुपारपासून वातावरणात गारवा जाणवायला लागला आहे. त्याचप्रमाणे शनिवारीसुध्दा दिवसभर थंड वातावरण होते. अमरावती व परिसरात नेहमी उष्ण वातावरण राहते. मात्र सद्या असलेले वातावरण नेहमीच्या तुलनेत एकदम विपरीत आहे. ही परिस्थिती २४ नोव्हेंबरपर्यंत कायम राहणार असून सद्या असलेल्या तापमानापेक्षाही वातावरणात थंडावा वाढू शकतो, त्यामुळेच आगामी पाच दिवस हुडहुडी भरवणाऱ्या थंडीची शक्यता हवामान तज्ज्ञांनी वर्तवली आहे.

शुक्रवार व शनिवारचे कमाल तापमान (दुपारी) शहरात 30 अंश होते. याचवेळी किमान तापमान 10.8 अंश (रात्री) तापमान आहे. त्यामुळे दिवस व रात्रीच्या (कमाल व किमान) तापमानात तब्बल 19.2 अंशाची तफावत आहे. वातावरणातील या बदलामुळे सद्या अनेकांना सर्दी, खोकल्याचा त्रास जाणवत आहे.

थंडी वाढली असली तरीही जिल्ह्यातील रब्बीचे प्रमुख पिक गहू आणि चन्यासाठी ती फायदेशीर ठरणारी आहे. कारण चन्याचा पेरणीची वेळ तशी निघून गेली आहे. गव्हाची पेरणी आता सुरू होत आहे. याचवेळी पारा 10 अंशाच्या खाली गेल्यास फळबागांवर शेतकऱ्यांना विशेष लक्ष देण्याची गरज आहे. कारण 10 अंशापेक्षा तापमान कमी झाल्यास फळ झाडांच्या मुळा सक्रिय राहत नाही. अशावेळी फळ झाडांना पाणी देणे फायदाचे ठरू शकते. कारण पाणी दिल्यास तापमानाचे संतुलन राखण्यास मदत होवू शकते आणि जमिनीच्या आतमधील तापमान कमी करण्यापासून रोखले जाते. अशी माहीती दुर्गापूर कृषी हवामान केन्द्राचे कृषी हवामान तज्ज्ञ डॉ. सचिन मुंढे यांनी ‘दिव्य मराठी’सोबत बोलताना सांगितले आहे.

बातम्या आणखी आहेत...