आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

अमरावती:आईनेच मुलीला गुजरातेत 3 लाखांत विकले, अल्पवयीन मुलीवर सावत्र बापाची वाईट नजर

अमरावती2 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

आईनेच पोटच्या अल्पवयीन मुलीला ३ लाखांत गुजरातमध्ये विकून तिचे लग्न लावून दिले. लग्नानंतर काही कामानिमित्त आई-मुलीला घेऊन अमरावतीत आली. त्यानंतर आई व सावत्र वडिलांनी या पीडित मुलीला एका गावात पाच दिवस एका खोलीत डांबून ठेवले. मुलीने कशीबशी स्वत:ची सुटका केली व सोमवारी गाडगेनगर पोलिसांशी संपर्क साधला. त्या वेळी पोलिसांनी तातडीने मुलीपर्यंत जाऊन तिला सोबत आणले.

या प्रकरणात मुलीने दिलेल्या जबाबात धक्कादायक आरोप केले आहेत. याआधारे पोलिसांनी सदर प्रकरणात सोमवारी रात्री गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया सुरू केली होती.

पीडित १६ वर्षीय मुलीने पोलिसांत दिलेल्या माहितीनुसार, ती एक वर्षाची असतानाच वडिलांचा मृत्यू झाला. नंतर आईने दुसरे लग्न केले. काही महिन्यांपूर्वी तिची आई, सावत्र वडील व भाऊ अमरावतीत राहायला आले. आई-वडिलांनी तिला ‘तुझे लग्न करून देतो, तू गुजरातमध्ये चल, त्या पैशांतून आपण घर विकत घेऊ आणि तुला पुन्हा अमरावतीत परत घेऊन येऊ, असे सांगितले. मात्र पीडितेने नकार दिला. जूनच्या दुसऱ्या आठवड्यात तिला घेऊन आई गुजरातच्या रामतई गावात गेली. तिने कल्पेश नावाच्या व्यक्तीसोबत जाऊन राजेश या व्यक्तीसोबत त्याच्याच घरी मुलीचे लग्न लावून दिले. यासाठी आईने राजेशच्या वडिलांकडून ३ लाख रुपये उकळले. दरम्यान, ८ दिवस गुजरातेत राहिल्यानंतर पीडितेचे वय कमी असल्यामुळे तिची आई घेऊन तिला कागदपत्रे तयार करण्यासाठी अमरावतीत आली. त्यानंतर आई-वडिलांनी तिला अमरावती जिल्ह्याच्याच एका गावातील खोलीत डांबून ठेवले. पाच दिवसानंतर पीडितेने खोलीच्या खिडकीची काच फोडून स्वत:ची सुटका केली. ऑटोने अमरावतीत येत असतानाच वडिलांना ती दिसली. वडील तिला अमरावतीत घेऊन आले.

२ ते ३ दिवसांपूर्वी पीडिता तिच्या एका ओळखीच्या महिलेकडे गेली. तिला हा संपूर्ण घटनाक्रम सांगितला. त्यानंतर सोमवारी सायंकाळी पीडितेने याबाबत गाडगेनगर पोलिसांना माहिती दिली. या प्रकरणी रात्री पीडितेची आई, सावत्र वडील, राजेश यांच्याविरुद्ध विविध कलमांन्वये गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया सुरू केली होती.

सावत्र वडिलांनी विनयभंग केल्याचा आरोप : सुमारे दोन महिन्यांपूर्वी रात्री आई घरी नसताना सावत्र वडिलांनी मला झोपेत असतानाच उचलून नेले व विनयभंग केला, असा खळबळजनक आरोप पीडितेने केला आहे.

बातम्या आणखी आहेत...