आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
डाउनलोड कराराज्यातील दुसऱ्या क्रमांकाची शिक्षण संस्था म्हणून लौकीक असलेल्या येथील श्री. शिवाजी शिक्षण संस्थेद्वारा संचालित डॉ. पंजाबराव देशमुख स्मृती वैद्यकीय महाविद्यालयातील (पीडीएमसी) खाटांची संख्या लवकरच एक हजारावर जाणार आहे. दरम्यान अत्याधुनिक वैद्यकीय सुविधांनी सुसज्ज या रुग्णालयामध्ये गेल्या आठवड्यापासून बायपास सर्जरीचा पर्यायही उपलब्ध झाला असल्याची माहिती संस्थाध्यक्ष हर्षवर्धन देशमुख यांनी आज, गुरुवारी माध्यमांना दिली.
आगामी पंधरवड्यात संस्थेचे संस्थापक अध्यक्ष तथा देशाचे पहिले कृषी मंत्री डॉ. पंजाबराव उपाख्य भाऊसाहेब देशमुख यांची जयंती साजरी होत आहे. या निमित्ताने त्यांनी आज माध्यम प्रतिनिधींशी संवाद साधला. ते म्हणाले, अडल्या-नडल्यांना शिक्षण मिळावे, यासाठी भाऊसाहेबांनी सदर संस्थेची स्थापना केली. या संस्थेने १९८३ साली अमरावतीत वैद्यकीय महाविद्यालय उघडले. त्यावेळी राज्यात फक्त प्रवरा, कराड आणि अमरावती या तीनच ठिकाणी खासगी वैद्यकीय महाविद्यालये होती. या महाविद्यालयातील विद्यार्थ्यांची संख्या सध्या शंभराहून दीडशे झाली आहे. त्याचवेळी पदव्युत्तर पदवीचे शिक्षण घेणाऱ्यांच्या जागाही २४ वरुन ६५ पर्यंत वाढल्या आहेत.
महाविद्यालयाचा विकास होत असतानाच रुग्णालयाचाही विकास व्हावा, यासाठी गेल्या चार वर्षांत बरेच बदल झाले आहेत. या माहितीला पुढे नेताना अधिष्ठाता डॉ. अनिल देशमुख म्हणाले, रुग्णालयात तब्बल २६ वार्डस् असून त्यामध्ये एक हजार आंतररुग्ण उपचार घेऊ शकतील, अशी सोय आहे. रुग्णालयाचा प्रत्येक विभाग अत्याधुनिक यंत्रसामग्रीने सुसज्ज करण्यात असून त्याला तज्ज्ञ डॉक्टरांची जोड देण्यात आली आहे. येथील डॉक्टर्स जिल्हा सामान्य रुग्णालय, जिल्हा स्त्री रुग्णालय आणि मेळघाटसारख्या दुर्गम भागातही सेवा देत आहेत. बऱ्याच आजारांच्या बाबतीत या रुग्णालयाशी पीडीएमसीचे सामंजस्य करारदेखील (एमओयू) झाले असल्याचे यावेळी सांगण्यात आले.
पत्रकार परिषदेला संस्थाध्यक्ष हर्षवर्धन देशमुख यांच्याशिवाय उपाध्यक्ष अॅड. जयवंत उर्फ भय्यासाहेब पाटील पुसदेकर, कोषाध्यक्ष दिलीपबाबू इंगोले, सदस्य प्रा. सुभाष बनसोड, महाविद्यालय तथा रुग्णालयाचे संचालक डॉ. पद्माकर सोमवंशी, डॉ. अजय डफळे, डॉ. सोमेश्वर निर्मळ, डॉ. बारोकर, सुभाष पावडे आदी मान्यवर उपस्थित होते.
पीडीएमसीमध्ये सद्या पेईंग वार्डची (सशुल्क आंतररुग्ण कक्ष) सोय नव्हती. येत्या काळात तीही उपलब्ध करुन दिली जात आहे. त्यासाठी पहिले दानदाते म्हणून ज्येष्ठ सामाजिक कार्यकर्ते अनंतराव टाले पुढे आले आहेत. त्यांच्या दाननिधीतून पहिला पेईंग वार्ड उभा होणार आहे. ही दाननिधी आगामी २७ डिसेंबर रोजी आयोजित भाऊसाहेबांच्या जयंतीदिनी ते संस्थेला देणार आहेत.
Copyright © 2022-23 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.