आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
डाउनलोड कराशहरात राहणाऱ्या एका ३२ वर्षीय विवाहित महिलेसोबत शहरातील नवसारी भागातील ३१ वर्षीय युवकाचे प्रेमप्रकरण होते. तसेच चांदूर बाजार तालुक्यातील सोनोरी गावातील ३३ वर्षीय तरुणासोबतही काही महिन्यांपूर्वी या महिलेची ओळख झाली व त्यांच्यातही प्रेमांकुर फुलला. दरम्यान, रविवारी या महिलेच्या नव्या प्रियकरानेने जुन्या प्रियकराला चाकूने सपासप वार करुन त्याचा खून केला. यावेळी झालेल्या झटापटीत सोनोरीचा युवकसुद्धा जखमी झाला आहे. हा रक्तरंजित थरार रविवारी (दि. ५) दुपारी चांगापूर फाट्यावर घडला आहे. विशेष म्हणजे मारेकरी तरुणाचा ५ जून हा जन्मदिवस आहे. त्याचदिवशी त्याने हा निर्णय घेतला.
प्रेमाचे सूत जुळले अन्...
सचिन विजयराव खरात (३१, रा. नवसारी) असे मृताचे तर राजेश पंडितराव गणोरकर (३३, रा. सोनोरी, चांदूर बाजार) असे आरोपीचे नाव आहे. शहरात राहणारी एक ३२ वर्षीय महिला व सचिन खरातचे मागील दीड वर्षांपासून प्रेमप्रकरण सुरू होते. मात्र, मागील काही महिन्यांपासून त्यांच्यात ‘ब्रेकअप’ झाले होते. सचिन हा रंगरंगोटीचे काम करत होता. दरम्यान, मागील काही महिन्यांपूर्वी याच महिलेची राजेशसोबत ओळख झाली व त्यांच्यात प्रेमसूत जुळले.
महिलेसमोरच वार
राजेश हा शेती करतो. त्याने रविवारी सदर महिलेला फोन करूनही तिने प्रतिसाद दिला नाही, मात्र, त्याचवेळी सचिनने बोलावल्यावर ती आली. त्यामुळे संतापलेल्या राजेशने सचिनवर चाकूने वार केले. यामध्ये सचिन रक्तबंबाळ होऊन जागीच मृत झाला. याचदरम्यान चाकूचा एक घाव राजेशच्या मांडीत लागल्यामुळे राजेशसुद्धा जखमी झाला. हा संपूर्ण थरार त्या महिलेसमोरच घडला.
अडीच वर्षांपूर्वी ओळख
सचिनच्या भावाच्या दिलेल्या तक्रारीवरुन राजेशविरुद्ध खुनाचा गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया सुरू होती. या प्रकरणातील महिला पतीपासून वेगळी राहते. अडीच वर्षांपूर्वी तिची सचिनसाेबत ओळख झाली होती तर काही महिन्यांपूर्वी राजेशसोबत ओळख झाली होती, अशी माहिती पोलिस सूत्रांनी दिली.
खुनाचे मूळ कारण काय?
राजेशचा रविवारी वाढदिवस असल्यामुळे त्याने शनिवारी रात्रीपासून या महिलेला कॉल केले. रविवारीही कॉल केले. मात्र, तिने राजेशचे कॉल स्वीकारले नाहीत. दरम्यान, राजेशने सचिनला कॉल करून भेटायला बोलावले. त्याठिकाणी राजेशने सचिनला म्हटले की, तुमचे अजूनही ‘अफेअर’ सुरूच आहे. त्यावर सचिनने नाही म्हटले. मात्र तीच कधी कधी मला कॉल करते, असे सचिनने सांगितले. त्यावेळी राजेशने सचिनला त्या महिलेला कॉल करायला सांगितला. सचिनने तिला कॉल करताच त्या महिलेने उचलला. त्यावेळी राजेशने सचिनला तिला चांगापूर फाट्यावर बोलावण्यास सांगितले. सचिनने बोलवताच ती महिला आली. या संपूर्ण प्रकारामुळे राजेश चिडला व त्याने ती महिला येताच तिच्यासमोरच सचिनवर सपासप वार करुन खून केला.,अशी माहीती पोलिसांच्या प्राथमिक तपासात समोर आली.
प्रेम प्रकरणातून घडली घटना
या महिलेचे सचिन व राजेशसोबत प्रेमसंबंध होते. यातूनच त्या दोघांमध्ये वाद झाला व राजेशने सचिनवर चाकूने वार करुन त्याचा खून केला असल्याचे प्राथमिक तपासात समोर आले आहे. राजेश जखमी असल्यामुळे त्याच्यावर उपचार सुरू असून. त्याच्यावर लक्ष देण्यासाठी पोलिस इर्विनमध्ये तैनात आहेत.
- प्रवीण वांगे, प्रभारी ठाणेदार गाडगेनगर
Copyright © 2022-23 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.