आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

विधायक:गरजू विद्यार्थिनींना सायकल वाटप करून शिक्षणाचा मार्ग केला सुकर ; 21 मुलींना झाला लाभ

धारणीएका महिन्यापूर्वी
  • कॉपी लिंक

मेळघाटातील गरीब, गरजू व होतकरू विद्यार्थिनींना सहज व सोप्या पद्धतीने शिक्षण घेता यावे, शिक्षण घेताना त्यांना कोणत्याही अचडणींचा सामना करावा लागू नये, या उद्देशाने युवक काँग्रेसच्या वतीने नुकतेच सायकलींचे वितरण करण्यात आले. निमित्त होते काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष बबलू देशमुख यांच्या वाढदिवसाचे. या वेळी जवळपास २१ विद्यार्थिनींना सायकलचे वितरण करून शिक्षण घेण्यासाठी त्यांना मदतीचा हात देण्यात आला.

युवक काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष पंकज मोरे यांच्या संकल्पनेतून घेण्यात आलेल्या या अभिनव उपक्रमातून जवळपास २१ गरजू विद्यार्थिनींना सायकलींची भेट देत त्यांच्या निरागस चेहऱ्यावर समाधानाचे हसू पेरण्यात आले. या सायकल वितरण कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी जिल्हा परिषदेचे माजी सभापती महेंद्रसीह गैलवार, तर प्रमुख पाहुणे म्हणून शहराध्यक्ष शेख मुखत्यार शेख जब्बार, सरचिटणीस प्राचार्य संजय लायदे, महेंद्र मालवीय, राजू देशमुख तथा जिल्हाध्यक्ष पंकज मोरे उपस्थित होते.

माजी पालकमंत्री अॅड. यशोमती ठाकूर तसेच युकाँचे प्रदेशाध्यक्ष कुणाल राऊत यांच्या मार्गदर्शनात गरजू विद्यार्थिनींना मदतीचा हात देऊन त्यांच्या शालेय शिक्षणाची खडतर वाट सुकर करणारा हा उपक्रम राबवण्यात आला. कार्यक्रमासाठी सतीश मालवीय, बुराणे गुरुजी, सलमान शेख, सौरभ लोखंडे, सतीश मावस्कर, बिलाल शेख, सदर शेख, प्रेम मावस्कर यांनी सहकार्य केले.

विद्यार्थिनींसह पालकांकडून समाधान व्यक्त
मेळघाटातील गरजू, गरीब विद्यार्थिनींना अनेक समस्यांचा सामना करत शिक्षण घ्यावे लागते. त्यात अनेक वेळा त्यांना अडचणींअभावी शाळा सोडून शिक्षणाला मुकावे लागते. मात्र युकाँने सायकलच्या रुपात दिलेल्या मदतीच्या हातामुळे आता विद्यार्थिनींना शिक्षण घेणे सोईचे होणार असल्याने विद्यार्थिनींसह त्यांच्या पालकांनी समाधान व्यक्त केले. त्यांच्या चेहऱ्यावर समाधानाचे हसू दिसून आले.

दोन वर्षांपासून राबवताहेत उपक्रम
अतिदुर्गम वनांचल परिसरात वसलेल्या अनेक खेड्यापाड्यातील आदिवासी विद्यार्थिनी शिक्षण घेण्यासाठी दगडधोंड्याचा खडतर रस्ता पायदळी तुडवून तालुक्याच्या ठिकाणी दररोज ये-जा करतात. अशा दुर्बल घटकातल्या गरजू विद्यार्थिनींना मागील दोन वर्षांपासून मोफत सायकलींचे वाटप करण्यात येत आहे.

बातम्या आणखी आहेत...