आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

पोटाला चिमटा:आर्थिक चटके सोसणारे गरीब राहिले तीन महिने स्वस्त धान्यापासून वंचित

अमरावतीएका महिन्यापूर्वी
  • कॉपी लिंक

अजब न्याय म्हणतात तो यालाच! दिवाळीची स्पेशल किट वितरित करण्याच्या नादात शासनाने गरिबांना त्यांच्या हक्काचे तीन महिन्यांचे रेशन दिलेच नाही. त्यामुळे ६ लाखांपैकी बहुतांश शिधाकार्डधारकांच्या पोटाला चिमटा बसला आहे. सप्टेबर महिन्याचे रेशन आता डिसेंबर महिन्यात मिळत आहे. मग, उर्वरित दोन महिन्यांचे रेशन केव्हा मिळणार? असा प्रश्न लाभार्थ्यांना पडला आहे. एकाचवेळी तीन महिन्यांचे स्वस्त धान्य मिळाले तर ते खरेदी करणे शक्य होईल काय? असा प्रश्न असून त्यामुळे महिन्याचे बजेट कोलमडल्याशिवाय राहणार नाही, अशा शब्दांत लाभार्थ्यांनी संताप व्यक्त केला आहे. पोटाची भूक शमवण्यासाठी ज्यावेळी अन्नाची आवश्यकता होती, तेव्हा ते मिळाले नाही. मग एकाचवेळी तीन महिन्यांचे रेशन मिळाले, तर त्याचा काय उपयोग? या प्रश्नाचे उत्तर शासनाने द्यायला हवे.

गरिबांना दोन घास सुखाचे खाता यावेत म्हणून शासनाने स्वस्त धान्य (रेशन) देण्याचा निर्णय घेतला. ठरवून दिल्याप्रमाणे दरमहा हे रेशन मिळायला हवे, असे असतानाही सप्टेंबर महिन्याचे गहू, तांदूळ, डाळ हे धान्य लाभार्थ्यांना आता डिसेंबरमध्ये मिळत आहे. त्यामुळे त्यांना तीन महिने कसेबसे काढावे लागले. जिल्हयात ६ लाखांवर कार्डधारक असून प्रत्येकाच्या घरात दोन ते चार सदस्य आहेत.

उरलेल्या दोन महिन्यांचे रेशन कधी मिळणार? सध्या सप्टेबर महिन्याचे रेशन मिळत आहे. मग ऑक्टोबर, नोव्हेंबरचे रेशन कधी मिळणार, असा प्रश्न आहे. दिवाळीत रेशन मिळाले नसल्याने जास्त दराने बाहेरून धान्य घ्यावे लागले. - निशा तिरपुडे, लाभार्थी.

महाग धान्य खरेदी केले गेले तीन महिने रेशन मिळाले नाही, त्यामुळे पोटाला चांगलाच चिमटा बसला. कधी उसनवारीने, तर कधी जवळ होते ते पैसे खर्च करून महाग धान्य खरेदी करून कसेबसे भागवावे लागले. - भाऊराव गुजर, लाभार्थी.

जिल्ह्यात १९१४ केंद्र, तर ६ लाख ६ हजार रेशन कार्डधारक जिल्ह्यात स्वस्त धान्य वितरणाचे एकूण १९१४ केंद्र असून ६ लाख ६ हजार ७६ कार्डधारक आहेत. तसेच लाभार्थी संख्या ही १० लाखाच्या वर आहे. अंत्याेदय कार्डधारक १ लाख २२ हजार ६६५, केशरी कार्डधारक ३ लाख १२ हजार ३२५, प्राधान्य गट १ लाख ७ हजार ५६९, शुभ्र कार्डधारक ५३ हजार ११३ आहेत.

तीन महिन्यांचे रेशन एकाच वेळी दिल्यास बजेट कोलमडेल रेशनच्या दुकानातून नियमितपणे दर महिन्याला जे स्वस्त धान्य मिळते. तेच आम्ही कसेबसे खरेदी करतो. जर का एकाचवेळी तिन्ही महिन्यांचे धान्य दिले तर त्यामुळे आमचे आर्थिक बजेट कोलमडल्याशिवाय राहणार नाही. जर धान्य घेतले नाही तर त्या उर्वरित धान्याचे काय होणार? अशी हुरहूर लागून राहिल्याच्या प्रतिक्रिया लाभार्थ्यांनी दिल्या.

बातम्या आणखी आहेत...