आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

झाड कोसळले:शहरासह जिल्ह्यात मुसळधार पावसाची हजेरी ; धामणगाव रेल्वे तालुक्यात नदी-नाल्यांना पूर

अमरावती21 दिवसांपूर्वी
  • कॉपी लिंक

शहरासह जिल्ह्यात रविवारी (दि. ११) मुसळधार पावसाने हजेरी लावली. त्यामुळे जनजीवन विस्कळीत झाले आहे. भर पावसातच काही गणेश मंडळांची विसर्जन मिरवणूक काढली.रविवारी सकाळीपासूनच शहरात पावसाने दिवसभर हजेरी लावली. याशिवाय अंजनगाव सुर्जी, दर्यापूर, चांदूर बाजार, चांदूर रेल्वे, परतवाडा, दर्यापूर, वरुड, मोर्शीसह जिल्ह्यात पावसाने दमदार हजेरी लावली. ऐन कापनीच्या तोंडावर आलेला पाऊस शेतकऱ्यांच्या तोंडचा घास तर पळवणार नाही, याची चिंता शेतकऱ्यांना भेडसावत आहे. दर्यापूर तालुक्यातील कोणतीही जीवीतहानी झाली नसल्याची माहिती तहसीलदार डॉ. योगेश देशमुख यांनी दिली.

धामणगाव तालुक्यात, अनेक गावात पाणी तुंबले तालुक्यात रविवारी (दि. ११) दुपारपासून सर्वदूर जोरदार पावसाने पुन्हा एकदा हजेरी लावली. अनेक गावात पावसाचे पाणी शिरले. अनेक नदी-नाल्यांना पूर आला होता. पावसाने अनेक घरांची पडझड झाली असून, गावे बाधित झाली, तर शेतीपिकांचे प्रचंड नुकसान झाले. दुपारी १ वाजतापासून तालुक्यात धुवाधार पावसाला सुरूवात झाली. दरम्यान एक वाजताच्या सुमारास ढगांचा गडगडाट व विजांच्या कडकडाटासह जोरदार पावसाला सुरूवात झाली. ग्रामीण भागात नाल्या तुंबल्याने त्या ओव्हरफ्लो होवून अनेक गावांमधून पावसाचे पाणी रस्त्यावर आले होते. त्यामुळे काही गावांचे रस्ते बंद झाल्याने संपर्क तुटला होता.

धरणाचे दरवाजे उघडले निम्नवर्धा प्रकल्पाच्या वरुड बगाजी धरणाच्या पाणी पातळीत पुन्हा वाढ झाली असून धरणाचे सर्वच दरवाजे ३० सेंमीने उघडून त्याचा विसर्ग वर्धा नदीपात्रात करण्यात येत आहे. नदीकाठच्या गावांना सतर्कतेचा इशारा देण्यात आल्याची माहिती निम्न्न वर्धा प्रकल्पाचे उपविभागीय अभियंंता पवन पांढरे यांनी दिली

तिवस्यात वीजवाहिनीवर झाड कोसळले अचानक वादळ व सततच्या पावसामुळे बळीराजा त्रस्त झाला आहे. शनिवारी सायंकाळच्या सुमारास अचानक मेघगर्जनेसह जोरदार पावसाने तालुक्यात हजेरी लावली. वादळामुळे तिवसा व मोझरी परिसरात विजवाहिनीवर झाडे कोसळल्याने अनेक गावातील नागरिकांना संपूर्ण रात्र अंधारात काढावी लागली, तर काही ठिकाणी वीजपुरवठा सुरू करण्यात वीज कर्मचाऱ्यांनी अथक परिश्रम घेत यश मिळवले.शनिवारी सायंकाळी अचानक आलेल्या पावसामुळे शहरातील त्रिमूर्ती नगरस्थित विजवाहिनीवर झाड कोसळल्याने वीज तारा तुटल्या. त्यामुळे नागरिकांना पूर्ण रात्र अंधारात काढावी लागली, तर काही भागातील वीजपुरवठा सुरळीत सुरू करण्यात आला. गुरूदेवनगर व मोझरी भागातील वीज पुरवठा मध्यरात्री तीनच्या वाजताचे दरम्यान सुरू झाला. रविवारी (दि. ११) सकाळपासून पावसाने आपला जोर सुरूच ठेवल्याने जनजीवन काही अंशी विस्कळीत झाले. जोरदार वादळामुळे अनेक गावातील संत्रा झाडे कोसळून नुकसान झाल्याची माहिती आहे.

बातम्या आणखी आहेत...