आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
डाउनलोड करानगरपालिकेची हद्दवाढ झाल्यानंतर लगतच्या काही ग्रामपंचायतींचा बराचसा भाग दर्यापूर नगरपालिका हद्दीत जोडला गेला. हद्द वाढ झाल्यामुळे मालमत्ता सुद्धा दर्यापूर नगरपालिका कार्यक्षेत्रात आल्या आहेत. असे असताना हद्द वाढ झालेल्या भागातील मतदान मात्र आजही ग्रामपंचायतीमध्येच असल्याने नागरिकांनी निवडणूक विभागाच्या कामाकाजाबाबत आश्चर्य व्यक्त केले आहे.
पेठ इतबारपूर ग्रामपंचायतीमध्ये असलेला टाटा नगर पुनर्वसन हा भाग हद्दवाढीनंतर दर्यापूर नगरपालिकेला जोडल्या गेला. मात्र आजही या भागातील मतदान मात्र पेठ इतबारपूर ग्रामपंचायतीमध्येच आहे. त्यामुळे विकास कामांकरिता ग्रा.प.कडे मागणी करायची की पालिकेकडे या विवंचनेत येथील नागरिक आले आहेत.
तहसीलदार डॉ. योगेश देशमुख यांच्या अध्यक्षतेत पेठ इतबारपूर येथील नागरिकांची एक बैठक नुकतीच पार पडली. या बैठकीत नागरिकांनी हद्दवाढ नगरपालिका क्षेत्रात आल्याने मतदानही पालिका हद्दीतच असायला हवे, अशी मागणी केली. मात्र ग्रामपंचायत निवडणूक कार्यक्रम लागल्याने आता नव्याने मतदार जोडता येणार नाही, अशी पुष्टी निवडणूक विभागातील अधिकाऱ्यांनी या वेळी दिल्याने नागरिकांपुढे संभ्रम निर्माण झाला आहे. या संबंधात राजकुमार घरडे या नागरिकाने संबंधित विषयावर तहसीलदार यांना निवेदनही दिले आहे. या निवेदनात नगरपालिका हद्दीमध्ये मालमत्ता असताना मतदान ग्रामपंचायतीमध्ये असणे गैर असल्याचे नमूद आहे. ग्रामपंचायत सचिवानेही विकास कामांच्या बाबतीत हात वर केल्याने नागरिकांनी पालिका कार्यालयात धाव घेतली आहे. मात्र दोन्हीकडून अधांतरी असल्याने विकास कामांना मात्र खो देण्यात आला आहे.
मुदत संपल्याने ग्रामपंचायतीची निवडणूक प्रक्रिया सुरू झाली असून सदर मालमत्ताधारकांचे मतदान ग्रामपंचायतीमध्ये कायम आहे. हा विषय निवडणूक विभागाचा आहे. या संबंधात ग्रामपंचायत स्तरावरून कोणतीही कारवाई करता येत नाही.
-ए. आर. गवई, ग्रामसेवक, पेठ इतबारपूर
सद्यस्थितीत मुदत संपलेल्या ग्रामपंचायत निवडणुकींची प्रक्रिया पूर्ण झाली असून नामनिर्देश पत्र दाखल करणे सुरू आहे. त्यामुळे या नागरिकांची नावे कमी करून नगरपालिका यादीत जोडल्या जावू शकत नाहीत. पुढील निवडणूक मतदार नोंदणी कार्यक्रम जाहीर झाल्यावर दुरूस्ती करण्यात येईल.
- डॉ. योगेश देशमुख, तहसीलदार, दर्यापूर
Copyright © 2022-23 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.