आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

पंचायत समिती:सीईओंचे पद अन् पंचायत समितीचा परिसर वापरून भरतीचा डाव फसला

अमरावती12 दिवसांपूर्वी
  • कॉपी लिंक

युवकांना कायमस्वरूपी रोजगाराचे आश्वासन देत एसआयएस (सिक्युरिटी अँड इंटेलिजन्स सर्व्हिस) प्रा. लिमिटेड नामक एका कंपनीने जि. प. मुख्य कार्यकारी अधिकारी यांच्या पदाचा उल्लेख करून पंचायत समिती आवारात भरती घेणार असे पत्रक छापले होते. दरम्यान साेमवारी (दि. १) भातकुली पंचायत समितीच्या अमरावती येथील सभागृहात भरती प्रक्रिया राबवण्यात येत होती. मात्र, ही भरती प्रक्रिया पूर्ण होण्यापूर्वीच काही तरुणांनाच भरती प्रक्रियेवर संशय आला व उमेदवारांनी गोंधळ घातला. त्यामुळे परिसरात तणावाचे वातावरण निर्माण झाले होते. ही माहिती पोलिसांना मिळताच गाडगेनगर पोलिसांचा ताफा घटनास्थळी दाखल झाला. त्यानंतर कंपनीच्या तीन कर्मचाऱ्यांना सोबत नेऊन त्यांची चौकशी करण्यात आली. मात्र, या प्रकरणात कोणीही तक्रार न दिल्यामुळे पोलिसांनी तिघांचीही सुटका केली आहे.

भरतीबाबत युवकांना माहिती व्हावी, यासाठी छापण्यात आलेल्या पत्रकांवर भारत सरकारच्या पसारा अॅक्ट २००५ नुसार अमरावती जिल्ह्यातील तरुणांसाठी ६०० जागेसाठी कायमस्वरूपी मेगा भरती घेण्यात येत आहे. भारतीय सुरक्षा परिषद नवी दिल्ली व मुख्य अधिकारी जिल्हा परिषद अमरावती मल्टिनॅशनल कंपनी एसआयएस असे नमूद आहे. मागील काही दिवसांपासून युवकांच्या सोशल मीडियावर हे पत्रक फिरत होते. १ ते १० ऑगस्ट दरम्यान जिल्ह्यातील चौदाही तालुक्यांसाठी सात ठिकाणी ही भरती प्रक्रिया आयोजित केली होती. दरम्यान आज भातकुली पंचायत समितीच्या आवारातील सभागृहात भरतीमधील निवड प्रक्रियेसाठी जिल्ह्यातील विशेषतः भातकुली तालुक्यातील शेकडो उमेदवार आले होते. या वेळी सुरक्षा रक्षकांच्या पेहरावात असलेल्या तीन व्यक्तींच्या उपस्थितीत भरती प्रक्रिया सुरू झाली होती.

पंचायत समितीचा काहीही संबंध नाही
या भरती प्रक्रियेशी पंचायत समितीचा काहीही संबंध नाही. काही दिवसांपूर्वी संबधित कंपनीचे व्यक्ती आमच्याकडे परवानगी मागण्यासाठी आले होते. जिल्ह्यातील युवकांना रोजगार मिळेल, हा उद्देश असल्याचे सांगण्यात आले. त्यामुळे त्यांना फक्त जागा उपलब्ध करून दिली. मात्र, जि. प.किंवा पं. स.चा भरती प्रक्रियेशी कोणताही संबंध नाही.- प्रफुल्ल बोरखडे, बीडीओ, पं. स., भातकुली.

तिघांनाही सोडले
आम्ही तिघांची चौकशी केली. त्यांच्याकडे असलेली कंपनीची कागदपत्रे कायदेशीर असल्याचे दिसत आहे. मात्र भरती प्रक्रिया राबवण्यासाठी त्यांनी स्थानिक पोलिसांची परवानगी घेणे आवश्यक होते. त्यांनी पोलिस परवानगी घेतली नाही. या प्रकरणात कोणीही तक्रार दिली नसल्यामुळे आम्ही तिघांनाही सोडले आहे. - आसाराम चोरमले, ठाणेदार, गाडगेनगर.

आमच्या पदाचा उल्लेख चुकीचाच, परवानगी रद्द केली
एससीएसआय कंपनीकडून सुरक्षा क्षेत्रात जिल्ह्यातील तरुणांना रोजगाराची संधी मिळणार आहे, असे आम्हाला कंपनी प्रतिनिधींकडून सांगण्यात आले होते. या हेतूने आम्ही भरती प्रक्रियेसाठी पंचायत समितीचा आवार वापरण्याबाबत सदर कंपनीला परवानगी दिली होती. मात्र त्यांनी पत्रकावर आमच्या पदाचा उल्लेख केला, हे चुकीचे आहे. त्यामुळे भातकुलीसह जिल्ह्यातील सर्वच पंचायत समितीचा आवार या भरती प्रक्रियेसाठी वापरण्यास आम्ही कंपनीला दिलेली परवानगी आजच रद्द केली आहे. - अविश्यांत पंडा, सीईओ, जि. प., अमरावती.

बातम्या आणखी आहेत...