आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

जागतिक योग दिन विशेष:क्रांतिकारक राजगुरू यांनी अमरावतीमध्ये गिरवले होते योगासनांचे धडे; एचव्हीपीएमने 1936 पासून केला जगभरात योगासनांचा प्रचार, प्रसार

अमरावतीएका महिन्यापूर्वी
  • कॉपी लिंक
  • यूएसए, आफ्रिकन देश, श्रीलंका, नेपाळ, इंडोनेशिया, जपानसह जगभरात प्रसार

अत्याचारी सँडर्सला गोळ्या घालून ठार करणारे क्रांतिकारक भगतसिंग, राजगुरू, सुखदेव या क्रांतिकारकांपैकी शिवराम हरी राजगुरू यांनी श्री हनुमान व्यायाम प्रसारक मंडळ, अमरावती (एचव्हीपीएम) येथे व्यायाम विशारद ही पदवी घेतली. यादरम्यान त्यांनी योगासनांचेही धडे घेतल्याच्या नोंदी एचव्हीपीएमने जतन करून ठेवल्या आहेत. शरीर बळकट करून घेण्यासाठी राजगुरू यांनी विविध योगासने शिकून घेतली होती. जगुरू हे १९२६-२७ या कालावधीत “एचव्हीपीए” येथे व्यायाम विशारद अभ्यासक्रम पूर्ण करण्यासाठी आले होते.

इंग्रजांविरुद्ध त्यांच्या मनात प्रचंड चीड होती. त्यांच्याविरुद्ध लढण्याची त्यांची आधीपासूनच प्रबळ इच्छा होती. यासाठी त्यांना शरीर बळकट व पिळदार बनवायचे होते. त्यामुळे त्यांनी नियमितपणे योगासनासोबतच व्यायाम, लाठीकाठी, बंदूक चालवण्याचे प्रशिक्षण घेतले. अमरावती येथील एक वर्षाच्या काळात एचव्हीपीएम येथील योगतज्ज्ञांचे राजगुरू यांना मार्गदर्शन लाभले. राजगुरू यांच्यासारख्या महान क्रांतिकारकांनी श्री हनुमान व्यायाम प्रसारक मंडळात शिक्षण घेतले ही आमच्यासोबतच अमरावतीसाठी अभिमानाची बाब असल्याचे मत ‘एचव्हीपीएम’चे प्रधान सचिव प्रभाकर वैद्य यांनी व्यक्त केले आहे.

एचव्हीपीएमने १९३६ पासून जगभरात योगासनांचा प्रचार, प्रसार
एचव्हीपीएमने स्वातंत्र्यपूर्व काळापासूनच योगासनांचा प्रचार व प्रसार जगभरात करण्यास सुरुवात केली. आंतरराष्ट्रीय स्तरावर १९३६ च्या बर्लिन ऑलिम्पिकमध्ये सर्वप्रथम उद्घाटन सोहळ्याला योगासनांसह मल्लखांब आणि व्यायामाची प्रात्यक्षिके सादर करण्यात आली होती. ती बघून आनंदीत झालेले जर्मनीचे तत्कालीन हुकूमशहा अडाॅल्फ हिटलर यांनी एचव्हीपीएम येथील प्रतिनिधी मंडळाला एक पदक भेट दिले होते. ते अजूनही मंडळाकडे सुरक्षित आहे.

त्यानंतर सातत्याने एचव्हीपीएमने जगभरातच योगासनांचा प्रचार व प्रसार केला. युरोपातील देशांसह यूएसए, आफ्रिकन देश, श्रीलंका, इंडोनेशिया, मालदीव, सेशल्स, जपान, नेपाळ, भूतान, थायलंड अशा विविध देशांमध्ये सातत्याने योगाचे धडे दिले जात आहेत. विदेशातूनही अनेक विद्यार्थी एचव्हीपीएममध्ये योग शिकण्यासाठी येत असतात. सध्या बृहन्महाराष्ट्र योग परिषदेचे सरकार्यवाह डाॅ. अरुण खोडस्कर यांनी योगासनांचा जगभरात प्रसार करण्याची धुरा आपल्या खांद्यावर घेतली आहे. स्वातंत्र्यपूर्व काळापासून आजही योगासन प्रक्रियेत हातखंडा कायम आहे.

तत्कालीन नोंदी अजूनही जतन करून ठेवल्या
राजगुरू श्री हनुमान व्यायाम प्रसारक मंडळात एक वर्षाचा व्यायाम विशारद अभ्यासक्रम शिकण्यासाठी आले असताना त्यांनी योगासनाचेही धडे घेतल्याच्या नोंदी असून तत्कालीन नाेंदी व अहवाल अजूनही जतन करून ठेवण्यात आल्या आहेत. डाॅ. सुरेश देशपांडे,इतिहास संशोधक, एचव्हीपीएम, अमरावती.

बातम्या आणखी आहेत...