आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

अमरावती:पत्रकारितेत ग्रामीण वार्ताहराची भूमिका महत्त्वाची : संजय आवटे

अमरावतीएका वर्षापूर्वी
  • कॉपी लिंक
  • ‘सम्यक’द्वारा आयोजित तीनदिवसीय कार्यशाळेत मार्गदर्शन

माहिती व तंत्रज्ञानामुळे पत्रकारिता क्षेत्रात आमूलाग्र बदल घडले आहेत. बातम्या देण्याची गती वाढली आहे. जग व देशातील बातम्या सर्वात आधी देण्याची माध्यमांची स्पर्धा सुरू आहे. पण सध्याच्या काळात ‘अट्रा लोकल’ बातम्यांना मोठ्या प्रमाणात वाचकाश्रय मिळत आहे. राष्ट्रीय स्तरावरील ८० टक्के पुरस्कार हे ग्रामीण विषयावर देण्यात येतात. पत्रकारितेचे तेज-ओज टिकवून ठेवण्यात ग्रामीण वार्ताहराची भूमिका महत्त्वाची असल्याचे प्रतिपादन ‘दै. दिव्य मराठी’चे राज्य संपादक संजय आवटे यांनी केले.

पुणे येथील सम्यक संशोधन व संसाधन केंद्राच्या वतीने रत्नागिरी जिल्ह्यातील मुरूड येथे सुरक्षित गर्भपात, लिंगनिदान, लिंगभाव, पितृसत्ता, स्त्रियांचे लैंगिक व प्रजनन आरोग्य या विषयांवर तीनदिवसीय कार्यशाळेच्या समारोप कार्यक्रमात प्रमुख वक्ते म्हणून आवटे बोलत होते.

अध्यक्षस्थानी सम्यक संस्थेच्या प्रीतम पोतदार होत्या. प्रमुख पाहुणे म्हणून मुक्त पत्रकार प्रियंका तुपे, सम्यकचे कार्यकारी संचालक आनंद पवार, जुल्फेकार काजी, डॉ. निवास वपरे उपस्थित होते. आवटे म्हणाले, प्रशिक्षणाने पत्रकारांच्या लिखाणाची दिशा समृद्ध होते. जो वाचक नाही त्यांच्यासाठीसुद्धा बोलणे आवश्यक आहे. चोहीकडे अंधार दिसत असताना सर्वसामान्यांसाठी आशादायी चित्र निर्माण करणे आवश्यक आहे. पत्रकारांनी ‘पॉलिटिकली करक्टनेस’ निर्माण करून व्यवस्थेला प्रश्न विचारणे काळाची गरज आहे. टीव्ही मीडियावर सातत्याने बदलत्या भूमिका व डिजिटल मीडियावर येणाऱ्या अफवांमुळे सर्वसामान्य नागरिक द्विधा मनःस्थितीत आहे. यामुळे मुद्रित माध्यमातील मजकुराची विश्वासार्हता अधिकच वाढली आहे. शहरांसह ग्रामीण भागातसुद्धा सुरक्षित गर्भपात, लिंगनिदान, लिंगभाव, पितृसत्ता, स्त्रियांचे लैंगिक व प्रजनन आरोग्य या विषयांवर अनेक चुकीच्या धारणा दिसून येतात. पत्रकारितेच्या माध्यमातून या धारणा बदलवून त्यांना योग्य दिशा देण्याचे काम ग्रामीण वार्ताहरांनी करावे, असे आवाहन संजय आवटे यांनी या वेळी केले.

‘सक्षम ग्रामीण पत्रकार’ पुस्तकाचे प्रकाशन
या वेळी संजय आवटे व उपस्थित मान्यवरांच्या हस्ते ‘सक्षम ग्रामीण पत्रकार’ या पुस्तकाचे प्रकाशन करण्यात आले. तीनदिवसीय कार्यशाळेत उपस्थित पत्रकारांचा प्रमाणपत्र देऊन सत्कार करण्यात आला. कार्यक्रमाच्या आयोजनासाठी सम्यकच्या ज्येष्ठ मार्गदर्शक सुनीता गांधी, गौरी कुलकर्णी, ज्योत्स्ना सोनकुसरे आदींनी सहकार्य केले.

बातम्या आणखी आहेत...