आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
डाउनलोड करावित्त विभागासह विविध महत्वाची खाती सांभाळणारे राज्याचे उपमुख्यमंत्री तथा जिल्ह्याचे पालकमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी शिंदे-फडणवीस सरकारमधील पहिला अर्थसंकल्प आज, गुरुवारी विधीमंडळात सादर केला. हा अर्थसंकल्प सर्वसमावेशक असल्याच्या प्रतिक्रिया सत्ताधारी आमदार व लोकप्रतिनिधींनी व्यक्त केल्या असून याहून सुंदर बजेट असूच शकत नाही, असे त्यांचे म्हणणे आहे. तर सदर अर्थसंकल्प म्हणजे जुन्याच घोषणा असून तेच…ते असल्याचे निरीक्षण माजी अर्थ राज्यमंत्री डॉ. सुनील देशमुख यांच्यासह विरोधी बाकावरील आमदारांनी नोंदविले आहे.
उद्योग, व्यवसायाला चालना कुठाय ?
हा अर्थसंकल्प म्हणजे जुन्याच मुद्द्यांचा पुनरुच्चार आहे. मोर्शी-वरुड भागातील संत्रा प्रकल्पाबाबत कोणतीही ठोस तरतूद त्यात नाही. राज्यातील इतर विमानतळांना काही कोटी रुपये देण्यात आले. परंतु अमरावतीसाठी रकमेचा उल्लेखच नाही. उद्योगासाठी कोणत्याही नव्या सवलती नाही. वैद्यकीय महाविद्यालयाची घोषणा बहुधा चौथ्यांदा केली आहे.
डॉ. सुनील देशमुख, माजी वित्त राज्यमंत्री
अत्यंत चांगले, सर्वसमावेशक बजेट
हे बजेट अत्यंत चांगले व सर्वसमावेशक आहे. विदर्भाचे मंत्री असल्याने फडणवीस यांनी अमरावतीला झुकते माप दिले आहे. सन 2019 मध्ये ज्या बाबी सुटल्या होत्या. त्यापैकी बहुतेक या बजेटने पूर्ण केल्या. शेतकरी, कामगार, अंगणवाडी सेविका-मदतनीस, विद्यार्थी, युवक, उद्योजक या सर्वांसाठी या अर्थसंकल्पात तरतुदी करण्यात आल्या आहेत.
प्रवीण पोटे, आमदार, विधानपरिषद.
पोकळ घोषणा, नवे काहीच नाही
विधीमंडळात आज सादर झालेल्या अर्थसंकल्पात नवे काहीच नाही. अमरावती जिल्ह्याचा सर्वांगीण विकास साधला जावा, यादृष्टीने त्यात कोणतीही ठोस तरतूद करण्यात आली नाही. केवळ पोकळ घोषणा आणि जनतेला भूलथापा देणारे हे बजेट आहे. घसरलेला विकास दर सावरण्यासाठी योजना नाहीत. उद्योग, व्यवसायालाही चालना नाही.
बळवंतराव वानखडे, आमदार, दर्यापूर-अंजनगाव सुर्जी.
लोककल्याणाचा पहिला अर्थसंकल्प
व्यायाम प्रसारक मंडळाला क्रीडा विद्यापीठाचा दर्जा, शिव बाग, महानुभाव पंथीयांची काशी म्हणून ओळख असलेल्या रिद्धपुरला मराठी विद्यापीठ ह्या जमेच्या बाजू आहेत.
चेतन गावंडे, माजी महापौर, अमरावती.
हे बजेट म्हणजे घोषणांचा पाऊस
इडी सरकारचे हे बजेट म्हणजे घोषणांचा पाऊस आहे. १६ हजार १२२ कोटीची वित्तीय तूट या अर्थसंकल्पात आहे. राज्याच्या तिजोरीवर वाढत जाणाऱ्या आर्थिक बोजाकडे लक्ष न देता केवळ सवंग लोकप्रियतेसाठी अवास्तव घोषणांचा पाऊस त्यात आहे. बचावासाठी संत-महात्म्यांची नावे घ्यायची आणि लोकांच्या तोंडाला पाने पुसायची, असा हा प्रकार आहे.
अॅड. यशोमती ठाकूर, माजी पालकमंत्री, अमरावती.
Copyright © 2022-23 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.