आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
डाउनलोड कराअठराव्या राज्यस्तरीय बालनाट्य स्पर्धेच्या शेवटच्या दिवशी बुधवारी सहा नाटकं सादर झाली. दरम्यान गेल्या तीन दिवसात या स्पर्धेंतर्गत १५ नाटकांचे सादरीकरण झाले असून, आता सर्वांच्या नजरा निकालाकडे लागल्या आहेत.
मराठीतील हौशी नाट्य कलावंतांची राज्यस्तरीय स्पर्धा अलीकडेच यशस्वीपणे पार पाडल्यामुळे यावर्षी बाल नाट्य स्पर्धेचे यजमानपदही अ.भा. नाट्य परिषदेच्या अमरावती शाखेकडे देण्यात आले. त्यामुळे बच्चे कंपनीलाही थेट श्री. संत ज्ञानेश्वर सांस्कृतिक नाट्यगृहासारख्या विशाल मंचावरुन आपली कला सादर करता आली. स्पर्धेच्या पहिल्या दिवशी आम्ही नाटक करीत आहोत, बुलेट ट्रेन, उजगोबा, खेळ मदारी वाल्याचा, आळशी राजू आणि जैसा राजा तैसी प्रजा तर दुसऱ्या दिवशी अनाथ, शिवाजी म्हणतो, एकला चलो रे तर आजच्या शेवटच्या दिवशी खादाड, क्षितिजाच्या पलिकडे, राखेतून उडाला मोर, इस्कोट आदी नाटकं सादर करण्यात आली. या सर्व नाटकांमध्ये शालेय विद्यार्थ्यांनी अभिनय सादर केला. स्पर्धेचे समन्वयक अॅड. चंद्रकांत डोरले, सहसमन्वयक विशाल फाटे व श्रद्धा पाटेकर यांनी या सर्वांचे अभिनंदन केले असून लेखक, दिग्दर्शक, नेपथ्यकार, संगीतकार, प्रकाश योजनाकार यांच्यासह परीक्षकांप्रती कृतज्ञता व्यक्त केली आहे.
सर्वांनी बाजू नीट सांभाळली: उन्हाचा तडाखा, त्यातही अनेक शाळांमध्ये सुरु असलेल्या परीक्षा यामुळे अडचणींचा डोंगर उभा होता. परंतु सर्व नाटकांच्या दिग्दर्शक व लेखकांनी आपापली बाजू नीटपणे पार पाडल्यामुळे आम्ही हे दिव्य पूर्णत्वास नेऊ शकलो, असे नाट्य परिषदेचे समन्वयक राजाभाऊ मोरे यांनी ‘दिव्य मराठी’शी बोलताना स्पष्ट केले.
हे आहेत लेखक, दिग्दर्शक
राज्यस्तरीय बालनाट्य स्पर्धेसाठी बालसुलभ भाषेतच नाटकं लिहावी लागतात. त्यासाठी डॉ. श्याम देशमुख, धनंजय सरदेशपांडे, गणेश वानखेडे, आसीफ अन्सारी, आरती घाटपांडे, चैतन्य सरदेशपांडे, अमोल जाधव व डॉ. सतिश साळुंके यांनी आपली लेखणी योग्यपणे चालविली. तर वर्षा देशमुख, निकिता खडसे, स्वाती तराळ, सुनील देशमुख, संतोष सुरकार, सौरभ शेंडे, निशांत उके, सौरभ काळपांडे, हर्षद ससाने, अंकुश गवळी, पवन वाकोडे, धनश्री गायकवाड, अश्वीन जगताप व दीपक नांदगावकर यांनी ती दिग्दर्शित केली. वसंत उके यांनी लेखक आणि दिग्दर्शक अशी दुहेरी भूमिका पार पाडली.
Copyright © 2022-23 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.