आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

व्यक्त केला रोष:शाळेला शिक्षक मिळावे म्हणून जि.प.चे विद्यार्थी पोहोचले पंचायत समितीमध्ये

मोर्शी6 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक

येथून जवळ असलेला चिंचोली गवळी येथील जिल्हा परिषद शाळेमध्ये एकच शिक्षक कार्यरत असल्यामुळे विद्यार्थ्यांचे शैक्षणिक नुकसान होत आहे. आपल्याला शिक्षक मिळावे या मागणीसाठी विद्यार्थ्यांनी थेट पंचायत समिती कार्यालय गाठत गटविकास अधिकाऱ्यांना निवेदन दिले.मोर्शी तालुक्यातील चिंचोली गवळी या गावात जिल्हा परिषदेची शाळा असून या शाळेत इयत्ता आठवी ते दहावीपर्यंत शिक्षण दिले जाते, परंतु या तिन्ही वर्गाला शिकवण्यासाठी एकच शिक्षक आहे. परिणामी दहावीसारख्या महत्त्वाच्या वर्गावर विद्यार्थ्यांना शिकवण्यासाठी शिक्षकच नसल्याने त्यांचे शिक्षण होणार कसे, असा प्रश्न विद्यार्थ्यांसह पालकांना पडला आहे. विशेष म्हणजे या शाळेत शेतकऱ्यांचे मुले आहेत. त्यांची आर्थिक परिस्थितीने बिकट असल्याने पालक आपल्या मुलांना याच शाळेत शिकवतात, परंतु त्यांना पाहिजे तसे शिक्षक न मिळण्यास ते पुढील शिक्षण घेणार तरी कसे, असा प्रश्न पालकांना पडला आहे.

कोरोनाच्या काळात बरेच विद्यार्थी शिक्षणापासून वंचित होते. मोबाईल नसल्यामुळे ते ऑनलाईन अभ्यास सुद्धा करू शकले नाहीत. या वर्षी शाळा सुरू झाली असूनही पुर्ण विषयांसाठी शिक्षक नसल्यामुळे त्यांचे शैक्षणिक नुकसान होत आहे. आपले शैक्षणिक नुकसान होवू नये, तसेच शाळेत शिकवायला आणखी शिक्षक मिळावे यासाठी सरपंच राजू हटकर, सय्यद फारुख सै. अहमद तसेच गावातील इतर नागरिकांसह शाळेतील विद्यार्थ्यांनी मोर्शी येथील पंचायत समिती कार्यालय गाठून गटविकास अधिकारी यांना शिक्षक मिळण्याबाबत निवेदन दिले. शाळेला शिक्षक कधी मिळणार, याकडे विद्यार्थ्यांसह पालक व ग्रामस्थांचे लक्ष लागले आहे.

जिल्हाधिकाऱ्यांनाही दिले निवेदन
ग्रामपंचायत सरपंच राजु हटकर यांनी शिक्षक देण्याची मागणी केली, परंतु अद्यापही शिक्षक मिळाले नाहीत. परिणामी विद्यार्थ्यांचे शैक्षणिक नुकसान होत आहे. शाळेला शिक्षक देऊन शाळा व्यवस्थित सुरू करावी, अशी मागणी निवेदनाद्वारे गावकरी व सरपंच यांनी गटशिक्षण अधिकारी, खंडविकास अधिकारी व जिल्हाधिकाऱ्यांकडे केली आहे.

शिक्षकांसाठी वरिष्ठांकडे करणार मागणी
मोर्शी तालुक्यात ५० शिक्षक कमी आहेत. या शाळेत आणखी दोन शिक्षक देण्यात येणार आहेत. येत्या काही दिवसातचे वरिष्ठांकडे याबाबत मागणी करून शाळेला आणखी शिक्षक देण्यात येईल.
- उज्वला ढोले, गटविकास अधिकारी, मोर्शी

बातम्या आणखी आहेत...