आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

वेल्डींग सुरू असताना ट्रकला आग:चालकाने जीवाची पर्वा न करता इतरत्र हलवला ट्रक; 550 रिकामे कॅरेट जळून खाक

अंजनगांव सुर्जी8 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक

संत्र्याची वाहतूक करणाऱ्या ट्रकचे वेल्डींग सुरू असतानाच अचानक आग लागली. तरीही प्रसंगावधान राखून चालकाने जळता ट्रक इतरत्र हलविला. त्यामुळे मोठे नुकसान ट‌ळले. परंतु तोपर्यंत ट्रकमधील 550 रिकामे कॅरेट जळून खाक झाल्याने अंदाजे दोन लाख रुपयांचे नुकसान झाले.

आज, मंगळवारी दुपारच्या सुमारास ट्रक मालक रेयाज अहमद खान युनिश खान यांनी त्यांचा अशोक लिलँड ट्रक (एम पी 48 एच 1058) हा नादुरुस्त झाल्याने वेल्डींग करण्यासाठी एका दुकानात आणला. त्यानंतर वेल्डिंगचे काम सुरू झाले. परंतु दुरुस्तीकार्य सुरू असतानाच ट्रकने अचानक पेट घेतला. ज्यामुळे ट्रकमध्ये असलेले 550 कॅरेट जळून खाक झाले. जर ट्रक त्याच ठिकाणी राहिला असता तर आजूबाजूच्या संत्रा मंडी व इतर दुकानांचे मोठे नुकसान झाले असते.

आग नियंत्रणात आणली

ते टाळण्यासाठी चालकाने अत्यंत धाडसाने पेटता ट्रक थोड्या अंतरावरच पाण्याची उपलब्धता असलेल्या संत्रा मंडीपर्यंत नेला. त्यानंतर आग नियंत्रणात आणली गेली. दरम्यान पेटता ट्रक चालवत नेत असतानाचे दृष्य अनेकांनी आपल्या डोळ्यामध्ये साठविले. काही शौकीनांनी या घटनेचे व्हिडीओ काढून ते एक-दुसऱ्यांना पाठविले.

चालकाचे कौतुक

अनेकदा रस्त्यावर बर्निंग मोटारगाडी वा रेल्वे रुळावर बर्निंग ट्रेन दिसून येते. परंतु अंजनगाव सुर्जीसारख्या तालुक्याच्या ठिकाणी थेट बर्निंग ट्रक धावत असल्याची ही पहिलीच घटना आहे. या घटनेमुळे काहींचे मनोरंजन झाले तर अनेकांच्या हृदयाचा थरकापही उडाला. दरम्यान अग्नीशमन विभागाचे वाहन येईपर्यंत आग पूर्ण आटोक्यत आली होती. या घटनेबद्दल चालक अंकुश शेगोकार यांचे सर्वत्र कौतुक केले जात आहे.