आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
डाउनलोड कराअवघा विदर्भच नव्हे तर संपूर्ण महाराष्ट्राला भुरळ घालणाऱ्या मेळघाटचे खरे वैभव त्यात असलेल्या जैव विविधतेत आहे. ९०० हून अधिक वनस्पती, ३५ प्रकारचे सस्तन प्राणी, २९५ प्रजातींचे पक्षी, १३१ प्रजातींची फुलपाखरे, २०० पेक्षा जास्त कोळी प्रजाती, ३६ प्रकारचे साप तसेच ११ जातींच्या बेडूक प्रजाती अशा विविधतेने नटलेला हा परिसर आहे. उद्या, रविवार, ५ जून हा जागतिक पर्यावरण दिन आहे. त्यानिमित्त या संपदेची आठवण क्रमप्राप्त झाली आहे.
मेळघाट हे अमरावती जिल्ह्यातील वनक्षेत्र असले तरी राज्यातील इतर वनक्षेत्रांच्या तुलनेत ते मोठे आहे. जिल्ह्यात वेगवेगळे अधिवास असलेली जंगले असून त्यामध्ये, सातपुडा पर्वत रांगेतील मेळघाटचे राकट जंगल, त्याच पर्वत रांगेत सालबर्डी व महेंद्रीचे जंगल शिवाय अमरावती शहराजवळ असलेले वडाळी-पोहरा-मालखेडचे जंगल आहे. काही ठिकाणी झुडपी काटेरी जंगल तर अमरावती ते तिवसा व मोर्शी या ठिकाणांच्या मध्यात गवताळ माळरानांचे पट्टे आहे.
मेळघाटचे जंगल हे संरक्षित असल्यामुळे आणि गेल्या ४९ वर्षापासून खास वाघांसाठी व्याघ्रप्रकल्प योजनेत विशेष संरक्षण मिळाल्यामुळे तेथील जैवविविधता टिकून राहण्यास मोलाची मदत झाली आहे. हे जंगल टिकून राहिल्यामुळे या जंगलातून उगम पावणाऱ्या नद्या आजही जिल्ह्यातील मुख्य जलसिंचन प्रकल्पासाठी महत्वाची उपलब्धी ठरल्या आहेत. मेळघाटमधून उगम पावणाऱ्या सिपना, खापरा, खंडू, डोलार, व गदग ह्या नद्या तापी नदीला मिळतात तर वन शहानूर, सापण, बिच्छन ह्या नद्यांवर बांधलेल्या सिंचन प्रकल्पामुळे अमरावती जिल्ह्यास पिण्याचे पाणी उपलब्ध झाले आहे.
दरम्यान, जागतिक पर्यावरण दिनानिमित्त उद्या, रविवारी सकाळी ७ वाजता बांबू गार्डन ते वडाळी तलाव असा निसर्ग भ्रमणाचा कार्यक्रम आखण्यात आला आहे. वनाधिकारी नितीन गोंडाने आणि वन्यजीव व पर्यावरण संवर्धन संस्थेचे (वेक्स) संस्थापक डॉ. जयंत वडतकर यांनी संयुक्तपणे हा उपक्रम आखला आहे. या भ्रमणादरम्यान तेथील जैवविविधता जाणून घेण्यात येईल. नागरिकांनी या संधीचा लाभ घ्यावा, असे आवाहनही त्यांनी केले आहे.
११३ वर्षानंतर आढळला रानपिंगळा मेळघाटचे वनक्षेत्र हे दुर्मिळ प्रजातींसाठीसुद्धा महत्वाचा अधिवास आहे. याठिकाणी भारतातून नामशेष झालेला आणि ११३ वर्षानंतर पुनर्शोध लागलेला रानपिंगळा ही दुर्मिळ घुबड प्रजाती चांगल्या संखेत आढळून येते. या पक्ष्यासाठी जगभरातून पक्षी अभ्यासक आणि पर्यटक मेळघाटलाभेट देत असतात. रानपिंगळा दिसून आल्याने मेळघाटच्या वन्यजीव संपदेत मोलाची भर पडली आहे.
… तरच वाचवता येईल जंगल ^वेगवेगळया प्रकल्पांसाठी जमीन हस्तांतरित झाल्याने मेळघाटसह जिल्ह्यातील जैवविविधता संकटात सापडली आहे. वन खात्याने या मुद्द्यांकडे लक्ष पुरवून उपाययोजना करणे क्रमप्राप्त झाले आहे. -डॉ. जयंत वडतकर, संस्थापक, वेक्स (वाईल्ड लाईफ अॅन्ड एन्व्हायरमेंट कन्झर्वेशन सोसायटी.)
प्लास्टिकवर बंदी आणा ^मेळघाट किंवा इतर जंगलसफारींमध्ये नागरिक मोठ्या प्रमाणात प्लास्टिकचा वापर करतात. खाद्यपदार्थांचे पाऊच, पाण्याच्या बाटल्या अशा माध्यमातून जंगलात प्लास्टिक नेले जाते. नागरिक रिकाम्या बाटल्या, कंटेनर व पन्नी तेथेच फेकून देतात.त्यावर बंदी आणली जावी. -नीलेश कांचनपुरे, अध्यक्ष, वॉर (वाईल्ड लाईफ अवेअरनेस रिसर्च, रेस्क्यू, वेलफेअर सोसायटी.)
Copyright © 2022-23 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.