आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

मागणी:प्राणवायू पुरवणारे दोनशे वर्षे जुने वडाच्या फांद्या तोडल्या; अंजनगाव सुर्जीत असंतोष

अंजनगाव सुर्जी3 दिवसांपूर्वी
  • कॉपी लिंक

‘वृक्ष लावा -वृक्ष जागवा’ ही मोहीम संपुर्ण देशात सुरु असतांना येथे प्राणवायू पुरवणाऱ्या व संरक्षित श्रेणीत असलेल्या दोनशे वर्षे जुन्या महाकाय वडाच्या वृक्षाला बोडखे करण्यात आले. यामुळे निसर्गप्रेमी मध्ये संताप व्यक्त केल्या जात असून, वडाचे झाड तोडण्याची परवानगी देणाऱ्या संबंधित अधिकाऱ्यांवर कार्यवाही करण्याची मागणी होत आहे.

येथील गोकुळढुसा परिसरात शीट न. ९, प्लॉट न. ५/२ येथे सुमारे दोनशे वर्षे जुने असलेले वडाचे झाड होते. शहरातील अनेक पिढ्या या झाडाला पाहून प्रसन्न व्हायच्या. त्याचे कारणही तसेच होते. एवढा मोठा वृक्ष अंजनगाव सुर्जी शहरात कोठेच नव्हता. काही दिवसापुर्वी पर्यंत या झाडाखाली भटक्या जमातीचे १५ ते २० कुटूंब राहुटी करुन वास्तव्याला होते. त्यांना तेथून बळजबरीने हुसकावून लावून मुळ मालकाने जागा अधिग्रहीत केली. या जागेवर आता बांधकामाचे प्रयोजन असल्याने विद्युत वाहिनीत झाडाचा अडथळा येतो, असे सांगत मूळ मालकाने झाडाच्या फांद्या कापण्याची परवानगी मागितली. त्यासाठी नगरपरीषदेचे वृक्ष अधिकारी तथा मुख्याधिकारी यांच्याकडे २८ एप्रिलला अर्ज सादर करण्यात आला. त्यावर वृक्ष प्राधिकरणाने २० मे रोजी सभा घेऊन परवानगी दिली. परंतु त्याच परवानगीचा आधार घेत अर्धे झाडच छाटून काढण्यात आले. त्यामुळे या महा वृक्षाचे वैभवच नष्ट झाले असून, तालुक्यातील वृक्षप्रेमींमध्ये संताप व्यक्त केल्या जात आहे. त्याचवेळी परवानगी देणाऱ्या कर्मचारी-अधिकाऱ्यांवर कार्यवाहीची मागणी केल्या जात आहे. यासंदर्भात काही वृक्षप्रेमींनी मुख्याधिकाऱ्यांना निवेदनही दिले.

नागरिकांच्या हस्तक्षेपामुळे काही भाग वाचला :
काही दिवसांपूर्वी या वृक्षाखाली २० ते २५ कुटुंब रहात होते. त्यावरून वृक्ष किती मोठा असेल, याचा अंदाज येतो. दरम्यान, एवढ्या मोठ्या ऐतिहासिक वृक्षाला तोडण्याची परवानगी नक्कीच लोभापायी दिली असणार अशी चर्चा शहरात आहे. दरम्यान, वृक्षाची कटाई चालू असताना काही वृक्षप्रेमी नागरिकांनी विरोध दर्शवला त्यामुळे हे वृक्ष काही प्रमाणात वाचले.

बातम्या आणखी आहेत...