आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

आगामी काळ हा आंबेडकरी गझलचाच:संमेलनाध्यक्ष प्रमोद वाळके 'युगंधर' यांचे प्रतिपादन

अमरावती24 दिवसांपूर्वी
  • कॉपी लिंक

आंबेडकरी गझल आता किशोरावस्थेत राहिली नाही. मराठी गझल वाङ्मयाच्या आकाशात झेप घेण्यासाठी ती आता सिद्ध झाली आहे. त्यात उपयोजित केलेल्या बाबासाहेबांच्या संस्कारस्वभावी समरशब्दांनी ती ऊर्जावर्धित झाली आहे. या अंगभूत मूल्यभानामुळे आगामी काळ हा आंबेडकरी गझलचाच असेल असे प्रतिपादन प्रमोद वाळके ‘युगंधर’ यांनी केले.

अ. भा. आंबेडकरी साहित्य आणि संस्कृती संवर्धन महामंडळाशी संलग्न ‘आशय’ संस्थेतर्फे येथील भीमटेकडी परिसरात रविवारी आंबेडकरी गझल संमेलन पार पडले या संमेलनाचे अध्यक्ष म्हणून ते बोलत होते. मंचावर संमेलनाचे उद्घाटक डॉ. इकबाल मिन्ने, स्वागताध्यक्ष ज्ञानेश्वर रोकडे, प्रमुख अतिथी अशोक बुरबुरे, महामंडळाच्या अध्यक्ष डॉ. सीमा मेश्राम-मोरे, आशाताई थोरात, नंदकिशोर दामोदर, महामंडळाचे निमंत्रक प्रशांत वंजारे, प्रा. आरीफ शेख, अनंत भवरे उपस्थित होते.

वाळके पुढे म्हणाले, आंबेडकरी गझल संपूर्णतः आंबेडकरवादावर उभी आहे. आम्ही आंबेडकरवादी आहोत, म्हणजेच आंबेडकरवाद ही आमची जीवनशैली आहे. आंबेडकरवाद हे जीवनाची पुनर्रचना करणारे शास्त्र आहे आणि पुनर्रचना या अन्वर्थक शब्दात सम्यक विचारांची, सम्यक जीवनाची सूत्रे आहेत. या विचारांमध्ये सुस्पष्टता आहे. या सूत्रांचे मूळ धम्मात आहे. धम्मातील पंचशील म्हणजे आपल्या उन्नत जीवनाचे अनुच्छेद आहेत. जगण्याचे नियम आहेत. या नियमांचे पालन करण्यासाठी अष्टांगमार्गाचे अनुसरून करणे आवश्यक आहे. आपला उदरनिर्वाह, आपले कर्म, आपले वर्तन, दृष्टी, आचरण, प्रवृत्ती, वाणी, निश्चय, स्मरण, एकाग्रता, ज्ञान, आपण करीत असलेल्या कामाचे प्रयत्न सम्यक मार्गानेच केले पाहिजे, हा पुनर्रचनेचा सिद्धांत आहे आणि जीवनाच्या पुनर्रचनेचा हा सिद्धांत म्हणजेच आंबेडकरवाद आहे. या सर्वच बाबींवर आंबेडकरी गझल उभी आहे. त्याला कारणीभूत आंबेडकरी गझलच्या मिशनमध्ये सहभागी झालेले सर्वच गझलकार, समीक्षक आहेत.

उदघाटक डॉ. इकबाल मिन्ने म्हणाले, आंबेडकरी गझल नैसर्गिक आहे. या गजलेत बंधुभाव, न्यायप्रियता, एकमेकांवरील प्रेम, सहिष्णुता, एकमेकांचा आदर, नवसर्जन, परिवर्तन, सलोखा, सौहार्द, कणव, सामाजिक अभिसरण, वैज्ञानिक दृष्टिकोन सहजपणे वावरताना दिसतो. शरीरातील धमन्यातून रक्त जसे प्रवाहित होत असते आणि रक्ताचे अभिसरण होत असते त्याचप्रमाणे आंबेडकरी गझल समाजाच्या नसानसातून अभिसरण होताना दिसते. ती माणुसकी जपते. ती मानवाच्या दुःखमुक्तीसाठी सातत्याने लढा देते. आधुनिक जदीद उर्दू गझल आणि आंबेडकरवादी गजल एकमेकांना पूरक आहे. या दोघींनी एकमेकाचा हात धरून अचूक मार्ग निवडला तर साहित्यिक, सामाजिक, आर्थिक विश्वातच नव्हे तर राजकीय क्षेत्रातही फार मोठ्या परिवर्तनाची नांदी ठरू शकेल. यावेळी अशोक बुरबुरे, आशाताई थोरात, डॉ. सीमा मेश्राम यांनीही समायोचीत विचार मांडले. प्रास्ताविक रोशन गजभिये यांनी केले. संचालन विजय वानखेडे तर आभार राजेश गरूड यांनी मानले.

बातम्या आणखी आहेत...