आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

आंदोलन:कामनापूरच्या ग्रामस्थांचे वीज केंद्रावर मध्यरात्री ठिय्या आंदोलन

धामणगाव रेल्वे12 दिवसांपूर्वी
  • कॉपी लिंक

ट्रान्सफाॅर्मर नादुरुस्त असल्याने कामनापूर घुसळी या गावातील विद्युत प्रवाह सतत खंडीत होत असल्याने त्रस्त झालेल्या नागरिकांनी रविवारी (दि. ३१ जुलै) रात्री गाव अंधारात गेल्याने महावितरण केंद्रावर धडक देत मध्यरात्रीपर्यंत धरणे आंदोलन केले. दरम्यान दोन महिन्यांपूर्वीपासून असलेली समस्या सोडवण्यासाठी आमदार प्रताप अडसड यांनी मध्यस्थी करून समस्या सोडवण्याचे निर्देश दिल्याने सोमवारी कामनापूर घुसळी येथे नवीन ट्रान्स्फॉर्मर बसवण्याचे काम सुरू झाले आहे.

दोन हजार लोकवस्तीच्या गावात दोन महिन्यापासून ट्रान्स्फॉर्मर नादुरुस्त असल्यामुळे या गावाला रात्रीला वीजपुरवठा वेळोवेळी खंडित होत होता. दरम्यान पावसाळ्याचे दिवस असल्याने गावात असलेला काळोख गावकऱ्यांच्या जीविताला धोका निर्माण करणारा असल्याने सरपंच राजेश बांते व गावकऱ्यांनी महावितरणच्या अधिकाऱ्यांना भेटून सदर ट्रान्स्फॉर्मर बदलून देण्याची वारंवार विनंती केली. मात्र महावितरणने त्याची दखल न घेतल्याने संतप्त ग्रामस्थांनी रविवारी मध्यरात्री नारगावडी येथील वीज केंद्रावर ठिय्या आंदोलन केले.

जोपर्यंत वीज पुरवठा सुरळीत होत नाही, तोपर्यंत हटणार नाही, अशी भूमिका ग्रामस्थांनी घेतली होती. दरम्यान मध्यरात्री आमदार अडसड यांनी वीज मंडळाचे उपविभागीय अभियंता यू. के. राठोड यांच्याशी संपर्क साधून ट्रान्सफॉर्मर दुरुस्ती करून वीजपुरवठा सुरू करण्याचे निर्देश दिले होते. आमदारांच्या मध्यस्थीनंतर ग्रामस्थांनी आंदोलन मागे घेतले. या आंदोलनात सरपंच राजेश बांते, उपसरपंच सुभाष ढबले, सागर घुसळीकर, महेंद्र बांते, दिनेश रिठे, रामकृष्ण लसवंते, रंजन शिंगणापुरे, रघुनाथ मडावी, रोशन कोडापे, मनोहर लसवंते, शरद मोहोड, सुरेश बोरकर यांची उपस्थिती होती.

बातम्या आणखी आहेत...