आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

उलगडा:अखेर प्रतीक्षा संपली; जिल्हा परिषदेच्या सात नव्या मतदारसंघांवर प्रशासनाचे शिक्कामोर्तब ; 8 जूनपर्यंत स्वीकारणार सूचना, हरकती

अमरावतीएका महिन्यापूर्वी
  • कॉपी लिंक

जिल्हा परिषदेतील बहुप्रतीक्षित वाढीव मतदारसंघांचा उलगडा गुरुवारी जिल्हा प्रशासनातर्फे करण्यात आला. चांदूरबाजार, वरुड, धारणी, दर्यापूर, अंजनगाव सुर्जी, भातकुली व अचलपूर या सात तालुक्यांमध्ये सदर वाढीव सात मतदार संघांना जागा मिळाली आहे. या वाढीव मतदारसंघांमुळे जिल्ह्यातील एकूण मतदारसंघांची संख्या ६६ वर पोहोचली असून प्रत्येक मतदारसंघातील गावांची यादीही जाहीर झाली आहे. दरम्यान मतदारसंघांची संपूर्ण रचना घोषित झाल्याने जिल्ह्याचे राजकारण ढवळून निघाले असून, प्रत्येक राजकीय पक्ष त्यादृष्टीने कामाला लागला आहे. राजकारण्यांच्या या तयारीचे तपशील ‘दिव्य मराठी’ने गेल्या आठवड्यातच नागरिकांपुढे मांडले होते. दरम्यान गुरुवारी घोषित झालेल्या प्रारूपावर ८ जूनपर्यंत सूचना व हरकती स्वीकारल्या जातील. त्यानंतर २२ जूनपर्यंत विभागीय आयुक्तांच्या दालनात प्रत्येक तक्रारदाराचे म्हणणे ऐकून घेतले जाणार असून २७ जून रोजी जिल्हा परिषदेच्या मतदारसंघांची अंतिम यादी घोषित केली जाईल. प्राप्त तपशीलानुसार, चांदूर बाजार तालुक्यात सोनोरी, वरुड तालुक्यात शहापूर, धारणीत घुटी, दर्यापूरमध्ये माहुली धांडे, अंजनगाव सुर्जी तालुक्यात खानमपूर पांढरी, भातकुलीत निंभा तर अचलपूर तालुक्यात गौरखेडा कुंभी हा नवा मतदारसंघ तयार झाला आहे. जिल्हा निवडणूक निर्णय अधिकारी तथा जिल्हाधिकारी यांनी गेल्या २३ मे रोजीच या निवडणुकीचे प्रारूप येथील विभागीय आयुक्तांना सादर केले होते. त्यांनी पडताळणी करून ३१ मे रोजी जिल्हाधिकारी यांच्याकडे ते परत पाठवले. त्यानंतर गुरुवार, २ जून रोजी प्रभारी जिल्हाधिकारी अविश्यांत पंडा यांनी या प्रारुपाची अधिकृत घोषणा केली. या घोषणेनंतर जिल्ह्याचा एकूण भूभाग या वर्षी पहिल्यांदाच ६६ मतदारसंघांमध्ये विभाजित करण्यात आला आहे. इतर मतदारसंघांच्या नावातही फेरबदल-नवे सात मतदारसंघ निर्माण करताना त्या-त्या तालुक्यातील आधीच्या काही मतदारसंघांची नावेही बदलली आहेत. अर्थात गेल्या जि. प. निवडणुकीवेळी अस्तित्वात असलेल्या सर्व ५९ मतदार संघांना या वेळच्या नव्या यादीत स्थान प्राप्त झाले नाही. त्यातील बहुतेक मतदारसंघ कायम आहेत. परंतु नवे मतदारसंघ तयार करताना काही गावे या मतदारसंघातील तर काही गावे लगतच्या मतदारसंघातील घ्यावी लागतात, त्यामुळे नावांमध्ये बदल हा क्रमप्राप्त ठरतो. निवडणूक आयोगाच्या निकषानुसार संबंधित मतदारसंघात ज्या गावाची लोकसंख्या सर्वाधिक त्या, गावाचे नाव त्या मतदारसंघाला द्यावे लागते. त्यामुळे मतदारसंघांच्या नावात बदल होणे, ही नित्याचीच बाब आहे. पंचायत समितीत १४ मतदारसंघांची वाढ - जिल्हा परिषदेचा प्रत्येक मतदारसंघ हा पंचायत समित्यांचे दोन मतदारसंघ मिळून बनलेला असतो. त्यामुळे जिल्हा परिषदेत जसे सात मतदारसंघ वाढले, तसेच पंचायत समित्यांच्या एकूण मतदारसंघातही १४ ची वाढ नोंदवली गेली. या नव्या समीकरणामुळे जिल्ह्यातील १४ पंचायत समित्यांच्या एकूण मतदारसंघांची संख्या ११८ वरुन १३२ वर जाऊन पोहोचली आहे. त्यामुळे पंचायत समिती निवडणुकीतही यावेळी १४ ठिकाणाहून नव्या सदस्यांना संधी प्राप्त होणार आहे.

बातम्या आणखी आहेत...