आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

NPS हटावसाठी निवृत्त कर्मचाऱ्यांचा तीव्र आंदोलनाचा इशारा:उद्या होणार सप्ताहाचा समारोप; कार्यालयांसमोर होणार निदर्शने

अमरावती5 दिवसांपूर्वी
  • कॉपी लिंक

राष्ट्रीय पेन्शन योजना (एनपीएस) या नावाने ओळखल्या जाणाऱ्या नव्या पेन्शन योजनेच्या विरोधात अ. भा. कर्मचारी महासंघाच्या मार्गदर्शनात राज्य सरकारी कर्मचारी मध्यवर्ती संघटनेने ‘एनपीएस हटाव’ सप्ताह पुकारला आहे.

21 नोव्हेेंबरपासून सुरू झालेल्या या सप्ताहाचा समारोप उद्या, 25 नोव्हेंबरला होत आहे. या सप्ताहांतर्गत जेवणाच्या सुटीत त्या-त्या कार्यालयांसमोर निदर्शने करण्यात आली. उद्या, शुक्रवारी ही अनेक कार्यालयांसमोर निदर्शने केली जाणार आहेत.

दरम्यान निदर्शनानंतही सरकारने याबाबत सकारात्मक भूमिका घेतली नाही तर भविष्यात यापेक्षाही तीव्र आंदोलन छेडले जाणार असल्याचा इशारा देण्यात आला आहे. राज्य सरकारी कर्मचारी मध्यवर्ती संघटनेचे अध्यक्ष हिम्मतराव घोम व सरचिटणीस दामोधरराव पवार यांच्या नेतृत्वात जिल्ह्यात हे आंदोलन केले जात आहे.

नव्या पेन्शन योजनेला विरोध करतानाच जुनी पेन्शन योजना लागू करा, या मागणीसाठी गेल्या 17 वर्षांपासून संघटनेचा लढा सुरू आहे. त्यानंतर इतरही संघटनांनी या आंदोलनाला पाठिंबा दिला असून अंशदायी पेन्शन योजनेच्या विरोधात संयुक्त संघर्ष सतत सुरू आहे. परंतु वारंवार हा मुद्दा रेटल्यानंतरही सरकारने अद्याप नवी योजना बंद करुन जुनी पेन्शन योजना लागू केली नाही.

राजस्थान, झारखंड, छत्तीसगढ व गोवा सरकारने अंशदायी पेन्शन योजना रद्द करून जुनीच पेन्शन लागू करण्याचा निर्णय घेतला आहे. यातील काही निर्णय अलिकडेच घेण्यात आले. सध्या सत्तेत असलेली मंडळी जेव्हा विरोधी बाकावर होती, तेव्हा त्यांनीही नव्या पेन्शन योजनेला विरोध दर्शविला होता. परंतु आता सत्तेत असतानाही त्यांनी अद्याप कामगारांच्या हिताचा निर्णय घेतला नाही. त्यासाठीच 21 ते 25 नोव्हेंबरदरम्यान एनपीएस हटाव सप्ताह पाळण्यात येत आहे. या योजनेला फार पूर्वीपासून विरोध होत असल्याने आताचे महाराष्ट्राचे राज्यपाल भगतसिंग कोश्यारी ज्यावेळी केंद्रीय मंत्री होते, त्यावेळी त्यांच्या नेतृत्वात एक समिती गठित करण्यात आली होती. त्यांनीसुद्धा नवी पेन्शन योजना कामगारहिताची नसल्याचा ठपका ठेवत त्यात काही सुधारणा प्रस्तावित केल्या होत्या. मात्र त्या सुधारणादेखील राज्यकर्त्यांनी लागू केल्या नाहीत, असे संघटनेचे पदाधिकारी डी. एस. पवार यांनी सांगितले.

सध्याच्या आंदोलनाची दखल न घेतल्यास भविष्यात बेमुदत संप अटळ असल्याचेही डी.एस. पवार यांनी स्पष्ट केले. त्यासाठी या आंदोलनामार्फत कर्मचाऱ्यांची मानसिकता तयार केली जात आहे. दरम्यान भविष्यातील आंदोलनांसाठी कर्मचाऱ्यांनी त्यांच्या वाट्याची वार्षिक निधी जमा करुन सहकार्य करावे, असे आवाहन करतानाच यासंदर्भात येत्या 8 डिसेंबरला दिल्ली येथे होणाऱ्या अधिवेशनात एनपीएसधारकांनी सहभाग दर्शवावा, अशी सूचनाही संबंधितांना देण्यात आली आहे.

बातम्या आणखी आहेत...