आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

पती 48 तास करीत होता पत्नीला घरात मारहाण:डोक्यात शस्त्राचा घाव बसल्याने पत्नी जागीच गतप्राण; अमरावतीच्या मांडवानगरातील प्रकार

अमरावती4 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक

गाडगेनगर पोलिस ठाण्याच्या हद्दीतील मांडवानगर झोपडपट्टीमध्ये राहणाऱ्या एका 50 वर्षीय महिलेला तिचा पती मागील दोन दिवसांपासून सतत मारहाण करत होता. या मारहाणीत महिलेचा मृत्यू झाला. ही गंभीर बाब बुधवारी उघड झाली. या प्रकरणी पोलिसांनी बुधवारी सायंकाळी मृत महिलेच्या पतीविरुद्ध खुनाचा गुन्हा दाखल केला आहे.

मीरा नरेश ढोके (50) असे मृत महिलेचे तर नरेश ढोके असे तिच्या संशयित मारेकरी पतीचे नाव आहे. नरेश ढोकेने मागील दोन दिवसापासून मीराला मारहाण सुरू केली होती. दरम्यान बुधवारी सकाळी मीरा यांच्या घराशेजारी राहणारी एक महिला त्यांच्या घरात गेली. त्यावेळी मीरा निपचित अवस्थेत घरात पडून होती.

यामुळे शेजारी महिलेने मीरा यांची आई सुमन सखाराम इंगळे (रा. लांडी ता. दर्यापूर) यांना फोन करून ही माहिती दिली. त्याच दरम्यान मीरा यांचे मुलं घरी आले व त्यांनी मिरा यांना तात्काळ रुग्णालयात नेले.

रुग्णालयात डॉक्टरांनी तपासणी करून मृत घोषित केले. दरम्यान मीरा यांच्या मृतदेहाची उत्तरीय तपासणी करण्यात आली. त्यावेळी त्यांच्या डोक्यावर जोरदार वस्तूने प्रहार केल्यामुळे मृत्यू झाल्याचे प्राथमिक शवविच्छेदन अहवालातून समोर आले. त्यामुळे मीराचा मृत्यू पतीने केलेल्या मारहाणीतच झाला असल्याची तक्रार मीरा यांची आई सुमन इंगळे यांनी गाडगे नगर पोलिसात दिली.

या तक्रारीवरून पोलिसांनी तात्काळ नरेश ढोकेविरुद्ध खुनाचा गुन्हा दाखल करून त्याचा शोध सुरू केला आहे. मारेकर्‍याला अटक केल्यानंतर त्याने नेमके कोणते शस्त्र किंवा वस्तूचा वापर करून मीरा यांच्या डोक्यावर हल्ला चढवला, ही बाब समोर येणार आहे. त्यामुळे आरोपीला तात्काळ अटक करण्यासाठी पोलिसांनी प्रयत्न सुरू केले आहेत. या प्रकाराने शहरात चांगलीच खळबळ उडाली आहे.

मारेकऱ्याचा शोध सुरू

''मागील दोन दिवसांपासून मीराला तिच्या पतीने मारहाण केली व त्यातच मृत्यू झाला. अशी तक्रार प्राप्त झाली आहे. तक्रारीवरून गुन्हा दाखल केला असून या प्रकरणी मारेकऱ्याचा शोध सुरू आहे.'' - आसाराम चोरमले, ठाणेदार गाडगेनगर.

बातम्या आणखी आहेत...