आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

गुन्हा:महिलेच्या चेहऱ्यावर महिलेनेच फेकली मिरची पूड; चाकू दाखवत लूटले दागिने

अमरावती13 दिवसांपूर्वी
  • कॉपी लिंक
  • सिंधूनगरातील प्रेमप्रकाश आश्रमातील घटना; महिलेच्या कानाला झाली गंभीर दुखापत

शहरातील सिंधूनगरमध्ये राहणारी एक ५६ वर्षीय महिला परिसरातील प्रेमप्रकाश आश्रमात गेली होती. त्याचवेळी एका महिलेनेच या महिलेच्या डोळ्यात मिरची पूड फेकून तिला चाकू दाखवला. तसेच त्या महिलेच्या दोन्ही कानात असलेले सोन्याचे दागिने जबरीने ओढून काढून नेले. कानातील दागिने ओढल्यामुळे त्या ५६ वर्षीय महिलेचे दोन्ही कान अक्षरश: फाटले असून, तिला गंभीर दुखापत झाली आहे. हा थरारक घटनाक्रम रविवारी . ६ जूनला सकाळी साडेआठ वाजताच्या सुमारास घडला आहे. या घटनेने शहरातील महिलांमध्ये आता दुचाकीस्वार भामट्यासंह चोरी करणाऱ्या महिलांची चांगलीच धास्ती तयार झाली आहे. राजकीबाई प्रकाशलाल तेजवाणी (५६, रा. मुरली अपार्टमेंट, सिंधूनगर, अमरावती.) असे महिला लूटारुने लुटमार करुन जखमी केलेल्या महिलेचे नाव आहे. राजकिबाई या रविवारी सकाळी सिंधूनगर परिसरातील प्रेमप्रकाश आश्रमात गेल्या होत्या.

आश्रमातील स्वच्छता मूर्तींची पूजा करुन सेवा देण्यासाठी त्या जात असतात. दरम्यान रविवारी सकाळी ८ वाजून २० मिनीटांच्या आसपास त्या आश्रमात गेल्या होत्या. त्यांनी आश्रमाच्या प्रवेशद्वाराचे कुलूप उघडले आणि आतमध्ये जावून मूर्तींची पूजा केली. दर्शन घेत असतानाच त्यांच्या मागून अंदाजे ३५ ते ४० वर्ष वयाची पिवळी साडी परिधान केलेली एक अनोळखी महिला आली. त्या महिलेने राजकिबाई यांच्या चेहऱ्यावर मिरची पूड फेकली आणि त्यांना धक्काबुक्की करुन खाली पाडले. याचवेळी त्या महिलेने जवळ असलेला चाकू काढून राजकिबाईला लावून धमकावले आणि राजकिबाईंच्या दोन्ही कानात असलेले सोन्याचे टॉप्स, त्याच टॉप्सला सोनखाखळींचे वेल असल्यामुळे ते कानाच्या वरच्या बाजूलाही टोचले होते. त्या लूटारु महिलेने बळजबरीने राजकिबाई यांच्या दोन्ही कानातील हे दागिने ओढल्यामुळे अक्षरश: त्यांचे दोन्ही कान फाटले.

दरम्यान त्या लुटारु महिलेने ते दागिने काढून घेवून ती पसार झाली. लूटारु महिलेने निर्दयीपणे राजकिबाईंच्या कानातील दागिने ओढल्याने त्यांच्या दोन्ही कानातून रक्ताच्या धारा लागल्या होत्या. त्यांच्या दोन्ही कानाला टाके लागले आहे. या झटापटीत एका कानातील दागिना त्याच ठिकाणी पडला मात्र दुसरा सात ग्रॅमचा दागिना घेवून ती महिला आश्रमाच्या सुरक्षाभिंतीवरुन उडी मारुन पसार झाली. या धक्कादायक प्रकाराने राजकिबाई चांगल्याच घाबरल्या. त्यांनी आरडाओरड केल्यानंतर आजूबाजूने राहणारे नागरिक तिथे पोहाेचले. त्यांनी लूटारु महिलेचा पाठलाग करण्याचा प्रयत्न केला मात्र ती महिला पळून जाण्यात यशस्वी झाली.

या घटनेने परिसरात चांगलीच खळबळ उडाली असून, नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण तयार झाले आहे. आतापर्यंत दुचाकीवरुन येणारे भामटे जबरीने मंगळसूत्र ओढून घेवून जायचे आता मात्र एका महिलेनेच अशा प्रकारे महिलेला लूटल्यामुळे चांगलीच खळबळ उडाली आहे. या प्रकरणी राजकिबाई तेजवानी यांच्या तक्रारीवरुन फ्रेजरपूरा पोलिसांनी अज्ञात महिलेविरुद्ध लूटमारीचा गुन्हा दाखल केला आहे.

मंगळसूत्र चोरटे सक्रीय, महिलांमध्ये वाढली भीती
शहरात मागील आठ दिवसांपासून महिलांच्या गळ्यातील मंगळसूत्र चोरटे सक्रीय झाले आहेत. त्यामुळे पोलिस त्यांचा शाेध घेत आहेत. या दुचाकीस्वार मंगळसूत्र चोरट्यांमुळे महिलांंमध्ये भीतीचे वातावरण असतानाच आज सकाळी सिंधूनगरमध्ये झालेल्या या घटनेने आश्चर्य व्यक्त होत असतानाच महिलांमध्ये भीतीसुद्धा निर्माण झाली आहे.

सीसीटीव्ही फूटेजवरुन त्या लुटारू महिलेचा शोध सुरू
सिंधूनगरमध्ये आश्रमात गेलेल्या महिलेच्या चेहऱ्यावर मिरचीपूड फेकून तिच्या कानाला दुखापत करुन सोन्याचे टॉप्स महिलेने लंपास केले आहे. या प्रकरणी अज्ञात महिलेविरुद्ध लूटमारीचा गुन्हा दाखल करुन तिचा शोध सुरू केला. यासाठी परिसरातील सीसीटीव्ही फूटेज पाहण्यात येत आहे. पुंडलीक मेश्राम, ठाणेदार, फ्रेजरपुरा.

महिलेने महिलेला अशाप्रकारे लुटल्याची ही पहिलीच घटना
एका महिलेने दुसऱ्या महिलेला मिरची पडू फेकून नंतर चाकू दाखवला आणि सोन्याचे दागिने लंपास केली. अशी थरारक घटना अलीकडे घडलेली शहरातील पहिलीच घटना आहे. यापूर्वी अनेकदा रोख घेवून जाणाऱ्या पुरूषांना लूटारु पुरूषांनी रस्त्यांवर चाकू दाखवून किंवा मिरची पूड फेकून लुटले आहे. मात्र महिलेने महिलेची केलेली ही लूटमारीची पहिलीच असल्याची चर्चा या घटनेनंतर शहरात सुरू होती.
लुटारु महिलेने कानातील दागिने हिसकल्यामुळे राजकीबाई यांना झालेली दुखापत.

बातम्या आणखी आहेत...