आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

28.85 लाखांचा येणार खर्च:परकोट भिंतीच्या संवर्धन, सौंदर्यीकरणाचे काम अखेर बऱ्याच कालावधीनंतर सुरू

अमरावतीएका महिन्यापूर्वी
  • कॉपी लिंक

शहराचा वारसा असलेल्या परकोटाच्या संवर्धनासह सौंदर्यीकरणाच्या कामाला अखेर बऱ्याच कालावधीनंतर महानगर पालिकेद्वारे सुरूवात करण्यात आली आहे. यासाठी २८.८५ लाख रु. खर्च केले जाणार आहेत. पर्यटन स्थळ विकासाकरिता मनपाने संवर्धन व सौंदर्यीकरणाचे काम अनस एंटरप्राईजेसवर सोपवले आहे. शहरातील विविध राजकीय पक्ष, सुज्ञ नागरिक, वारसाप्रेमी सातत्याने परकोटाच्या संवर्धनासह सौंदर्यीकरणाची मागणी करत होते.

अमरावती शहर म्हटले की, श्री अंबादेवीचे मंदिर, श्री एकविरा देवीचे मंदिर, परकोट व त्याला असलेली भव्य द्वारे तसेच जवाहरगेट लगेच डोळ्यापुढे येते. आजही या परकोटाच्या आत मोठया संख्येत अमरावतीकर राहतात. याला जुनी अमरावती म्हटले जाते. हीच बाब लक्षात घेऊन माजी पालकमंत्री डाॅ. सुनील देशमुख यांच्या पुढाकाराने १० वर्षांआधी परकोटाचे सौंदर्यीकरण करण्यात आले होते. परंतु, रखरखावाच्या अभावी ते नाहीसे झाले. त्यामुळे आता पुन्हा सौंदर्यीकरणासह संवर्धनाचे काम हाती घेण्यात आले आहे. पेंढाऱ्यांच्या हल्ल्यापासून अमरावतीचे संरक्षण करण्यासाठी राणोजी भोसले यांनी १७४० ते ४५ या कालावधीत दिड लाख रु. खर्चून शहराभोवती आधी भिंत बांधली होती. परंतु, ती भिंतही चिंतू पेंढाऱ्याचा हल्ला रोखू शकली नाही. हा भयंकर हल्ला १८०५ मध्ये झाला होता. त्यामुळे शहरात प्रचंड लूट झाली. सावकार, व्यापाऱ्यांनी याबाबत निझामापुढे अमरावतीच्या संरक्षणासाठी परिणामकारक उपाययोजना करण्याची मागणी केली होती. राणोजी भोसले यांनी बांधलेली भिंत या हल्ल्यात उद्ध्वस्त झाल्यानंतर निझामाने १८०६ च्या सुमारास भक्कम परकोट बांधण्यास सुुवात केली. हे काम पूर्ण होण्यासाठी १५ वर्षे लागली.

१८२१ मध्ये परकोटासाठी ४ लाखाचा खर्च १८२१ मध्ये हा परकोट बांधून पूर्ण झाला. त्यावेळी परकोटाच्या बांधकामासाठी ४ लाख रुपये खर्च आला होता. आता केवळ काही भागाचे सौंदर्यीकरण व संवर्धनासाठीच २८.८५ लाख रु. खर्च होत आहे. या परकोटासाठी चिरेबंदी दगड त्यावेळी वापरण्यात आले होते. त्यामुळे तो अजुनही सुरक्षित आहे. त्याला आणखी जपण्यासाठी दुरुस्ती, संवर्धनाचे काम हाती घेण्यात आले आहे.

चारही बाजुने परकोटाची लांबी सव्वा दोन मैल चारही बाजुने परकोटाची लांबी ही सव्वा दोन मैल असून, भिंतीची उंची २० ते २६ फुट आणि रुंदी ८ ते १० फूट आहे. परकोटाला अंबागेट, भुसारी गेट, जवाहर गेट, नागपुरी गेट, खोलापुरी गेट असे पाच मोठे दरवाजे आहेत. तसेच माता खिडकी, खुनारी खिडकी, छत्रपती खिडकी, पटेल खिडकी अशा चार खिडक्या आहेत.

बातम्या आणखी आहेत...