आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

दर्यापूर:मेळघाटमध्ये सापडला जगातील पहिला त्रोपिजोदिम विरिदुर्बिअम प्रजातीचा कोळी; दर्यापुरातील सांगळुदकरचे प्रा. अतुल बोडखे यांनी केले चमूसह संशोधन

दर्यापूर2 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
  • मेळघाटात सापडलेला त्रोपिजोदिम विरिदुर्बिअम प्रजातीचा कोळी नर.

विदर्भाचे नंदनवन म्हणून ओळखल्या जाणाऱ्या मेळघाटमध्ये जगातील पहिला कोळी प्रजातीचा त्रोपिजोदिम विरिदुर्बिअम नर आढळून आला आहे. येथील जे. डी. पाटील सांगळुदकर महाविद्यालयाचे जीवशास्त्र विभागाचे प्रा. डॉ. अतुल बोडखे आणि त्यांच्या सहकारी संशोधकांनी तसा दावा केला आहे. दर्यापूर येथील स्पायडर संशोधन प्रयोगशाळेचे संशोधक प्रा. डॉ. अतुल बोडखे आणि संशोधक चमूने संशोधन करीत मेळघाटमध्ये जगातील त्रोपिजोदिम विरिदुर्बिअम प्रजातीच्या पहिल्या नर कोळ्याची नोंद केली. या प्रयोगशाळेतून आतापर्यंत १७ नवीन कोळी प्रजातींचा शोध लागलेला आहे. या जातीच्या पहिल्या मादीची नोंद प्रजापती आणि सहकारी संशोधक चमूने गुजरातमधील पालजजवळील अरण्य पार्क गांधीनगर येथे २०१६ मध्ये घेतली. या कोळ्याची नोंद मेळघाटमधील तापी नदीकाठी असलेल्या जंगलामधून तसेच धारखोरा बुरळघाट व नवाब नाला घटांग, धारणी रोड येथून घेण्यात आली.

आतापावेतो मेळघाटमध्ये कोळ्याच्या एकूण २०४ प्रजातींची नोंद झालेली आहे. या प्रजातीच्या नराची लांबी ३.६ मिमी असून मादी ४.१ मिमी लांबीची आहे. हा कोळी जंगलामधील पालापाचोळ्यामध्ये आढळतो. तसेच तो निशाचर असून आकाराने खूप छोटा असल्याने त्याला ओळखणे कठीण आहे. या कोळी प्रजातीचा संपूर्ण अभ्यास जे. डी. पाटील सांगळुदकर महाविद्यालयाच्या कोळी संशोधन प्रयोगशाळेत करण्यात आला असल्याची माहिती प्रा. डॉ. अतुल बोडखे यांनी दिली. नवीन सर्व प्रजातींचा अभ्यास भारत शासनाच्या डेहराडून येथील भारतीय वन्यजीव संस्थेच्या सहयोगाने होत आहे. या संशोधनामध्ये डेहराडून येथील संस्थेचे डॉक्टर व्ही. पी. उनियाल व डॉ. शाजिया कासिन, सुभाष कांबळे, डाॅ. महेश चिखले, डॉ. गजानन संतापे व सावन देशमुख सहभागी झाले होते.

भारतात आढळतात ५ प्रजाती
ट्रोपीझोडिअम या जिन्सच्या १२ प्रजाती जगामध्ये दिसतात. त्यापैकी भारतात ५ आढळतात. सध्या भारताव्यतिरिक्त जगामध्ये हवाई, फ्रेंच पोलिनेसिया, बाली, चीन, पाकिस्तानन, थायलंड व उत्तर ऑस्ट्रेलिया येथे काही प्रजाती आढळतात.

घातक किड्यांचा करतो नायनाट
हा नर प्रजातीचा कोळी मुंगीसारखा दिसतो. तो जंगलामध्ये झाडाखालील पालापाचोळ्यांमध्ये असतो. तो निशाचर असून रात्रीलाच आढळतो. घातक किडे आदींचा नायनाट करण्याचे काम तो करताे. त्यामुळे तो एक प्रकारे जंगलाचे संरक्षण करतो. प्रा. डाॅ. अतुल बोडखे, संशोधक

मादी आढळली होती गुजरातमध्ये
यापूर्वी याच प्रजातीची मादी गुजरातमध्ये संशोधनादरम्यान प्रजापती आणि सहकारी संशोधक चमूने घेतली. ही मादी गुजरातमधील पालजजवळील अरण्य पार्क गांधीनगर येथे २०१६ मध्ये आढळली. मात्र त्रोपिजोदिम विरिदुर्बिअम प्रजातीचा कोळी नर हा प्रथमच मेळघाटात आढळला असल्याची माहिती सांगळुदकर महाविद्यालयाचे प्राध्यापक व संशोधक डॉ. अतुल बोडखे यांनी दिली.

बातम्या आणखी आहेत...